हैती या देशाचे क्षेत्रफळ २७,७५० वर्ग किलोमीटर इतके असून लोकसंख्या ९.८ दशलक्ष आहे. या देशात गूर्ड हे चलन प्रचलित आहे. हैतीतील फक्त ४५ टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय भाषाफ्रेंच आहे.
हैती हा स्वातंत्र्य मिळालेला लॅटिन अमेरिकेतील सर्वात पहिला देश होता. या देशाला इ.स. १८०४ मध्ये फ्रेंचांच्या वसाहतींकडून स्वातंत्र्य मिळाले. येथील लोकसंख्येपैकी बहुतांश लोक कृष्णवर्णीय आहेत. उर्वरित नागरिक म्हणजे येथे स्थायिक झालेल्या फ्रेंचाच्या आणि गुलामंच्या वर्णसंकरातून जन्मलेली प्रजा आहे.
हैतीचे मुख्य उत्पादन कॉफी हे आहे. तसेच कापूस, कोको आणि तंबाखूचे उत्पादनही येथे मोठ्या प्रमाणात होते. या देशात बॅाक्साईट हे खनिज मोठ्या प्रमाणात सापडते. तसेच येथे पर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त केले जाते.
जानेवारी १२, इ.स. २०१० रोजी स्थानिक वेळेप्रमाणे संध्याकाळी ४:५३ वाजता हैती रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.० इतकी तीव्रता असलेल्या भूकंपाने हादरले. हा भूकंप मागील २०० वर्षांतील सगळ्यात तीव्र भूकंप होता..[१] यामुळे कॅरिबियन समुद्रातत्सुनामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.[२]
या भूकंपात हैतीमध्ये अतोनात नुकसान झाले. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळ असलेले राजधानीचे शहर पोर्ट-औ-प्रिन्स जमीनदोस्त झाले. हैतीतील बहुतांश इमारती बांधतानाच कमकुवत बांधल्यामुळे कोसळल्या. राष्ट्रपती महाल, संसद आणि राष्ट्रीय कॅथेड्रल या इमारतीही कोसळल्या. जमिनीखाली अंदाजे १० किमी केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे १ लाख पर्यंत व्यक्ती मरण पावल्याचा अंदाज आहे.