इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडलेल्या इरिट्रियावर मध्य युगीन काळात इथियोपियन व ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. इ.स. १८९० साली इटलीने येथे आपली पहिली वसाहत (इटालियन इरिट्रिया) स्थापन केली जी दुसऱ्या महायुद्धानंतर बरखास्त करण्यात आली. त्यानंतर इथियोपियाने ह्या भूभागावर आक्रमण करून तो बळकावला व इरिट्रिया इथियोपियाचा १४वा प्रांत बनला. इथ्योपियाच्या जुलुमी राजवटीस कंटाळलेल्या इरिट्रियाने १९६१ सालापासून सुमारे ३० वर्षे स्वातंत्र्यलढा चालू ठेवला ज्याला १९९१ साली यश मिळून इरिट्रियास स्वातंत्र्य मिळाले.
सध्या इरिट्रियामध्ये एकपक्षी अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत असून इसायास अफेवेर्की हा १९९१ सालापासून ह्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्याच्या राजवटीमध्ये इरिट्रियात सर्रास मानवी हक्कांची पायमल्ली होत असून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सततच्या युद्धांमुळे तसेच अनेक दशकांच्या गुलामगिरीमुळे इरिट्रियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून येथील जीडीपी वाढीचा दर केवळ २ टक्के आहे. ह्यामुळे इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे