जर्मनीमध्ये १६ घटक राज्यांचा[५] समावेश आहे, ज्याचा क्षेत्रफळ ३५७,३८६ चौरस किलोमीटर (१३७,९८८ चौरस मैल) आहे[६], आणि मोठ्या प्रमाणात समशीतोष्ण हंगामी हवामान आहे. ८३ दशलक्ष रहिवासी असलेला हा रशियानंतरचे युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि संपूर्णपणे युरोपमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले देश तसेच [[युरोपियन संघ|युरोपियन महासंघाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहे. जर्मनी हा अतिशय विकेंद्रित देश आहे. त्याचे राजधानी आणि सर्वात मोठे महानगर बर्लिन आहे, तर फ्रॅंकफर्ट ही आर्थिक राजधानी म्हणून काम करते आणि देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे.
शास्त्रीय पुरातन काळापासून विविध जर्मन जमाती आधुनिक जर्मनीच्या उत्तर भागात वसलेल्या आहेत. १०० शतकापासून जर्मनिया नावाच्या प्रदेशाचे दस्तऐवजीकरण केले गेले. दहाव्या शतकापासून जर्मन प्रांतांनी पवित्र रोमन साम्राज्याचा मध्यवर्ती भाग बनविला[७]. सोळाव्या शतकादरम्यान, उत्तर जर्मन प्रदेश प्रोटेस्टंट सुधारणेचे केंद्र बनले. पवित्र रोमन साम्राज्याचा नाश झाल्यानंतर, १८१५ मध्ये जर्मन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली. १८४८-४९ च्या जर्मन क्रांतीमुळे फ्रॅंकफर्ट संसदेने मोठे लोकशाही हक्क स्थापित केले. १८७१ मध्ये, बहुतेक जर्मन राज्ये प्रशिया-बहुल जर्मन साम्राज्यात एकत्र आली तेव्हा जर्मनी एक राष्ट्रराज्य बनले. पहिले महायुद्ध आणि १९१८-१९ च्या क्रांतीनंतर साम्राज्याची जागा संसदीय वायमार प्रजासत्ताकाने घेतली . १९३३ मध्ये नाझींच्या सत्तेमुळे जबरदस्तीने हुकूमशाही, दुसरे महायुद्ध आणि होलोकॉस्टची स्थापना झाली. युरोपमधील दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि मित्रराष्ट्रांच्या उद्योगाच्या कालावधीनंतर म्हणजे शीतयुद्धाच्या काळात जर्मनीची फाळणी होऊन दोन नवीन जर्मन देश स्थापन झाले: पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी.पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासाठी बर्लिनमध्ये भिंत बांधली गेली. १९८९ च्या क्रांतीनंतर मध्य आणि पूर्व युरोपमधीलसाम्यवादी राजवट संपली आणि बर्लिनची भिंत पडल्यानंतर ३ ऑक्टोबर[६]
१९९० रोजी देशाचे पुन्हा एकत्रीकरण झाले.
आज, जर्मनीचे सार्वभौम राज्य म्हणजे कुलगुरूंच्या नेतृत्वात संघीय संसदीय प्रजासत्ताक आहे. मजबूत अर्थव्यवस्था असलेली ही एक महान शक्ती आहे; जीडीपीनुसार जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि पीपीपीने पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कित्येक औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून, जगातील तिसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आणि वस्तू आयात करणारा देश आहे. अत्यंत उच्च दर्जाचेजीवनमान असलेला एक विकसित देश म्हणून, तो सामाजिक सुरक्षा आणि सार्वभौमआरोग्यसेवा प्रणाली, पर्यावरणीय संरक्षण आणि शिक्षण-मुक्त विद्यापीठ शिक्षण देते. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी हे १ १९५७ मध्ये युरोपियन आर्थिक [८] समुदायाचे संस्थापक सदस्य आणि १९९३ मध्ये युरोपियन महासंघाचे संस्थापक सदस्य होते. ते शेंजेन क्षेत्राचा भाग आहे आणि १९९९ मध्ये युरोपियन महासंघाचा सह-संस्थापक बनले. जर्मनी देखील संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे, नाटो, जी ७, जी -२० आणि ओईसीडी आपल्या प्रदीर्घ आणि समृद्ध सांस्कृतिक इतिहासासाठी परिचित, जर्मनी हे कला, विज्ञान आणि मानविकी क्षेत्रातील प्रभावी लोकांचे सतत घर आहे. जर्मनीमध्ये बऱ्याच जागतिक वारसा स्थाने आहेत आणि जगातील सर्वोच्च पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
जर्मानिया हे नाव रोमन लोकांनी ऱ्हाइन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु 'जर्मनी' हे नाव बहुतकरून इंग्लिशभाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशांत वापरले जाते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख 'डोईशलॅंड' या नावाने करतात.
इसवी सनाच्या ९ व्या शतकापासून ते १९ व्या शतकाच्या सु्रुवातीपर्यंत जर्मनी हा पवित्र रोमन साम्राज्याचा भाग होता. याची स्थापना रोमन सम्राट शार्लमेन याने केली होती. हे साम्राज्य इ.स. १८०६ पर्यंत विविध प्रकारे अस्तित्वात होते. उत्तरेस आयडर नदीपासून दक्षिणेस भूमध्य समुद्रापर्यंत भूप्रदेश व्यापलेल्या या साम्राज्यास जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य ("Sacrum Romanum Imperium Nationis Germanicæ") असेदेखील म्हणत.
इ.स. १३५६ मध्ये गोल्डन बुल नावाचा करार झाला आणि अनेक राज्ये व सरंजामशाहीत विभागलेल्या साम्राज्याला एक संविधान मिळाले. या करारात सात राज्ये मिळून सर्वांत शक्तिशाली राजाला सम्राट म्हणून मान्यता देतील व मुख्य बिशपाची निवड होईल असे ठरले. १६ व्या शतकामध्ये साधारणतः ऑस्ट्रियाच्याहाब्सबुर्ग घराण्यानेच या निवडणुकीवर प्रभाव राखला.
यानंतर युरोपात मार्टिन ल्यूथरच्या नावाने एक धार्मिक वादळ आले. त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या अन्यायी कारभारावर जाहीर टीका केली आणि प्रोटेस्टंट चळवळ उदयास आली. सन १५३० नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोस्टेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे जर्मनीत गृहयुद्ध सुरू झाले (इ.स. १६१८ - इ.स. १६४८). वेस्टफालिया शांती करारामुळे हे धार्मिक युद्ध संपुष्टात आले पण साम्राज्याची अनेक राज्ये, संस्थाने यांमध्ये विभागणी झाली. इ.स. १७४० नंतर ऑस्ट्रियन राज्य आणि प्रशियन राज्य या राज्यांची जर्मन राजकारणावर पकड राहिली. इ.स. १८०६ मध्ये नेपोलियनच्या आक्रमणानंतर पवित्र रोमन साम्राज्य संपुष्टात आले.
