स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा१९८६ पासून सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.
स्पेनचा इतिहास खूप प्राचीन आहे. रोमन साम्राज्यात स्पेनची भरभराट झाली आणि हा देश रोमन साम्राज्यातील महत्त्वाच्या प्रांतांपैकी एक म्हणून उदयास आला. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात स्पेन जर्मेनिक अंमलाखाली आला. पुढे अरबांच्या आक्रमणानंतर जवळजवळ संपूर्ण स्पेन अरब साम्राज्याचा भाग होऊन मुस्लिम अंमलाखाली आला. उत्तरेकडील ख्रिश्चन राज्यांनी प्रदीर्घ लढा देऊन हळूहळू मुस्लिम अंमलाचे उच्चाटन केले आणि १४९२ पर्यंत हा प्रदेश अरब साम्राज्यातून पूर्णपणे मुक्त केला. त्याचवर्षी ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला आणि स्पेनच्या जागतिक साम्राज्याची सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत स्पेन हे युरोपातील सर्वात शक्तिशाली राज्य म्हणून प्रस्थापित झाले आणि हा दबदबा सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत कायम राहीला. मात्र सततच्या युद्धांमुळे आणि इतर अंतर्गत प्रश्नांमुळे साम्राज्याचे विघटन झाले. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत स्पेनमध्ये हुकुमशाही प्रस्थापित झाली आणि देशाला आर्थिक व राजकीय स्थैर्य प्राप्त झाले. १९८६ मध्ये युरोपीय महासंघात सामील झाल्यापासून स्पेनने आर्थिक व सांस्कृतिक नवनिर्मितीचा काळ अनुभवला आहे.
नावाची व्युत्पत्ती
स्पेनचे खरे नाव एस्पान्या असून स्पेन हा त्याचा इंग्लिश उच्चार आहे. रोमन काळात हा प्रदेश इस्पानिया म्हणून ओळखला जात होता व या नावावरून एस्पान्या हे नाव पडले. ग्रीक या प्रदेशास इबेरिया (इबेर (एब्रो) नदीचा प्रदेश) म्हणून ओळखत होते. इस्पानिया या नावाचा पहिला उल्लेख इ.स.पूर्व २०० व्या शतकात केला गेल्याचे आढळते. पाचवा एनो नावाच्या कवीने प्रथम हा शब्द वापरला.
इस्पानिया हा लॅटिन शब्द आहे, मात्र या शब्दाचा उगम कसा झाला याबाबत मतभेद आहेत कारण लॅटिन भाषेत याचे संदर्भ मिळत नाहीत.
सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने क्रो-मॅग्नन मानवाच्या रूपात इबेरियन द्वीपकल्पावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आधुनिक मानवाच्या सुरुवातीच्या वसाहती पिरेनिस पर्वतांमध्ये होत्या. उत्तर स्पेनमध्ये कान्ताब्रिया संघातील आल्तामिरा गुहा अशा वसाहतींपैकी आहे. ही गुहा आपल्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या भित्तिचित्रांची निर्मिती सुमारे १५,००० वर्षांपूर्वी केली गेली असावी असा अंदाज आहे. आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वी १२ लाख वर्षे या प्रदेशात निअँडरथल मानवाची वस्ती असल्याचे पुरावे आतापुएर्सा येथील उत्खननात मिळाले आहेत..[३]
इबेरियन आणि केल्ट ह्या रोमनपूर्व काळात स्पेनमधील मुख्य जमाती होत्या. इबेरियन लोक दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात व केल्ट उत्तरेस अटलांटिक समुद्राच्या किनारी प्रदेशात रहात होते. द्वीपकल्पाच्या मध्यभागात या दोन्ही जमातींच्या मिश्र वस्त्या होत्या ज्या केल्टायबेरियन म्हणून ओळखल्या जातात. स्पेनमधल्या अनेक शहरांची नावे या जमातींच्या मूळ वसाहतींच्या नावांवरून अस्तित्त्वात आली आहेत. उदा.- एल्चे (मूळ लिसि), लेरिदा (मूळ लेर्दा). स्पेनमधल्या सर्वात लांब नदीला एब्रो हे नावदेखील इबेरियन लोकांमुळे पडले. ह्या दोन मुख्या जमाती वगळता इतर वंशिक समूहांच्या वस्त्या सध्याच्या आंसालुसिया संघातील मैदानी प्रदेशात होत्या.
ख्रिस्तपूर्व ५०० ते ३०० दरम्यान ग्रीक आणि फिनिशियन व्यापाऱ्यांनी आपल्या वखारी आणि व्यापारी वसाहती भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात उभारल्या. पुढे यांपैकी काही वसाहतींचा विकास होऊन आजची स्पॅनिश शहरे उदयास आली. मालागा, आम्पुरियास, आलिसान्ते ही त्यांपैकी काही शहरे आहेत. उत्तर आफ्रिकेतील फिनिशियन वसाहतींमधून उदयास आलेल्या कार्थेज साम्राज्याने पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्पावर ताबा मिळवला आणि या प्रदेशास नवीन कार्थेज (कार्तागो नोवा) असे नाव दिले. सध्याच्या कार्ताहेना या शहराचे नाव मूळ कार्तागो नोवा या शब्दावरून आले. बार्सेलोना हे विख्यात शहर कार्थेज राजा हमिल्कर बार्का याने वसविले. आपल्या कुटुंबाच्या नावावरून त्याने या शहरास बार्सिनो हे नाव दिले, ज्यावरून बार्सेलोना हे नाव आले.
इस्पानिया
दुसऱ्या प्युनिक युद्धादरम्यान (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते.[४] मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.[५][टीप ६]
रोमनांनी आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या लिस्बन(Olissis bona ओलिसिस बोना), तारागोना(Tarraco ताराको) या शहरांचा विकास केला तसेच अनेक नवीन शहरे देखिल वसवली. उदा.:झारागोझा(Caesaraugusta सेयासाराउगुस्ता), मेरिदा(Augusta Emerita औगुस्ता एमेरिता), वालेन्सिया(Valentia वालेन्तिया), लेओन(Legio Septima लेजिओ सेप्तिमा), बादाखोस(Pax Augusta पाक्स औगुस्ता), आणि पालेन्सिया("Παλλαντία Pallas" Ateneia पालास आतेनेइया).
रोमान अंमलाखाली या प्रांताची अर्थव्यवस्था भरभराटीस आली. इस्पानिया म्हणून ओळखला जाणाऱ्या ह्या प्रांताची रोमन साम्राज्याचे धान्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण झाली. या प्रांताच्या बंदरांमधून सोने, लोकर, ऑलिव्ह तेल, आणि वाईन यांची निर्यात सुरू झाली. कालवे व सिंचन प्रकल्पांमुळे या प्रदेशातील कृषी उत्पादन वाढले; यातील काही आजही अस्तित्त्वात आहेत. सम्राट त्राहान, सम्राट थिओडोसियस पहिला व तत्त्ववेत्ता सेनेका यांचा; तसेच मार्तियाल, किंतिलियान आणि लुकान या कवींचा जन्म इस्पानियात झाला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू झाला आणि त्याला दुसऱ्या शतकाखेरीस लोकप्रियता मिळाली.[५] वर्तमान स्पेनमधल्या भाषा, धर्म, परंपरा आणि कायदे यांचा उगम या काळात शोधता येऊ शकेल.[४]
रोमन साम्राज्याच्या अस्ताला सुरुवात झाल्यानंतर, जर्मेनिक रानटी टोळ्यांनी ५व्या शतकात इस्पानियावर हल्ले करण्यास प्रारंभ केला. व्हिसिगॉथ, सुएबि, व्हॅन्डल आणि अलन या टोळ्या पिरेनिस पर्वत ओलांडून स्पेनमध्ये आल्या. रोमनीकरण झालेले व्हिसिगॉथ इ.स.४१५ मध्ये स्पेनमधे आले. या एकाधिकारशाहीने रोमन कॅथोलिक धर्म स्वीकारल्यानंतर ईशान्येस विखुरलेले सुएबि टोळ्यांचे आणि आग्नेयेस विखुरलेले बायझन्टाईन साम्राज्यातले प्रदेश जिंकून इबेरिया द्वीपकल्पाच्या बऱ्याच मोठ्या भागावर ताबा मिळवला.
आठव्या शतकात सन ७११ ते सन ७१८ दरम्यान उत्तर आफ्रिकेतील बर्बर अथवा मूर जातीच्या अरबांनी जवळजवळ संपूर्ण इबेरिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला. उमय्याद घराण्याच्या अरब साम्राज्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. केवळ उत्तरेच्या डोंगराळ प्रदेशातील काही छोटी राज्ये स्वतंत्र राहिली.[टीप ७] कुराणात उल्लेख असलेले लोक म्हणून ख्रिश्चन आणि यहुदी धर्मियांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली, मात्र मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले.[६][७] दरम्यान धर्मांतराचे प्रमाणही हळूहळू वाढत राहिले. १० व्या आणि ११ व्या शतकातल्या अनेक सामूहिक धर्मांतरांमुळे एक वेळ अशीही आली की मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त झाली.[८]
खुद्द इबेरियातला मुस्लिम समाजही दुभंगलेल्या अवस्थेत होता आणि या समाजात सामाजिक तेढही होती. ज्यांनी इबेरियावर हल्ल्यासाठी सैन्य पुरवले त्या उत्तर आफ्रिकेतल्या मूर लोकांचे मध्यपूर्वेतल्या अरब सत्ताधीशांशी खटके उडत होते.[टीप ८] पुढे मूर लोकांची संख्या वाढल्यावर ग्वादाल्किविर नदीचे खोरे, वालेन्सिया येथील किनारी मैदानी प्रदेश आणि ग्रानादाचा डोंगराळ भाग येथे त्यांची सत्ता स्थापन झाली.[८]
स्पेनमधल्या मुस्लिम खलिफतीचीकोर्दोबा ही राजधानी होती. मध्ययुगीन युरोपातले हे सर्वात मोठे, सर्वात श्रीमंत आणि सर्वात सुसंस्कृत शहर होते.[टीप ९] भूमध्य समुद्रामार्गे होणारा व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला या काळात बहर आला. मध्यपूर्वेतल्या व उत्तर आफ्रिकेतल्या बौद्धिक संपन्नतेची अरबांनी या प्रदेशास ओळख करून दिली. या काळात अभिजात ग्रीक संस्कृतीचे पश्चिम युरोपमध्ये पुनरुज्जीवन करण्यात यहुदी आणि मुस्लिम विद्वानांनी महत्त्वाचे योगदान दिले. रोमन, यहुदी आणि मुस्लिम संस्कृतींमधल्या परस्पर देवाणघेवाणीमुळे या प्रदेशाची स्वतःची एक विशिष्ट संस्कृती उदयास आली.[८] या काळात लोकसंख्येचा मोठा भाग शहरांबाहेर गावांमध्ये रहात होता. रोमन काळातले जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीचे नियम या काळातही चालू राहिले. अरब सत्ताधीशांनी जमिनीचे मालकी हक्क मान्य केल्यामुळे व नवीन पिके आणि नवीन शेतीच्या पद्धती आणल्यामुळे शेतीच्या विकासात आणि धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
