२०१२ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the XXX Olympiad) ही उन्हाळीऑलिंपिक स्पर्धेची ३०वी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशामधील लंडन शहरात जुलै २७ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात येईल. ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तिसऱ्यांदा भुषवण्याचा मान मिळणारे लंडन हे जगातील पहिलेच शहर आहे. ह्यापूर्वी १९०८ व १९४८ सालांमधील स्पर्धा लंडनमध्ये खेळवण्यात आल्या होत्या.
६ जुलै २००५ रोजी सिंगापूरात झालेल्या आय.ओ.सी.च्या ११७व्या अधिवेशनात लंडनने पॅरिस, माद्रिद, मॉस्को व न्यू यॉर्क शहर ह्या इतर यजमानोत्सुक शहरांपेक्षा अधिक गूण मिळवत यजमानपदाची बाजी मारली. ह्या स्पर्धेसाठी ग्रेटर लंडनच्या पूर्व भागातील न्यूहॅम ह्या बरोमधील स्ट्रॅटफर्ड भागातील जुना व बंद पडलेला औद्योगिक प्रदेश विकसित करून तेथे २० हेक्टर क्षेत्रफळाचे ऑलिंपिक पार्क बांधण्यात आले. तसेच लंडन महानगर परिसर व युनायटेड किंग्डममधील अनेक चालू क्रीडा स्थळे ह्या स्पर्धेदरम्यान वापरली गेली.
ह्या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी लंडन ऑर्गनायझिंग कमिटी फॉर ऑलिंपिक गेम्स ही समिती निर्माण करण्यात आली. तसेच खेळ स्थाने व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ऑलिंपिक डिलिव्हरी कमिटी ही वेगळी संस्था स्थापण्यात आली.
स्थळे
ह्या स्पर्धेसाठी ग्रेटर लंडनमधील अनेक चालू व ऐतिहासिक स्थळे, काही नव्याने बांढण्यात आलेली स्थळे तर काही तात्पुरती स्थळे वापरात आणली गेली. स्ट्रॅटफर्ड जिल्ह्यामध्ये मार्च २०११ मध्ये बांधून पूर्ण झालेले व ८०,००० आसन क्षमता असणारे ऑलिंपिक स्टेडियम ह्या स्पर्धेमधील प्रमुख आकर्षण होते. येथे स्पर्धेचे उद्घाटन व सांगता समारंभ आयोजित केले गेले. ग्रेटर लंडनमधील सर्व स्थळे ३ क्षेत्रांमध्ये विभागण्यात आली.
ह्या स्पर्धेसाठी लंडन शहराच्या वाहतूक सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या गेल्या. स्ट्रॅटफर्ड आंतराष्ट्रीय स्थानक हे ऑलिंपिक पार्कमधील रेल्वे स्थानकाने मुख्य ऑलिंपिक संकुलाला रेल्वे सेवा पुरवली. तसेच लंडन अंडरग्राउंड व महानगरामधील इतर रेल्वे मार्ग विशेष फेऱ्या पुरवल्या.
सोहळे
उद्घाटन समारंभ
तिसाव्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन २७ जुलै, २०१२ रोजी राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या हस्ते करण्यात आले. ब्रिटिश सिनेदिग्दर्शक डॅनी बॉइल दिग्दर्शन करणार असणाऱ्या ह्या समारंभासाठी भारतीय संगीतकार ए.आर. रहमान ह्याने एक पंजाबी गाणे रचले. तसेच तामिळ चित्रपट राम लक्ष्मणमधील इळैयराजाने संगीत दिलेले एक गाणे देखील ह्या समारंभासाठी निवडण्यात आले.