जर्मन साम्राज्य (सन १८७१ - सन १९१८)
अनेक राज्ये आणि संस्थानांमध्ये विभाजित असलेल्या जर्मनीचे १८७१ मध्ये एकत्रीकरण करण्यात आले. फ्रेंचाना फ्रांको - प्रशियन युद्धात पराभूत करून जानेवारी १८, १८७१ मध्ये नव्या जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात आली. प्रशियन राज्यकर्त्यांचे ह्योहेनत्सोलर्न घराणे साम्राज्याचे राज्यकर्ते बनले व बर्लिन शहर नव्या साम्राज्याची राजधानी झाले. या साम्राज्यात बहुतेक सर्व जर्मनभाषिक भागांचा (ऑस्ट्रिया सोडून) समावेश करण्यात आला. साधारणपणे इ.स. १८८४ मध्ये जर्मनीने आपल्या वसाहती जर्मनीबाहेर वसवण्यास सुरुवात केली. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनीला या स्पर्धेमध्ये उतरण्यास खूप उशीर झाला होता.
जर्मन साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात सम्राट विल्हेम पहिला याने जागतिक पातळीवर जर्मनीला महासत्ता म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विल्हेम दुसरा याच्या अधिपत्याखाली जर्मनीने इतर युरोपीय देशांप्रमाणे साम्राज्यवादी धोरण स्वीकारले. साहजिकच जर्मनीचे शेजारी देशांशी खटके उडू लागले. यातच फ्रान्स व ब्रिटनने आपापसात सांमजस्याचा तह (Entente Cordiale) केला तसेच रशियाशीही तह केला. यामुळे हळूहळू जर्मनी युरोपीय राजकारणात एकटा पडू लागला.
जर्मनीचा साम्राज्यवाद आता युरोपाबाहेर पोहोचला. बर्लिन कॉन्फरन्स नंतर युरोपीय देशांनी आफ्रिकेची आपापसात विभागणी करून घेतली. जर्मनीने पूर्व आफ्रिका, टोगो, कॅमेरुन या देशांतील काही भूभाग मिळवून वसाहती स्थापन केल्या. आफ्रिकेत नाक खुपसल्यामुळे इतर साम्राज्यवादी देशांमध्ये जर्मनीविरुद्ध वातावरण तयार झाले. त्याची परिणती पहिल्या महायुद्धात झाली.
जून१९१४ मध्ये ऑस्ट्रियन राजपुत्र फ्रांत्स फेर्डिनांड याची सर्बियन राष्ट्रवाद्यांकडून सारायेवो येथे हत्या झाली आणि युद्धाला तोंड फुटले. एकमेकांशी असलेल्या करारांमुळे अनेक देश या युद्धात सामील झाले आणि पाहता पाहता पहिले महायु्द्ध सुरू झाले. इतिहासातील सर्वाधिक विनाशकारी युद्धांमध्ये या युद्धाची गणना होते. जर्मनीला या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. अंतर्गत घडामोडी व उठावांमुळे जर्मनीतील राजेशाही संपुष्टात आली आणि जर्मन सम्राट व इतर राज्यकर्त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. नोव्हेंबर ११, १९१८ रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. जून १९१९ मधील व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर अनेक जाचक व अपमानकारक अटी लादण्यात आल्या; ज्यामुळे पुढील काळात नाझीवाद फोफावण्यास मदत झाली आणि दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली.
व्हर्सायच्या तहातील जाचक अटींमुळे जर्मनीत आर्थिक मंदीची लाट आली. नव्याने स्थापन झालेल्या प्रजासत्ताकाला राजकीय अस्थिरतेचा शाप होता. त्यातच भर म्हणून अनेक राजेशाही समर्थकांनी लष्करामुळे नव्हे तर अतंर्गत उठावांमुळे पराभव स्वीकारावा लागला असे पसरवले. त्याचा फायदा नाझी पक्षासारख्या पक्षांनी घेतला. त्याचप्रमाणे डाव्यांच्या धोरणांमुळेही राजकीय अनागोंदीत भर पडली. अनेक राजकीय हत्यांमुळे हा काळ गाजला. निमलष्करी दलांनी राजकीय पक्षांच्या प्रेरणेने अनेक ठिकाणी दडपशाही सुरू केली. मंदी आणि राजकीय अस्थिरतेमुळे जागोजागी हिंसाचार माजला. नाझींनी सार्वत्रिक निवडणु्कीत जर्मनीला मंदीतून बाहेर काढण्याचे आणि पहिल्या महायुद्धापूर्वीची समृद्धी आणण्याचे वचन दिल्यामुळे या पक्षाला लोकांनी निवडून दिले. जानेवारी १९३३ मध्ये राष्ट्रपती पाउल फॉन हिंडनबुर्ग यांनी एडॉल्फ हिटलर याची जर्मनीचा चॅन्सेलर म्हणून निवड केली.
नाझी राजवट व दुसरे महायुद्ध (इ.स. १९३३ - इ.स. १९४५)
फेब्रुवारी २७, इ.स. १९३३ रोजी जर्मन संसदेच्या इमारतीला आग लागली. राजकीय अनागोंदीमुळे विरोधकांनी ही आग लावल्याचा आरोप ठेवून हिटलरने स्वतःकडे सर्वाधिकार देण्याचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवला. या प्रस्तावाचे नाव सशक्तीकरण कायदा (Ermächtigungsgesetz) असे होते. या कायद्यानुसार सर्वाधिकार जर्मनीच्या मंत्रिमंडळाला आणि पर्यायाने हिटलरला देण्यात येणार होते. कायद्याच्या तरतुदीमुळे जर्मनीचे मंत्रिमंडळ संसदेच्या संमतीविना कायदे मंजूर करू शकत होते. या कायद्याला २३ मार्च १९३३ रोजी मंजूरी मिळाली. या प्रस्तावाला फक्त एस.पी.डी या पक्षाने विरोध केला. कम्युनिस्टांचा विरोध हिटलरने त्यांची रवानगी कारागृहात करून मोडून काढला. अनेक राजकीय विरोधकांचा काटा या काळात काढण्यात आला. सर्वाधिकार हातात आल्यामुळे हिटलरने सार्वजनिक तसेच खासगी औद्योगिक क्षेत्राभोवती फास आवळला. कारखान्यांना लष्करी माल बनवण्यास भाग पाडले. सुरुवातीला हिटलरच्या धोरणांमुळे देश मंदीतून बाहेर पडण्यास मदत झाली, परंतु हिटलर जर्मनीला युद्धाच्या विनाशकारी गर्तेकडे ओढून नेत होता. इ.स. १९३६ मध्ये हिटलरने ऱ्हाइनलांडमध्ये लष्करी हस्तक्षेप केला. तसे करणे आवश्यक होते असे समर्थन पुढे केले गेले. इ.स. १९३८ पर्यंत चेकोस्लोव्हेकियातीलसुडेटेन प्रांतातील हस्तक्षेप आणि मुसोलिनीबरोबरचा मैत्रीचा करार यामुळे युद्धाचे वातावरण तयार होत गेले. यातच खबरदारी म्हणून हिटलरने रशियाबरोबर यु्द्ध न करण्याबाबत समझोता केला (जो त्याने नंतर मोडला).