मात्र ११ व्या शतकापर्यंत कोर्दोबा खलिफतिचे तुकडे पडून तिचे तैफा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थानांमधे विभाजन झाले. एकमेकांशी सतत शत्रुत्व ठेवून वागणाऱ्या या राज्यांमुळे छोट्या ख्रिश्चन राज्यांना आपल्या सीमा विस्तारण्याची आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी मिळाली.[८] उत्तर आफ्रिकेत राज्य करणाऱ्या अल्मोर्विद आणि अल्मोहाद घराण्याच्या राज्यकर्त्यांच्या आगमनामुळे आणि त्यांनी लागू केलेल्या कर्मठ इस्लामच्या कडक अंमलबजावणीमुळे मुस्लिम संस्थानांची एकजूट होण्यास मदत झाली. मात्र सुरुवातीला उत्तर स्पेनमध्ये यश मिळूनही ख्रिश्चन राज्यांच्या वाढत्या लष्करी शक्तीला रोखण्यास ही एकजूट कमी पडली.[५]
रेकोन्किस्ता (Reconquista:पुनर्विजय) हा शब्दप्रयोग स्पेनमधल्या ख्रिश्चन राज्यांच्या झालेल्या विस्तारास उद्देशून करण्यात येतो. कित्येक शतके चाललेल्या या विस्ताराची सुरुवात सन ७२२ मध्ये कोवादोंगा येथे झालेल्या युद्धापासून झाली असे मानण्यात येते. या युद्धात ख्रिश्चन सैन्याने मुस्लिम सैन्यावर मिळवलेला विजय आस्तुरिया संस्थानाची स्थापना होण्यास कारणीभूत ठरला, तर उत्तरेस पिरेनिस पर्वताच्या पलीकडे गेलेल्या मुस्लिम सैन्याला मध्य फ्रान्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. शेवटी मुस्लिम सैन्याने माघार घेऊन पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या एब्रो आणि दुएरो नद्यांदरम्यानच्या सुरक्षित प्रदेशात आश्रय घेतला. मध्ययुगीन युरोपातले सर्वात पवित्र स्थळ सान्तियागो दे कोम्पोस्तेला असलेल्या गालिसिया राज्यातून सन ७३९ पर्यंत मुस्लिमांचे पूर्णपणे उच्चाटन झाले. काही काळाने फ्रँक सैन्याने पिरेनिस पर्वताच्या दक्षिणेस आपले परागणे स्थापन केले, ज्यांचे रूपांतर पुढे नावारे, आरागोन आणि कातालोनिया संस्थानांमध्ये झाले.[९]
या व यानंतरच्या काळात स्पॅनिश साम्राज्य दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, मेक्सिको, सध्याच्या अमेरिकेचा दक्षिण व पश्चिम भाग, फिलिपाईन्स, गुआम, मेरियाना द्वीपसमूह, इटलीचा उत्तर भाग, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स सह जगाच्या कानाकोपऱ्यांतून दूरवर पसरले. या साम्राज्यावर कधी सूर्य अस्त होत नाही असे म्हणले जायचे (हेच नंतर इंग्लिश साम्राज्याबद्दल म्हणले गेले.) या सुमारास स्पेनने अनेक धाडसी शोधकांना आश्रय देउन त्यांना जगाच्या पाठीवर नवनवीन प्रदेश शोधण्यास पाठवले. त्यांच्या पाठोपाठ स्पॅनिश व्यापारी व तद्नंतर सैन्य येउन पोचले व युरोपियन साम्राज्यवादाचा पाया घातला गेला. सोळाव्या शतकाअखेर स्पेनच्या मिळकतीचा पाचवा हिस्सा केवळ अमेरिकेतून येणारी चांदी होती. जवळजवळ फुकटात मिळवलेली ही चांदी स्पेन भारत, चीन व ऑट्टोमन साम्राज्यांत पाठवत असे व बदल्यात मसाले व इतर सामग्री विकत घेत असे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून स्पॅनिश साम्राज्याच्या अस्तापर्यंत स्पेनने २.८ कोटी किलो चांदी फक्त चीनमध्ये पाठवल्याची नोंद आहे. हे सोने सुरुवातील स्पेनमधून रेशीममार्गे पाठवण्यात येई पण मनिला गॅलियनची सुरुवात झाल्यावर हा मार्ग जास्त सुकर व त्वरित झाला. संपत्तीबरोबरच स्पॅनिश शोधकांनी या नवीन जगातून विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि विद्वत्ताही युरोपमध्ये नेली, ज्यामुळे युरोपच्या उरलेल्या जगाबद्दलचा दृष्टिकोन कायमचा बदलला.[१२] ही सांस्कृतिक प्रगती आता स्पॅनिश सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते.
