पापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ भाषा वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे ब्रिटनची सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ अँड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.
सध्या पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.