ब्रिटेन आणि फ्रांसने जर्मनीला आधीच बजावले होते कि जर जर्मनिने चेकोस्लोवाकियाचा सुडेटेनलॅंड मिळाल्या नंतर परत कुठल्याही देशावर हल्ला केला, तर जर्मनीवर युद्ध पुकारण्यात येईल. इ.स. १९३९ मध्ये विविध कारणे पुढे करून जर्मनीने पोलंडविरुद्ध युद्ध पुकारले. याची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटेन आणि फ्रांसने जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. हिटलरने थोड्याच दिवसांत पोलंड पादाक्रांत केला तसेच फ्रान्सवर आक्रमण करून फ्रान्स जिंकला. इ.स. १९४१ पर्यंत युरोपातील बहुतेक भाग हिटलरच्या नियंत्रणाखाली आला.
हिटलरचा काळ दुसरे महायु्द्ध आणि ज्यूंच्या सामूहिक कत्तलींसाठी ओळखला जातो. त्याने ज्यू लोकांचे अटकसत्र सुरू केले व त्यांची रवानगी छळछावण्यांत केली. छळछावण्यांत त्यांचा क्रूरपणे छळ करण्यात आला. जे काम करण्यास सक्षम नाहीत अशांना गॅसचेंबरमध्ये कोंडून ठार मारण्यात आले. म्युनिकजवळीलडखाउ येथे अशी एक छळछावणी आहे. हिटलरने जिंकलेल्या देशांमध्येदेखील छळछावण्या उभारल्या. खासकरून पोलंडमध्ये केलेल्या कत्तलींमध्ये ३० लाख ज्यू नागरिकांची हत्या करण्यात आली.
जून २२, १९४१ रोजी हिटलरने रशियाबरोबर केलेला युद्धबंदीचा करार मोडीत काढला आणि रशियावर हल्ला चढवला. याच सुमारास जपाननेअमेरिकेच्यापर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. जर्मन लष्कराला रशियामध्ये सु्रुवातीला झटपट यश मिळत गेले परंतु स्टालिनग्राडच्या युद्धात नाझी सैन्याला प्रंचड नुकसान सहन करावे लागले आणि युद्धाची चक्रे उलटी फिरू लागली. अमेरिका व ब्रिटनचे सैन्य नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरले आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही मोर्च्यांवर नाझी फौजांना माघार घ्यावी लागली. सरतेशेवटी मे ८, १९४५ रोजी रशियन फौजा बर्लिनमध्ये घुसल्या व नाझी फौजेचा पाडाव झाला. हिटलरने शरण येउन बंदिवासात राहण्यापेक्षा आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि युद्ध संपुष्टात आले.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची प्रचंड हानी झाली. युद्धसमाप्तीपर्यंत जर्मनीचा भूभाग ४ देशांनी व्यापला होता. या चार राज्यकर्त्यांनी बर्लिनला चार भागांमध्ये विभागले. त्यांपैकी तीन भाग जे ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेच्या ताब्यात होते ते एकत्र करून मे २३, १९४९ रोजी त्याचे पश्चिम जर्मनी (Federal Republic of Germany - FRG) असे नामकरण करण्यात आले, तर ऑक्टोबर ७, १९४९ रोजी सोविएत संघाच्या ताब्यातील भाग पूर्व जर्मनी (German Democratic Republic - GDR) म्हणून जाहीर करण्यात आला.
पश्चिम जर्मनीने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त मदतीने महायुद्धानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली, तर पूर्व जर्मनीने सोविएत महासंघाच्या पावलावर पाऊल टाकून आर्थिक व सामाजिक वाटचाल केली. परिणामतः पूर्व आणि पश्चिम जर्मनीदरम्यान ४० वर्षांत खूप मोठा आर्थिक फरक निर्माण झाला. पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पळून जाणाऱ्यांना रोखण्यासाठी इ.स. १९६१ मध्ये बर्लिनची भिंत उभारण्यात आली. परंतु या भिंतीने इ.स. १९६० व १९७० च्या दशकांत शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोविएत महासंघातील तेढ वाढवण्याचेच काम केले.
इ.स. १९८० च्या दशकात पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत होणाऱ्या स्थंलातराचा प्रश्न गंभीर झाला. परिस्थिती जरा निवळावी म्हणून पूर्व जर्मनीने इ.स. १९८९ मध्ये स्थलांतरासंदर्भातील निर्बंध कमी केले. परिणामतः जर्मनीच्या एकीकरणाला चालना मिळाली. सरतेशेवटी ऑक्टोबर ३, १९९० रोजी पूर्व व पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र झाले. ऑक्टोबर ३ हा दिवस जर्मनीत आता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
जर्मनीच्या उत्तरेला उत्तर समुद्र, डेन्मार्क आणि बाल्टिक समुद्र , पूर्वेला पोलंड आणि चेक प्रजासत्ताक , दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड आणि पश्चिमेला फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलंड आहे. एकूण भूभागापैकी ५३.५% भूभाग शेती व तत्सम उद्योगांसाठी वापरला जातो. जंगलांनी २९.५% भाग व्यापलेला आहे तर १२.३% भागावर नागरी वस्ती आणि रस्ते आहेत. १.८% भाग पाणथळ जमीन व नद्या आणि उर्वरीत २.४% भाग नापीक, ओसाड आणि मानवी वापरामुळे दूषित झालेल्या जमीनीने व्यापला आहे.
जर्मनीचे हवामान हे सर्वसाधारणपणे पश्चिम युरोपीय हवामान या प्रकारात मोडते. जर्मनीचे हवामान गल्फस्ट्रीम या सागरी प्रवाहामुळे नियंत्रित होते. यामुळे याच अक्षांक्षावरील इतर देशांप्रमाणे (कॅनडा, रशिया इत्यादी) जर्मनीत फार टोकाचे हवामान अनुभवायास मिळत नाही. सततचा पाऊस, ढगाळ आकाश हे येथील हवामानाचे ठळक वैशिष्ट्य.
एका वर्षात साधारणपणे ४ ऋतू अनुभवायला मिळतात. साधारणपणे मार्च ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत वसंत (frühling) भरात असतो. वर्षातील सर्वोत्तम हवामान या दिवसांत अनुभवायास मिळते. अचानक बदलणारे निर्सगाचे रूप हे या ऋतूचे वैशिष्ट्य. सर्वत्र झाडावर फुलणारी पालवी आणि जमीनीवर आच्छादलेले फुलांचे गालिचे असतात.
मे महिन्याच्या मध्यापासून ऑगस्टपर्यंत सौम्य उन्हाळा असतो. तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत असते. या काळात दिवस अतिशय मोठा म्हणजे साधारणपणे १६ ते १८ तासांपर्यंत असतो.
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा पानगळीचा (herbst) काळ असतो. प्रथम झाडांच्या पानांचा रंग बदलतो. कालांतराने पाने पूर्ण पिकून गळून पडतात. प्रत्येक झाडावरील पानांची छटा वेगवेगळी असते. या दिवसांत सरासरी तापमान कमी होण्यास सुरुवात होते आणि कडक थंडीची चाहूल लागते.
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडक हिवाळा असतो. या दिवसांत किमान तापमान -५ ते -७ पर्यंत जाते व कमाल तापमान ३ ते ४ अंश सेल्सियस असते. त्यामुळे दिवसा देखील अत्यंत कडक थंडीचा अनुभव घेता येतो. तापमान अतिशय कमी असल्याने येथील तळी गोठतात. या दिवसात नियमीतपणे बर्फवृष्टी हो्ते. बर्फवृष्टीचे प्रमाण दक्षिण जर्मनीतील बायर्न व बाडेन व्युर्टेनबर्ग या राज्यांत जास्त आहे. आल्प्स पर्वतालगतच्या प्रदेशात सर्वाधिक बर्फवृष्टी होते.
मोठी शहरे
जर्मनीत सुमारे ८० मोठी शहरे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या १ लाख किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. त्यांपैकी १४ शहरांची लोकसंख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे. जर्मनीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येची घनता जास्त असूनही इतर प्रगत देशांप्रमाणे किंवा भारत, चीनमधल्या शहरांसारखी प्रचंड लोकवस्तीची शहरे इथे नाहीत. कारण शहरी व ग्रामीण भागात उद्योगधंदे, शिक्षणाच्या सोयी, उत्पन्नच्या सोयी यांचे प्रमाण थोड्याफार फरकाने सारखेच असल्यामुळे जर्मनीची लोकसंख्या मोठी शहरे, छोटी शहरे आणि लहान गावांमध्ये जवळपास सारख्या प्रमाणात विभागली गेली आहे. मोठ्या व छोट्या शहरातील राहणीमानात फारसा फरक नाही. मात्र प्रचंड लोकवस्तीची शहरे कमी जरी असली तरी सर्वसाधारणपणे लोकं मोठ्या शहराजवळच्या छोट्या शहरांत किंवा गावांमध्ये राहणे पसंत करतात; त्यामुळे शहर किंवा जिल्हापरिसराची एकूण लोकसंख्या त्यामानाने बरीच असते. रुहर परिसर हे याचे अतिशय उत्तम उदाहरण आहे.
जगातील अत्यंत प्रगत वाहतूक व्यवस्था असलेल्या देशांमध्ये जर्मनीचा समावेश होतो. युरोपातल्या आपल्या मध्यवर्ती स्थानामुळे इतर युरोपीय देशांच्या मानाने जर्मनीत वाहतुकीची घनता बरीच जास्त आहे. जर्मनीत महामार्गांचे अत्यंत दाट जाळे असून रस्त्यांची एकूण लांबी सुमारे ६,५६,१४० किमी आहे. येथील खास वेगवान वाहतुकीसाठी बनवलेल्या महामार्गांना ऑटोबान असे म्हणतात. बहुतेक सर्व शहरे ऑटोबानद्वारे जोडलेली आहेत. ऑटोबानचे वैशिष्ट्य म्हणजे जर्मनीत ऑटोबानवरून-काही धोकादायक भाग वगळता-गाडी चालवण्यासाठी कोणतीही कमाल वेगमर्यादा नाही. त्यामुळे बरेचदा इतर देशांतील चालक इथे येऊन आपली भरधाव गाडी चालवण्याची हौस पूर्ण करून घेतात. वेगमर्यादा नसूनही ऑटोबानवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण इतर युरोपीय देशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे[१०]. ऑटोबान वगळता जर्मनीत इतरही अनेक राष्ट्रीय महामार्ग आहेत ज्यांना बुंडेस्ट्रास्सेन Bundesstraßen (Federal road किंवा राष्ट्रीय महामार्ग) असे संबोधले जाते.
लोहमार्ग
जर्मनीत लोहमार्गांचे जाळेदेखील अत्यंत विकसित आहे. लोहमार्ग हा जर्मनीतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक प्रामुख्याने स्थानिक भूमिगत रेल्वेमार्गांनी (यु-बान) तर शहरांदरम्यान वाहतूक उपनगरीय रेल्वेमार्गांनी (एस-बान) होते. लांब पल्ल्याची आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आय.सी.ई. (इंटरसिटी एक्सप्रेस) द्वारे होते. ही गाडी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. साधारणपणे ताशी १६० ते ३०० किमी वेगाने पळणाऱ्या या गाडीचा समावेश जगातल्या मोजक्या अतिवेगवान रेल्वेगाड्यांमध्ये होतो.
जर्मनीतल्या रेल्वेमार्गांची एकूण लांबी सुमारे ४०,८२६ किमी आहे. दॉईचबान (Deutsche Bahn - जर्मन रेल्वे) ही जर्मनीतली सर्वांत मोठी आणि प्रमुख रेल्वे कंपनी आहे. दॉईचबानबरोबर इतर २८० खाजगी रेल्वे कंपन्या रेल्वेसेवा पुरवतात. रेल्वेसेवेचा दर्जा जर्मनीत अतिशय उत्तम आहे. लहानात लहान गावातही किमान दोन तासांनी एक गाडी असते.