सोळाव्या शतकाच्या अखेरीस व सतराव्या शतकाच्या सुरुवातीला स्पेनवर चहुबाजूंनी संकटे येऊ घातली होती. ऑट्टोमन साम्राज्याला धार्जिणे असलेल्या बार्बरी चाच्यांनी गुलाम पकडून नेण्यासाठी घातलेल्या धाडींनी किनारपट्टीवरील जीवन अवघड झाले होते तर त्याच वेळी इस्लामी साम्राज्यवाद स्पेनवर घाट घालत होता. याचवेळी स्पेनचे इटली व फ्रांसशी अधिकृत युद्ध चालूच होते. प्रोटेस्टंट सुधारणेमुळेख्रिश्चन धर्मात पडलेल्या फुटीने स्पेन या युद्धांत खोलवर खेचले गेले. याचा परिणाम सततची युद्धे व त्यामुळे येणारी अस्थिरता ही होती.[१३]
शतकाच्या मध्यात स्पेनमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव झाला आणि युद्धांनी जेरीस आलेल्या साम्राज्यावर अवकळा पसरली.[१४] आत्तापर्यंतच्या धर्मकारणावरून केलेल्या युद्धात स्पेनने आपली संपत्ती पणाला लावली होती. ती आता तुटपुंजी वाटायला लागली व याचा प्रभाव एकंदर युरोपीय अर्थतंत्रावर झाला. स्पेनला जरी प्रोटेस्टंट सैन्याचे आक्रमण थोपवून धरण्यात यश आले असले तरी पोर्तुगाल आणि नेदरलँड्सला स्वातंत्र्य देणे भाग पडले. याशिवाय फ्रांसचा जिंकून घेतलेला प्रदेशही गमावला.[१५] युरोपमध्ये ही परिस्थिती असली तरी युरोपबाहेरील स्पेनचे प्रचंड साम्राज्य अबाधित राहिले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्याला कोणी हात लावण्याची हिंमत केली नाही.
या पडतीमुळे स्पेनच्या राज्याचा उत्तराधिकाऱ्यांत वाद सुरू झाले आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या स्पॅनिश वॉर ऑफ सक्सेशन[मराठी शब्द सुचवा] आणि नागरी युद्धात स्पेनने युरोपमधील आपल्या अनेक वसाहती गमावल्या आणि युरोपमधील अग्रगण्य सत्तास्थान सोडले.[१६] या दरम्यान बर्बन राजवंशाने सत्ता हस्तगत केली. पहिला बर्बन राजा फिलिप पाचव्याने परत कॅस्तिल आणि अरागॉनचे एकत्रीकरण केले, स्थानिक सरदार, दरखदारांची सत्ता काढून घेतली व परत एक स्पॅनिश राष्ट्र स्थापन केले.[१७]
अठराव्या शतकाअखेर व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुन्हा समृद्धी वाढायला लागली. बर्बन राजांनी फ्रांसच्या धर्तीवर राज्यकारभार व अर्थतंत्र चालवण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाअखेर पुन्हा एकदा व्यापारउदीम सुरू झाला. ब्रिटिश वसाहतींना व अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात अमेरिकेला सैनिकी मदत केल्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यास मदत झाली व स्पेन पुन्हा प्रगत राष्ट्रांत गणला जाऊ लागला.[१८]
नेपोलियनचे आक्रमण
१७९३ साली स्पेनने फ्रांसच्या प्रजासत्ताक विरुद्ध युद्ध पुकारले. याचे कारण फ्रांसने केलेला आपल्या बर्बन वंशीय राजा लुई १६व्याचा वध असे दिले गेले. यामुळे स्पेनमध्ये फ्रांसधार्जिण्या उच्चवर्गाविरुद्ध जनमत तयार झाले. १७९५पर्यंत या युद्धात स्पेनची हार अटळ दिसू लागली व फ्रांसशी मानहानीकारक तह करावा लागला ज्यानुसार स्पेनला फक्त नावापुरते स्वतंत्र अस्तित्त्व राहिले. १७९६मध्ये स्पेनने ग्रेट ब्रिटन व पोर्तुगालविरुद्ध युद्ध पुकारले. खिळखिळे झालेले अर्थतंत्र, सैन्य आणि इतर कारणांची जबाबदारी घेऊन स्पेनच्या राजाने पदत्याग केला. फ्रांसच्या सम्राट नेपोलियन बोनापार्टने आपला भाऊ जोसेफ बोनापार्टला स्पेनचा राजा केले.
फ्रांसने बसवलेल्या राजाचा स्पेनच्या नागरिकांनी पहिल्यापासून धिक्कारच केला. मे २, इ.स. १८०८ रोजी माद्रिदमधील नागरिकांनी फ्रेंच सैन्याविरुद्ध उठाव केला. या बरोबरच इतरही अनेक ठिकाणी फ्रेंच सैन्याला हाकलून देण्याची तजवीज सुरू झाली. या घटनेला आता स्पेनच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात मानले जाते.[१९] परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नेपोलियनला स्वतःला दखल देणे भाग पडले. मोठ्या सैन्यासह स्पेनवर चाल करून त्याने स्पॅनिश व मध्येच घुसू पाहणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कॉरुना येथे मात दिली. पण स्पेनच्या स्थानिक लोकांनी गनिमी काव्याने लढाया सुरूच ठेवल्या. इकडे आर्थर वेलेस्लीने आपल्या ब्रिटिश सैन्यात पोर्तुगालच्या सैन्याचा समावेश केला व पूर्वेकडून चाल केली. याच सुमारास नेपोलियन रशियात अडकून पडला होता. शेवटी फ्रांसने १८१४मध्ये स्पेनमधून काढते पाउल घेतले व फर्डिनांड सातवा स्पेनच्या राजेपदी आला.[२०]
हा वीस वर्षांचा काळ स्पेनसाठी घातक होता. यात देशाच्या अर्थतंत्राचे दिवाळे निघाले आणि जनतेत मोठी फूट पाडली. सैन्याचे वा राजकारण्यांचे लक्ष देशांतर्गत असल्यामुळे युरोपबाहेरील वसाहतींकडे दुर्लक्ष झाले व क्युबा व पोर्तो रिको सोडल्यास लॅटिन अमेरिकेतील जवळजवळ सगळ्या वसाहती एक-एक करून स्पेनच्या हातातून निसटायला सुरुवात झाली.