विमानवाहतूक
रस्ते आणि रेल्वे यांच्या कार्यक्षम जाळ्यामुळे जर्मनीत देशांतर्गत विमानप्रवास फारसा होत नाही. विमानव्यवस्थेचा वापर मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होतो. बहुतेक शहरांमध्ये विमानतळ आहेत जे रेल्वेमार्गांनी जोडलेले आहेत. फ्रॅंन्कफुर्ट विमानतळ हा जर्मनीतला सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असून जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांमध्ये याचा समावेश होतो. हा विमानतळ युरोपीय आणि अटलांटिकपार (Transe Atlantic) विमानमार्गांवरचे मुख्य केंद्र आहे. लुफ्तान्सा ही जर्मन विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणारी प्रमुख कंपनी आहे. त्याखालोखाल जर्मन विंग्स, ऱ्हाइन एर या स्थानिक विमान कंपन्या युरोपांतर्गत सेवेसाठी प्रसिद्ध आहेत.
जलमार्ग
जर्मनीत काही प्रमाणात जलमार्गदेखील वाहतुकीसाठी वापरले जातात. जर्मनीतील ऱ्हाइन, एल्बा, डोनाउ (डॅन्यूब), माइन, इ. मोठ्या नद्यांमधून आणि कील, ऱ्हाइन-माइन-डॅन्यूब या कालव्यांमधून जलवाहतुक होते. हांबुर्ग हे युरोपातले दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील सातव्या क्रमांकावरचे सर्वांत मोठे बंदर आहे. आज जलमार्गांचा उपयोग प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी होत असला तरी मध्ययुगात जर्मनीतील वाहतूक मुख्यत्वे याच नद्यांतून होत असे.
सामाजिक
धर्म
ख्रिश्चन धर्म हा जर्मनीत सर्वांत मोठा धर्म आहे. सुमारे ५.३ कोटी लोक ख्रिश्चन धर्म पाळतात[११]. दुसरा क्रमांक इस्लामचा असून सुमारे ३३ लाख लोकं मुसलमान आहेत. यात प्रामुख्याने तुर्कस्तानमधून स्थायिक झालेल्यांचा समावेश जास्त आहे. बौद्ध व ज्यू धर्मीयांची संख्या प्रत्येकी २ लाख आहे तर हिंदुंची संख्या ९०,००० असून इतर धर्मांचे मिळून ५० हजारपेक्षा कमी अनुयाची आहेत.
जर्मनी ही प्रोटेस्टंट पंथाची जन्मभूमी आहे. उत्तर जर्मनीत या पंथाचे अनुयायी जास्त आहेत. रोमन कॅथोलिक पंथाचे लोक बहुतकरून नैऋत्य जर्मनीत आहेत. सध्याचे पोप बेनेडिक्ट १६ वे हे जर्मनीचे असून त्यांचा जन्म बव्हेरियामधला आहे[१२]. साधारणपणे २.४ कोटी लोकं कोणत्याही धर्माचे अनुयायी नसल्याचे सांगतात. यांपैकी बहुतांशी नास्तिक किंवा ऍगनोस्टिक असून ते पूर्व जर्मनीत बहुसंख्य प्रमाणात आहेत.
शिक्षण
जर्मनी शिक्षणाच्या बाबतीत अतिशय प्रगत राष्ट्र आहे परंतु शिक्षणपद्धत गुंतागुंतीची आहे. बालवाडीपासून ते विद्यापीठापर्यंत शिक्षण मोफत होते. मात्र इ.स. २००६ पासून जर्मन विद्यापीठांनी ५०० युरोपर्यंत सत्रशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
जर्मनीत माध्यमिक स्तरापर्यंत (भारतीय पद्धतीप्रमाणे १२ वी पर्यंत) शिक्षण घेणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास पालकांवर कारवाई होऊ शकते. शिक्षणाचे विविध स्तर, शाळांचे विविध प्रकार यामुळे शिक्षण घेण्याची गुंतागुंत वाढते.
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तर कमीअधिक प्रमाणात सगळीकडे सारखे असतात. त्यनंतर माध्यमिक स्तरात विविध प्रकारच्या शाळा असतात उदा: हाउप्ट शुले, रिआल शुले, जिमनासियम, गेसाम्ट शुले. या शाळांमधील प्रवेश अनेक निकषांवर अवलंबून असतो. ( उदा: घरापासूनचे अंतर).
माध्यमिक शिक्षण सुमारे १२ वर्षे असते. त्यानंतर विद्यार्थ्यांना होकशुले (प्रशाला), अथवा फाकहोकशुले (उच्च माध्यमिक शाळा) यांमध्ये प्रवेश घेता येतो.
हा स्तर साधारणपणे भारतातील कनिष्ठ महाविद्यालय अथवा पदविका (डिप्लोमा कॉलेज) प्रमाणे असतो. या स्तरात व्यावसायिक शिक्षणावर जास्त भर असतो. तसेच माध्यमिक शिक्षणा नंतर विद्यापीठात थेट प्रवेश घेता येतो.
विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा सर्वोच्च मानला जातो. विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रम साधारणपणे ५ वर्षांत पूर्ण करावा लागतो. विद्यापीठांमध्ये संपूर्ण शिक्षण हे जर्मन माध्यमातून मिळत होते, मात्र सध्या बहुतेक सर्व मुख्य विद्यापीठांनी इंग्रजी माध्यमातही शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामु़ळे जर्मनीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. सर्वांत जास्त विद्यार्थी हे दक्षिण अमेरिका आणि चीनमधून येतात. भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश हळूहळू वाढत आहे.
सणवार व उत्सव
जर्मनीची बहुतेक लोकसंख्या ख्रिश्चन असल्यामुळे ख्रिश्चन धर्मातील बहुतेक सण इथे साजरे होतात. मुख्य सण नाताळ अथवा ख्रिसमस असून त्याला जर्मन भाषेत वाइनाख्टन (weinachten ) असे म्हणतात. हा सण २४ डिंसेबर ते ६ जानेवरी या काळात साजरा होतो. ख्रिसमसच्या ३ आठवडे आधी लहान मुलांचा आवडता संत निकोलस अर्थात सांता क्लॉजचा सण साजरा होतो. त्यात लहान मुलांना खेळणी भेट दिली जातात व ख्रिसमस ट्री सजवले जाते. त्यातील महत्त्वाचे दिवस म्हणजे २४ - २५ डिंसेबर. या दिवशी जर्मन लोक येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतात. डिसेंबर ३१ला जर्मनीत सिल्व्हेस्टर (silvester) असे संबोधतात. या दिवशी जर्मन लोक धुमधडाक्यात नवीन वर्षाचे स्वागत करतात. जानेवारी ६लातीन राजांचा सण साजरा होतो. जर्मन लोक या दिवसांत शक्य तितका वेळ आपल्या कुटुंबासाठी देतात. नातेवईक तसेच मित्रांच्या वैयक्तिक भेटीगाठी अथवा सामूहिक मिलन व एकत्रित जेवण असे या सणाचे स्वरूप असते. या दिवसात जर्मनीत हिवाळा व सुट्या असल्याने जर्मन लोकांचे परदेशात पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढते.