आधुनिक स्पेन
विसाव्या शतकाच्या सुरुवातील स्पेननेही आफ्रिकेच्या कुतरओढीत भाग घेतला. युरोपीय देशांनी तोडलेल्या लचक्यांपैकी स्पेनच्या वाट्याला पश्चिम सहारा, मोरोक्को आणि विषुववृत्तीय गिनी हे प्रदेश आले. मोरोक्कोत झालेल्या १९२० च्या रिफ युद्धात पराभव झाल्याने स्पेनमधील राजेशाही व्यवस्था खिळखिळी झाली. पंतप्रधान मिगेल प्रिमो दि रिव्हेराने १९२३-३१ दरम्यान हुकुमशहा म्हणून स्पेनवर राज्य केले. १९३१ च्या दुसऱ्या प्रजसत्ताकच्या स्थापनेनंतर रिव्हेराची हुकुमशाही संपली. या व्यवस्थेत बास्क, कातालोनिया आणि गॅलिशिया प्रदेशांना स्वायत्त प्रदेश जाहीर करण्यात आले. याचबरोबर स्त्रीयांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
अवघ्या ५ वर्षांनी १९३६मध्ये हे प्रजासत्ताक कोसळले व स्पॅनिश नागरी युद्ध सुरू झाले. तीन वर्षांच्या तुंबळ लढाईनंतर जनरल फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखालील गटाने स्पेनची सत्ता काबीज केली. यात नाझी जर्मनी आणि इटलीने फ्रँकोची मोठी मदत केली होती. या फाशीवादी गटाविरुद्ध लढणाऱ्या रिपब्लिकन गटाला सोव्हिएत संघ, मेक्सिको तसेच अमेरिकेच्या असंघटित सैनिकांची मदत होती. पाश्चिमात्य देशांनी अधिकृतरीत्या तटस्थतेची भूमिका घेतली होती. यानंतर सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात स्पेनने तटस्थता घेतली असली तरी त्यांची अक्ष राष्ट्रांकडे सहानुभूती होती. स्पेनच्या लाखो सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात दोन्ही बाजूंकडून भाग घेतला होता. या नागरीयुद्धात ५ लाखाहून अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या[२१] आणि अजून पाच लाख व्यक्ती परागंदा झाल्या.[२२]
फ्रँकोने आपला एकछत्री अंमल बळकट करण्यासाठी देशातील राजकीय पक्षांचे उच्चाटन केले व इतर देशांशी व्यवहार कमी केले. याने स्पेन आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासला. स्पेनला संयुक्त राष्ट्रांतही प्रवेश देण्यात आला नाही. १९५० च्या दशकात सुरू झालेल्या शीतयुद्धामुळे स्पेनला भौगोलिक महत्त्व प्राप्त झाले व अमेरिका व इतर पाश्चात्यदेशांनी स्पेनची मनधरणी करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५५मध्ये स्पेनला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश देण्यात आला व अमेरिकेने त्यानंतर लगेच तेथे लश्करी तळ उभारले. १९६० च्या दशकात स्पेनने आश्चर्यकारक गतीने आर्थिक प्रगती साधली. स्पॅनिश चमत्कार म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या या काळात स्पेनने मोठी औद्योगिक प्रगती केली. याचबरोबर बाहेरील देशांतील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठीही मोठे प्रयत्न करण्यात आले.
फ्रँको १९७५मध्ये मृत्यू पावल्यावर राजकुमार हुआन कार्लोसने राजा या नात्याने राष्ट्रप्रमुखपद धारण केले. फ्रँकोनेच असे होण्याचे मान्य केलेले होते. इ.स. १९७८मध्ये स्पेनने नवीन संविधान अंगिकारले व त्यानुसार अनेक अधिकार आपल्या अंतर्गत असलेल्या राज्यांना दिले गेले. स्पेन आता स्वायत्त राज्यांचे राष्ट्र बनले. बास्क प्रदेशात पूर्णपणे स्वातंत्र्य मागणारी ई.टी.ए. ही संघटना अजूनही कार्यरत आहे.
क्षेत्रफळाच्या हिशोबात स्पेन हा जगात ५१व्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे. ५,०४,७८२ किमी² क्षेत्रफळाचा हा देश आकारमानाने तुर्कमेनिस्तानाइतका असून अमेरिकेतीलकॅलिफोर्निया राज्यापेक्षा मोठा आहे. इबेरियन द्वीपकल्पाचा ८४% भाग स्पेनने व्यापलेला आहे.
स्पेनला सुमारे ४,९६४ किमी (एकूण सीमेच्या ८८%) लांबीचा किनारा लाभलेला आहे, तर जमिनीवरील सीमेची लांबी १,९१७.८ किमी (एकूण सीमेच्या १२%)आहे. उत्तरेस बिस्के, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस भूमध्य समुद्र व जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि आग्नेयेस बालेआरिक समुद्र आहे. कमीतकमी १३ किमी रुंद असलेल्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने स्पेन आणि युरोप खंडाला उत्तर आफ्रिकेपासून वेगळे केले आहे. स्पेनला लाभलेल्या सागरतटांपैकी भूमध्य समुद्रकिनाऱ्याची लांबी १,६६० किमी व अटलांटिक किनाऱ्याची लांबी ७१० किमी आहे.
या देशाचा बराचसा भाग पर्वतरांगा आणि पठारांनी व्यापलेला आहे. स्पेनमधील सिएरा नेवाडा (हिमपर्वत) ही पर्वतरांग प्रसिद्ध आहे. सुमारे ४५० किमी लांबीची पिरेनिस पर्वतरांग उत्तरेस बिस्के समुद्रापासून सुरू होऊन दक्षिणेस भूमध्य समुद्राजवळ येऊन संपते. फ्रान्स व स्पेन यांची सीमा या पर्वतरांगेला समांतर आहे. स्पेनचा मध्यभाग पर्वतरांगांनी वेढलेल्या मेसेता नावाच्या, सुमारे ६१० ते ७६० मीटर उंचीच्या पठाराने व्यापलेला आहे. ह्या पर्वतांमधून उगम पावणार-या जवळजवळ १८०० नद्यांपैकी
ताहो, एब्रो, दुएरो, ग्वादिना आणि ग्वादाल्किविर ह्या स्पेनमधल्या मुख्य नद्या आहेत. स्पेनमधली सर्वात लांब असलेली ताहो ही नदी ९६० किमी लांब आहे. भूमध्य समुद्राला मिळणाऱ्या एब्रो नदीचा अपवाद वगळता इतर सर्व नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. स्पेनचा किनारी प्रदेश हा मैदानी प्रदेश असून खनिज संपत्तीने समृद्ध आहे. ग्वादाल्किविर नदीच्या खोऱ्यातील आंदालुसिया राज्यातील मैदानी प्रदेश सर्वात मोठा आहे.
हवामान
भौगोलिक परिस्थितिमुळे स्पेनचे हवामान वैविध्यपूर्ण झाले आहे. येथील हवामानाचे ढोबळमानाने तीन भाग पाडले आहेत.
स्पॅनिश राज्यघटनेमध्ये स्पेनची व्याख्या "सर्व स्पॅनिश लोकांच्या स्वयंशासित संस्थानांचा मिळून बनलेला देश" अशी करण्यात आली आहे. या व्याख्येस अनुसरून प्रशासनाच्या दृष्टीने स्पेनचे विभाजन १७ स्वशासित संघांमध्ये करण्यात आले असून या संघांचे पुढे प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागाचे आणि काही लहान संघांचे विभाजन नगरपालिकांमध्ये करण्यात आले आहे. नगरपालिका हा स्पॅनिश प्रशासनाचा मूळ आणि सर्वात लहान घटक आहे. सेउता आणि मेलिया ही मोरोक्कोजवळील स्पॅनिश शहरे धरून स्पेनमध्ये एकूण ५० प्रभाग आहेत.
माद्रिद - स्पेनच्या मध्यभागी मान्सानारेस नदीकाठी वसलेले माद्रिद हे शहर स्पेन आणि माद्रिद संघाची राजधानी आहे. माद्रिद हे स्पेनमधले सर्वात मोठे शहर आहे. राजधानी असल्यामुळे हे शहर स्पेनमधले मुख्य राजकीय केंद्र आहे. स्पॅनिश संसद आणि स्पेनच्या अध्यक्षांचे निवासस्थान या शहरात आहे.
बार्सेलोना - स्पेनमधले दुसरे सर्वात मोठे शहर असलेले बार्सेलोना शहर भूमध्य समुद्राच्या किनारऱ्यावर, योब्रे आणि बेसोस नद्यांच्या मुखाशी आणि कोयसेरोला पर्वताच्या पूर्व पायथ्याशी वसलेले आहे. ॲस्टन ही कातालोनिया संघाची राजधानी आहे. युरोपातील प्रमुख बंदरांपैकी एक आणि स्पेनमधला दुसरा सर्वात मोठा विमानतळ असलेले हे शहर स्पेनचे मुख्य आर्थिक केंद्र आहे. १९९२ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा बार्सिलोना येथे झाल्या होते.
वालेन्सिया - स्पेनमधले तिसरे आणि युरोपातील १५वे सर्वात मोठे शहर असलेले वालेन्सिया शहर हे वालेन्सिया संघ आणि वालेन्सिया प्रांत यांची रजधानी आहे.
सेविया - ग्वादालकिविर नदीच्या खोरऱ्यात वसलेले सेविया शहर दक्षिण स्पेनमध्ये आहे. आंदलुसिया संघ आणि सेविया प्रांताची, तसेच स्पेनची आर्थिक राजधानी असलेले हे शहर कला व संस्कृती यांचे केंद्र आहे.
मालागा - मालागा शहर ग्वादलमेदिना आणि ग्वादालोर्से नद्यांदरम्यान आगार्किया टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे. दक्षिण स्पेनमधले आंदलुसिया संघातले हे शहर स्पेनमधले एक बंदर असून भूमध्य समुद्राच्या, कोस्ता देल सोल (सूर्यकिनारा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनाऱ्याजवळ आहे.
बिल्बाओ - उत्तर स्पेनमधले, नेर्बिओन नदीकाठी वसलेले बिल्बाओ शहर बास्के प्रभाग आणि बिस्काया प्रांत यांची राजधानी आहे. हे शहर स्पेनमधले मुख्य औद्योगिक शहर आहे.
स्पॅनिश (एस्पान्योल किंवा कास्तेयानो ) ही स्पेनमधली मुख्य भाषा आहे आणि संपूर्ण स्पेनमध्ये बोलली जाते. स्पॅनिश घटनेमध्ये हिला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला आहे. जगात स्पॅनिश हे नाव जरी प्रचलित असले तरी स्पेनमधे आणि स्पॅनिश बोलणऱ्या लोकांमध्ये ती कास्तेयानो (कास्तिये प्रदेशातील भाषा) म्हणून ओळखली जाते. स्पॅनिश घटनेने कास्तेयानो हे नाव अधिकृत म्हणून स्वीकारले आहे. स्पॅनिश एकूण २१ देशांमध्ये बोलली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषांमध्ये स्पॅनिशचा समावेश आहे.