यानंतरचा मुख्य सण इस्टर असून हा साधारणत: मार्च अथवा एप्रिलमध्ये असतो. वेगवेगळ्या प्रदेशातील रुढी व परंपरांनुसार हा सण साजरा होतो. अंडी रंगवणे ही त्यातील एक.
इतर सणांमध्ये मुख्य सण म्हणजे फाश्चिंग अथवा कार्निव्हल जो फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये साजरा होतो. याचे मुख्य स्वरूप म्हणजे विविध प्रकारच्या वेषभूषा करून लोक मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकी पाहणे एक आनंददायक अनुभव असतो.
इतर अनेक उत्सव उदा: वाइन फेस्टिवल, बियर फेस्टिवल अथवा ऑक्टोबरफेस्ट प्रसिद्ध आहेत. असे उत्सव देशभरात वर्षभर साजरे होत असतात.
खेळ हा जर्मनीतील लोकांचा अतिशय आवडीचा विषय आहे. बहुतेक जर्मन माणसे कुठल्याना कुठल्या खेळाशी संबंधित असतात. जर्मनांचा सर्वांत आवडता खेळ फुटबॉल आहे. जर्मनी तीन वेळा म्हणजे १९५४, १९७४ व १९९० मध्ये फुटबॉल विश्वविजेते; तर १९६६, १९८६, २००२ मध्ये उपविजेते झाले आहेत. गेर्ड म्युलर, फ्रांत्स बेकेनबाउअर, लोथार माथेउस, युर्गन क्लिन्समान, ओलिफर कान यांसारख्या दिग्ग्ज खेळाडूंनी जर्मन फुटबॉलला उंचीवर नेऊन ठेवण्यास हातभार लावला. प्रत्येक फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत जर्मनीला संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. फुटबॉलचे वेड राष्ट्रीय संघापुरते मर्यादित नसून हजारो छोट्या मोठ्या फुटबॉल क्लबांनी या खेळाचे व्यापक जाळे विणले आहे.
ऑलिंपिक स्पर्धेत आत्तापर्यंत मिळवलेल्या पदकांमध्ये जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. ऑलिंपिकमध्ये पदकांची सर्वाधिक कमाई जलतरण, डायव्हिंग, ऍथलेटिक स्पर्धा यांमध्ये होते. ऑलिंपिकमध्ये जर्मनीने आतापर्यंत सांघिक खेळांमध्येदेखील लक्षणीय यश मिळवले आहे. तसेच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेतसुद्धा जर्मनीची कामगीरी खूप लक्षणीय आहे.
जर्मनीत सध्या हॅंडबॉल हा झपाट्याने लोकप्रिय होणारा खेळ आहे. २००७ मध्ये हॅंडबॉलचे विश्वविजेतेपद जर्मनीने पटकावले.
हॉकी हा खेळ फारसा लोकप्रिय नसला तरी जर्मनीने त्यातही आपला दबदबा कायम ठेवला आहे. गेल्या दोन विश्वकरंडक स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवले होते. टेनिसमध्ये जर्मनीची सर्वोत्तम कामगिरी ८० व ९० च्या दशकात होती. याच काळात मायकेल स्टीश, बोरीस बेकर , स्टेफी ग्राफ या खेळाडूंनी जर्मनीला या खेळात मानाचे स्थान मिळवून दिले.
जर्मनीत अनेक रेसिंग ट्रॅक आहेत. कार रेसिंग मधील जगज्जेता मिखाएल शुमाखर व त्याचा भाउ राल्फ शुमाखर यांनी गेल्या काही वर्षांत लक्षणीय यश मिळवले आहे. जर्मनीचे अनेक संघ फॉर्म्युला-वन मध्ये आहेत. मर्सेडिज संघ त्यात आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी संघ आहे.
राजकारण
जर्मनीमध्ये संसदीय लोकशाही आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असूनही त्यांच्या हातात अधिकार मात्र कमी असतात. पंतप्रधान अथवा चान्सेलर हे प्रत्यक्ष राज्यकारभार चालवणारे पद आहे. बर्लिन येथील जर्मन संसद बुंडेसटाग या नावाने ओळखली जाते.
जर्मन राजकारणात समाजवादी लोकशाही पद्धतीने राजकारण चालवणाऱ्या पक्षांचे वर्चस्व आहे. त्यातील प्रमुख पक्ष एस.पी.डी. व सी.डी.यू.; मुख्यत्वे याच पक्षांदरम्यान राष्ट्रीय राजकारणात चुरस असते. सन २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांनी संयुक्तपणे सरकार स्थापन केले आहे.[१३]कम्युनिस्ट अथवा डाव्या विचारसारणीची जर्मनी ही जन्मभूमी असली तरी त्याचे प्राबल्य फारसे नाही. कुप्रसिद्ध नाझी विचारसारणीचे पक्ष आता जवळपास संपुष्टात आले आहे.
अर्थतंत्र
जर्मनी ही युरोपमधली सर्वांत मोठी तर अमेरिका, चीन, जपान आणि भारतापाठोपाठ जगातील पाचवी मोठी (GDP,PPP) आर्थिक महासत्ता आहे. जागतिक व्यापार संघटनेनुसार, जर्मनी हा जगातला प्रथम क्रमांकाचा, अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त निर्यात करणारा देश आहे. युरोपमधल्या बहुतेक देशांचा जर्मनी हा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे.
तरीदेखील बेरोजगारी आणि कमी प्रादेशिक मागणी या आर्थिक विकास खुंटवणाऱ्या समस्या जर्मनीला सतत भेडसावत राहिल्या आहेत. जर्मनीचे आर्थिक सल्लागार, बेर्ट ऱ्युरूप यांच्यानुसार, जर्मनीचे एकत्रीकरण हे जर्मनीच्या (इतर युरोपियन देशांच्या मानाने) विकासात मागे पडण्याचे मुख्य कारण आहे. पश्चिम जर्मनीच्या मानाने पूर्व जर्मनीमध्ये छोटे-मध्यम उद्योगधंदे फारसे नाहीत. इतर मोठया समस्या कामगारांवरील पगाराव्यतीरिक्त खर्च (नॉन-वेज लेबर कॉस्ट), क्लिष्ट कर संरचना, लालफितीचा कारभार आणि कामगारविषयक नियमन या आहेत.
जर्मनीचे आर्थिक उत्पन्न मुख्यत्वे (सुमारे ७० %) सेवा क्षेत्रातून येते. त्याखालोखाल औद्योगिक क्षेत्राचा वाटा आहे (२९.१ %) आणि कृषी-क्षेत्राचा वाटा केवळ ०.९ ते १ टक्के आहे. जर्मनीची बहुतेक उत्पादने ही अभियांत्रिकी असून यात मुख्य वाटा मोटारगाड्या व त्यांचे सुटे भाग यांचा आहे. त्याखालोखाल विविध प्रकारचे धातु व रासायनिक उत्पादने यांचा वाटा आहे. जागतिक स्तरावर जर्मनी अत्युच्च दर्जाची उत्पादने बनवण्यात अग्रेसर आहे. अलीकडे पवनचक्या, सौर-उर्जेची उपकरणे, विमानाचे काही सुटे भाग यांच्या उत्पादनात जर्मनीने मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली आहे. विविध क्षेत्रांतील (वैद्यकीय, छपाई, संगणक, इलेट्रोनिक्स, बांधकाम इ.) जर्मन उपकरणे जगभर निर्यात होतात. ग्राहक यामध्ये प्रामुख्याने जर्मन गुणवत्ता हा प्रमुख निकष पहातो.
जर्मनीने विज्ञान व संशोधनात बरीच प्रगती केली आहे. संशोधनाचा मुख्य भर तंत्रज्ञान विकसावर असतो. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान निर्यातिचा मोठा वाटा आहे. अनेक विकसनशील देशांत उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी (उदा: वाहन निर्मिती प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, पोलाद कारखाना इ.) जे तंत्रज्ञान व यंत्रे लागतात ते पुरवण्यात जर्मनी आघाडीवर आहे (उदा: उधे, कृप सारख्या कंपन्या).
जागतिक आर्थिक उदारीकरणानंतर अनेक जर्मन कंपन्यांनी जगभरातील विविध देशांमध्ये आपली उत्पादन केंद्रे चालू केली आहेत आणि या सर्व कंपन्या जर्मनीच्या आर्थिक सबलीकरणात हातभार लावतात. जर्मनीतली सर्व राज्ये कमीअधिक प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत. नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन या राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत. हॅम्बुर्ग राज्यात बंदरे असल्यामुळे ते सर्वाधिक श्रीमंत राज्य झाले आहे.
बाडेन-व्युर्टेंबर्ग व बायर्न या राज्यात वाहन व सुटेभाग निर्मिती प्रकल्प अधिक प्रमाणात आहेत. फ्रांकफुर्ट येथे शेअर बाजार असल्याने फ्रांकफुर्टला आर्थिक राजधानी मानले जाते. जर्मन शेअर बाजाराला डॅक्स(DAX) असे म्हणतात.
विज्ञान व तंत्रज्ञान
दुसऱ्या महायुद्धामध्ये जवळपास संपूर्ण जर्मनी बेचिराख झाला होता. या परिस्थितीतून बाहेर काढून जर्मनीला पुन्हा श्रीमंत करण्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. जर्मनीने अनेक शतकांपासून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. जर्मनीमधील विद्यापीठांचे ज्ञानदानाबरोबरच संशोधन हे एक महत्त्वाचे काम आहे. बहुतेक सर्व विद्यापीठांचा भर संशोधनावर असतो आणि विद्यापीठांचे उत्पन्न संशोधनावर व सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून असते.
विद्यापीठांप्रमाणेच फ्राउनहॉफर सारख्या खाजगी संस्थादेखील संशोधनात अग्रेसर आहेत.
तसेच उत्पादक देखील आपले उत्पादन सतत चांगल्या दर्जाचे आणि फायदेशीर कसे बनेल यावर सातत्याने संशोधन करत असतात. उत्पादकांच्या क्षमतेनुसार, ते स्वतः अथवा विद्यापीठातील उपलब्ध सोयी वापरून संशोधन करतात. विद्यापीठे स्वतःच्या क्षमतेवर उत्पन्न मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि उत्पादक आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवतो जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला अधिक किंमत मिळावी. विद्यापीठे व संशोधन संस्था या राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे जर्मनी केवळ उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवण्यात अग्रेसर नसून जगाला तंत्रज्ञान पुरवण्यातही आघाडीवर आहे.
संशोधनाचे साधारणपणे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे वैज्ञानिक संशोधन.
हे संशोधन मुख्यत्वे विद्यापीठे व राष्ट्रीय संशोधन संस्थेत होते. याला सरकारी अनुदान मिळते.
या संशोधनात मुख्य भर हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या व इतर मूलभूत शाखांमध्ये तसेच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, कला, तत्त्वज्ञान यांवर जास्त असतो. दुसरे म्हणजे तांत्रिक संशोधन, ज्यात सरकारी अनुदान त्यामानाने बरेच कमी असते आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान विकासावर जास्त भर असतो.
महत्त्वाचे शोध
१५ व्या शतकातील युरोपात सामाजिक परिवर्तन (रिनैसॉं) झाले आणि समाजात शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लागला. याच काळात जर्मनीत अनेक विद्यापीठे उदयास आली उदा: फ्रायबर्ग विद्यापीठ (स्थापना:इ.स. १४५७). इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सर्वच पश्चिम युरोपीय राष्ट्रांमध्ये औद्योगिकता वाढीस लागली. साम्राज्यावादामुळे सामरिक महत्त्व वाढवण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या देशांनी विज्ञानाचा उपयोग करून घेतला. जर्मनीने साम्राज्यवाद जरी बराच उशीरा अंगीकारला तरी शास्त्रीय व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. भौतिकशास्त्राचे आद्य शास्त्रज्ञ हे बहुतकरून जर्मनच होते. नील्स बोर, रॉबर्ट ओपनहायमर, मॅक्स प्लॅंक यांनी अणुच्या रचनेबद्दल महत्त्वाचे संशोधन केले. रसायनशास्त्रातील आवर्तसारणीमधल्या बहुतेक मूलद्रव्यांची नावे लॅटिन अथवा जर्मन आहेत[१४].