स्पॅनिश वगळता स्पेनमध्ये इतरही अनेक भाषा बोलल्या जातात. अशा एकूण सहा स्वतंत्र भाषा आहेत, ज्या अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत.
अरेनिस (आरानेस), ओक्सितान या भाषेची बोली भाषा.
आरागोनेस (घटनेनुसार अधिकृत दर्जा नाही मात्र मोठ्या प्रमाणावर बोलली जाते)
कातालान (काताला), वालेन्सियामध्ये ही भाषा वालेन्सियन म्हणून ओळखली जाते.
गॅलिसियन (गालेगो)
ह्या सहा भाषा वगळता स्पेनमध्ये आस्तुर-लेओनेस, लेओनेस, एस्त्रेमादुरन, कान्ताब्रियन अशा बोलीभाषा देखिल छोट्या प्रमाणावर बोलल्या जातात. मात्र इतर भाषांच्या तुलनेत या भाषा बोलणाऱ्यांची कमी संख्या, साहित्यिक परंपरेचा अभाव आणि लोकांकडून या भाषांना घटनेत अधिकृत स्थान देण्याची न होणारी मागणी म्हणून या भाषांना अधिकृत मान्यता नाही.[२४] भूमध्य समुद्राजवळील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांमध्ये काही प्रमाणात जर्मन आणि इंग्रजीही बोलली जाते.
राजकारण
संविधान
इ.स. १८१२पासून स्पेनमध्ये संवैधानिक राज्य आहे. स्पेनने १९७८मध्ये नवीन संविधान अंगिकारले. या संविधानासह स्पेनने हुकुमशाही सोडून लोकशाही पत्करली. १९७५मध्ये फ्रांसिस्को फ्रँको मृत्यू पावल्यावर १९७७मध्ये कॉंस्तित्युअंत कोर्तेसच्या (संवैधानिक सभा) रूपात संसदीय निवडणूका घेतल्या गेल्या. या सभेने १९७८ चे संविधान लिहिले व अंगिकारले.
यानुसार स्पेन १७ स्वतंत्र राज्ये व दोन स्वतंत्र शहरांचा संघदेश आहे. जरी हे भाग स्वतंत्र असले तरी स्पेनच्या संविधानानुसार ते स्पेनचे अविभाज्य अंग आहेत. या संविधानाने स्पॅनिश व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्यही दिले आहे.
शासनव्यवस्था
स्पेन तांत्रिकदृष्ट्या लोकशाही देश असला तरी वस्तुतः तो संवैधानिक राजेशाही प्रकारात मोडतो. राजेपद वंशपरंपरागत असून सत्ता द्विगृही संसदच्या (कोर्तेस जनरालेस) हातात आहे. राष्ट्राध्यक्ष सर्वसत्ताधिकारी असून त्याला मंत्रीमंडळ कारभारात मदत करते. संसदीय निवडणुकांनतर राजा राष्ट्राध्यक्षपदासाठी संसदसदस्यांच्या संमतीने त्यातील एका सदस्याची निवड करतो.
संसदेचे कनिष्ठ गृह, जेथे कायदे केले जातात, ३५० सदस्यांचे काँग्रेसो दि लॉस दिप्युतादोस आहे. हे गृह भारताच्या लोकसभेसारखे आहे व त्यातील सदस्यांची निवड थेट गुप्त मतदानाने देशातील प्रजा करते. वरिष्ठ गृह (राज्यसभासमान) २५९ सदस्यांचे सेनादो असून त्यातील २०८ सदस्यांची निवड थेट होते तर ५१ इतर सदस्यांची नेमणून प्रत्येक राज्यातील विधानसभा करते. दोन्ही गृहांची मुदत चार वर्षे असते.
द्वितीय उपराष्ट्राध्यक्ष आणि अर्थमंत्री - एलेना साल्गादो
तृतीय उपराष्ट्राध्यक्ष आणि गृहमंत्री - मनुएल शावेस
मंत्रीमंडळ
कॉन्सेहो दि मिनिस्त्रोस - राष्ट्राध्यक्षाच्या संमतीने राजाकडून नेमणूक
स्पेन स्वतंत्र राज्यांचा संघदेश (एस्तादो दि लास ऑतोनोमियास) असून येथील सत्ताव्यवस्था स्वित्झर्लंड, जर्मनी व बेल्जियमप्रमाणे विकेंद्रीत आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेकडे संसदेप्रमाणे अधिकार असून त्या त्या राज्यातील शिक्षण, स्वास्थ्य व इतर अनेक बाबतीत पूर्णाधिकार असतात. बास्क आणि नव्हारे राज्यांना आपआपली अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे सांभाळण्याचीही मुभा आहे. बास्क आणि कातालोनियामध्ये स्वतंत्र पोलिसदल असून त्यांची बांधिलकी राष्ट्रीय सुरक्षादलांशी नाही.