आइनस्टाईन पासून इ.स.२००७ मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पीटर ग्रुनबर्ग असे अनेक संशोधक जर्मनीच्या भौतिकशास्त्रातील योगदानाचा पुरावा देतात. कार्ल झाइसने सूक्ष्मदर्शकामध्ये केलेल्या सुधारणांमुळे जीववैद्यकीय शास्त्रात अमूलाग्र बदल झाला आणि आजची वैद्यकीय प्रगती शक्य झाली.
अभियांत्रिकीत जर्मनीची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे मोटरकार. मोटरकारसंबधित सुरुवातीचे सर्व मुख्य शोध जर्मनीत लागले. निकोलस ओटो[१५] ने बनवलेले इंजिन आजही मोटरगाड्या व दुचाकी वाहनांत वापरले जाते. ट्रक, बस, जीप अशा मोठ्या वाहनांमध्ये वापरले जाणारे डिझेल इंजिन हे जर्मनीत रुडोल्फ डिझेल[१६] ने प्रथमतः तयार केले. कार्ल बेंझने व त्यानंतर विल्हेम मेबाख आणि गोटलिब डाइमलर यांनी पहिल्या यांत्रिक गाड्या बनवण्याचा बहुमान मिळवला[१७]. जर्मनीने त्यावेळेस वाहन क्षेत्रात मिळवलेली मक्तेदारी आजही कायम आहे.
छपाई यंत्र हे जर्मनीचे अजून एक महत्त्वाचे योगदान आहे.
१५ व्या शतकात योहान गटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला[१८]. या यंत्रात नंतर वेळोवेळी झालेल्या सुधारणांदेखील जर्मनीतच झाल्या आहेत.
गणितातही जर्मनीने भरीव योगदान दिले आहे. गॉटफ्रिड लेब्निझ याने केलेले संशोधन आजच्या आधुनिक संगणकशास्त्राचा पाया समजला जातो.[१९]
संस्कृती
जर्मनीला कवी आणि विचारवंतांचा देश म्हणून संबोधले जाते. प्रत्येक जर्मन राज्याची आपली एक विशिष्ट संस्कृती आहे. जर्मन संस्कृतीची मुळे साम्राज्यस्थापनेच्या आधीपासूनच रुजली होती, ज्याचा विस्तार संपूर्ण जर्मन-भाषिक प्रदेशात (पोलंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंडसह) होता. त्यामुळे काही गोष्टी उदा. जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या मोझार्टचा कार्यकाळ हा जर्मन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
संगीत
युरोपीय अभिजात शास्त्रीय संगीतात जर्मनीचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेक महान संगीतकारांनी जर्मनीला संगीतात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. लुडविग व्हान बीथोवेन, योहान सेबास्टियन बाख, रिचर्ड वागनर हे जर्मनीतले आघाडीचे संगीतकार होऊन गेले. इतर युरोपीय देशांप्रमाणे जर्मनीतसुद्धा प्रत्येकजण एखादे वाद्य वाजविण्याची मनिषा बाळगून असतो. बहुतांश जर्मन नागरिक आपल्या शाळेच्या दिवसांत वाद्ये वाजवायला शिकतात, त्यामुळे बहुतेकांची संगीतविषयक जाणीव चांगली असते.
जर्मन लोक संगीताच्या मैफलींना अप्रतिम प्रतिसाद देतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संगीतकार जर्मनीमध्ये आपली कला सादर करण्यास उत्सुक असतात. पारंपारिक संगीताबद्दल नवीन पिढीची आवड सध्या कमी होत असली तरीही चांगली टिकून आहे. काही वर्षांपासून अमेरिकेच्या प्रभावामुळे रॉक व पॉप संगीत चांगलेच वाढीस लागले आहे.
साहित्य
जर्मन साहित्य हे इंग्रजी साहित्याखालोखाल संपन्न मानले जाते. अनेक अजरामर साहित्यकृतींनी संपन्न असलेल्या जर्मन साहित्याला सुमारे १,००० वर्षांचा इतिहास आहे. सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या देशांमध्ये जर्मनी ४ थ्या क्रंमाकावर आहे.[२०]
यातील बहुतेक लिखाण जर्मन भाषेत असते. जर्मनीतले लेखक इतर भाषांतील साहित्य आपल्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करत असतात.
युरोपमधल्या बहुतेक देशांप्रमाणे जर्मनीतही अनेक पर्यटन स्थळे आहेत.
मात्र फ्रांस, इटली, ग्रीस आणि स्वित्झर्लंडच्या मानाने जर्मनीला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. परंतु आशियाई देशांतील पर्यटक युरोप भ्रमंतीमध्ये जर्मनीचा बरेचदा समावेश करतात. जर्मनीतल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी बर्लिन हे राजधानीचे शहर सर्वांत जास्त पर्यटक आकर्षित करणारे शहर आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तु उदा.- ब्रांडेनबुर्गर टोर, जर्मन संसद बुंडेसटाग, शीतयुद्धाचे प्रतीक असलेली बर्लिनची भिंत, अमेरिकन आणि रशियन चेकपोस्ट ही मुख्य आकर्षणे आहेत. याशिवाय बर्लिन शहर हे आधुनिक स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
अनेक पर्यटक केवळ या कारणासाठी बर्लिनला भेट देतात.
ड्युसेलडॉर्फ व क्योल्न (कोलोन) ही शहरे येथील ऐतिहासिक वास्तुंसाठी प्रसिद्ध आहेत. बायर्न राज्याची राजधानी असलेले म्युनशेन (म्युनिक) शहर अनेक ऐतिहासिक वास्तु, राजवाडे, डखाउची छळछावणी, जर्मन संग्रहालय यांसाठी प्रसिद्ध आहे. ऑलिंपिक खेळांचे आयोजन झालेल्या या शहरात बायर्न म्युनशेनचे फुटबॉल मैदान, ऑलिंपिक मैदान ही मुख्य आकर्षणे आहेत.
बायर्न राज्यात आल्प्स पर्वतात निसर्गसौंदर्याने नटलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत. जर्मनीतल्या इतर पर्यटन स्थळांमध्ये न्वाईश्वानस्टाइन येथील राजवाडा क्युनिक से, जर्मनीतले सर्वांत उंच शिखर झुगस्पीट्झे, बोडनसे सरोवर , माइनाउ, ब्लॅक फॉरेस्ट आणि हांबुर्ग इत्यादिंचा समावेश होतो.
टीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.