सीमावाद
स्पेनने दावा केलेले इतर देशांचे भाग
स्पेनने जिब्राल्टरवर दावा केला आहे. हा ६ किमी२चा भाग युनायटेड किंग्डमने १७०४मध्ये स्पेनकडून जिंकून घेतला होता. इबेरियन द्वीपकल्पाचे हे दक्षिण टोक स्पेनने स्पॅनिश भाऊबंदकीच्या युद्धात गमावले होते. जिब्राल्टरसह जिंकलेले मिनोर्का बेट युनायटेड किंग्डमने १८०२ मध्ये एमियेन्सच्या तहानुसार स्पेनला परत केले. १७१३ च्या उत्रेचच्या तहानुसार स्पेनने जिब्राल्टर कायमचे ब्रिटनला दिले[२५] पण जर ब्रिटनने जिब्राल्टर सोडायचे ठरवले तर ते परत स्पेनकडे येईल अशी अट घातली. परंतु १९४०पासून स्पेनने युनायटेड किंग्डमकडे सातत्याने जिब्राल्टर परत करण्याची मागणी केली आहे. जिब्राल्टरच्या रहिवाश्यांना स्पेनमध्ये विलीन होणे पसंत नाही.[२६]संयुक्त राष्ट्रांनी स्पेन व युनायटेड किंग्डमला ही बाब आपसात मिटवण्याचे आवाहन केले आहे.[२७]
जागतिक बँकेच्या आकड्यांनुसार स्पेनचे अर्थतंत्र जगातील नवव्या क्रमांकाचे तर युरोपमध्ये पाचव्या क्रमांकाचे आहे. सी.आय.ए.च्या आकडेवारीनुसार २००७ मधील राष्ट्रीय उत्पन्न १४,३९,००,००० अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ७० अब्ज अब्ज रुपये) होते. दरमाणशी वार्षिक उत्पन्न अंदाजे ३३,५०० अमेरिकन डॉलर (१,६७,००० रुपये) इतके होते. येथील अर्थतंत्रवाढीचा दर ३.८% होता. स्पेन जगात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.[२८] येथे बेरोजगारीचे प्रमाण ७.६% आहे. हे प्रमाण १९९० च्या दशकात २०% पर्यंत पोचले होते. स्पेनमध्ये चलनवाढीचा दर जास्त आहे[२९] तसेच दोन नंबरचा पैसाही मुबलक प्रमाणात आहे.[३०] येथील शिक्षणव्यवस्था जगातील इतर देशांच्या मानाने यथातथाच आहे.[३१]
१९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान होजे मारिया अझनारच्या सरकारने प्रयत्नपूर्वक स्पेनला युरो वापरणाऱ्या देशांच्या रांगेत बसवण्यात यश मिळवले. युरोपमधील देशांच्या मानाने स्पेनचे अर्थतंत्र अधिक चांगल्या स्थितीत असल्याचे मानले जाते.[३२] कदाचित त्यामुळे परदेशी गुंतवणूकीचे प्रमाण येथे जास्त आहे.[३३]
गेल्या चाळीस वर्षांत स्पेनच्या पर्यटन उद्योगाला भरभराट आली आहे व ४० अब्ज युरो (२५० अब्ज रुपये) उलाढाल असलेला हा उद्योग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आहे.[३४][३५] गेल्या काही वर्षांत स्पेनच्या बांधकाम उद्योगाचा मोठा विकास झाला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा एक षष्ठांश भाग हा उद्योग पुरवतो व देशातील १२% कामगारांना या एका उद्योगाने रोजगार पुरवला आहे.[३४] पण याचबरोबर घरांच्या किंमती अतिशय वाढल्याने वैयक्तिक देण्यांचे प्रमाणही मोठे झाले आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांत देण्याचे प्रमाण वार्षिक उत्पन्नाच्या सव्वापट झाले आहे.[३६] २००८/०९ च्या जागतिक मंदीमध्ये स्पेनच्या बांधकाम क्षेत्रातही मोठी मंदी आली आहे. युरोपीय संघातील एका गटाने याचे भाकित केले होते.[३७] स्पेनच्या अर्थमंत्र्यांच्या मते गेल्या ५० वर्षांतले सगळ्यात मोठे आर्थिक संकट आता येऊ घातले आहे.[३८] सरकारी अंदाजाप्रमाणे येथील बेरोजगारी १६% पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर इतर गटांचे मत हा आकडा २०% असेल असे आहे.[३९]
^युरोपीय महासंघाचा सदस्य म्हणून .eu आणि कातालान भाषिक प्रदेशात .cat हे प्रत्यय वापरले जातात.
^स्पॅनिश घटनेत स्पेनच्या अधिकृत नावासंबंधी कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. स्पेनसंदर्भात बोलताना साधारणत: एस्पान्या (España), स्पेन (Spain), स्पॅनिश राज्य (Estado español), स्पॅनिश राष्ट्र (Nación española) असा उल्लेख केला जातो. इ.स. १९८४ मध्ये स्पेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने "आंतरराष्ट्रीय करारांमध्ये स्पेनचा "स्पेन" किंवा "स्पेनचे प्रजातंत्र" यांपैकी कोणताही उल्लेख अधिकृत समजला जाईल" अशी घोषणा केली.
^रोमन अभिजन वर्गाकडून पाळली जाणारी जमीन मालकीची पद्धत (लातिफुन्दिया) तत्कालीन इबेरियन जमीन मालकीच्या पद्धती ऐवजी वापरली जाऊ लागली.
^इ.स. ७३२पर्यंत बर्बर सैन्याची आगेकूच उत्तरेकडे सुरू राहिली आणि शेवटी मध्य फ्रान्समधल्या तोर्स येथील युद्धात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
^उत्तर स्पेनमधला मध्य मेसेता हा भाग अरबांनी बर्बरांना राहण्यासाठी दिला होता. बर्बरांनी पुढे या राहण्यास अवघड असलेल्या भागात स्थायिक होण्याचे प्रयत्न सोडून दिले.
^स्पेनमधल्या मुस्लिम राजवटीच्या प्रभावामुळे मध्ययुगीन युरोपातील शहरांच्या वाढीस आणि सांस्कृतिक विकासास चालना मिळाली; मात्र युरोपातील शहरे तत्कालीन कोर्दोबा शहराच्या पातळीवर येईपर्यंत १२वे शतक उजाडले.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.