पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली.
अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. येथील ३७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगत आहे.
इतिहास
एकेकाळी हे बेट पोर्तुगालचे एक व्यापारी ठाणे आणि वसाहत होते. हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनतेने पोर्तुगिजांविरोधी चळवळ सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी साम्राज्याने तिमोर लेस्टचा ताबा मिळवला. प्रथम पोर्तुगीज आणि नंतर जपानी शासकांनी केलेल्या अत्याचारी कारभारामुळे त्रस्त झालेल्या तिमोरी जनतेत असंतोष पसरून त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने जपानी सैन्यावर गनिमी हल्ले सुरू केले. जपान्यांनी सुमारे ४० हजार तिमोरींची हत्या करून बंडखोरांना शांत केले. परंतु तेवढ्यातच महायुद्धात जपानचा पराभव होऊन पुन्हा एकदा तिमोरचा ताबा पोर्तुगिजांनी घेतला. पोर्तुगिजांच्या या कारभारावरही तिमोरी स्वातंत्र्यवादी संघटना असंतुष्ट होत्या. त्यांच्या स्वातंत्र्यवादी आघाडीच्या नेत्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये पोर्तुगालचा अंमल झुगारून स्वतंत्र तिमोर लेस्ट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. यमात्र, त्याआधी दोन महिने पोर्तुगिजांनी तिमोरमधला कारभार आवरता घेतला होता.
पोर्तुगिजांचा तिमोर लेस्टवरचा अंमल संपल्यावर तिथे कम्युनिस्टांचे सरकार येईल या भीतीने पश्चिमेकडचा शेजारी देश इंडोनेशियाने १९७५ च्या डिसेंबरमध्ये आपले लष्कर पाठवून तिमोर लेस्टवर हल्ला केला. इंडोनेशियाने तिमोर लेस्टवर कब्जा करत १९७६ मध्ये तिमोर इंडोनेशियात समाविष्ट करून तो आपला २७ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. इंडोनेशियाने तिमोरवर बसवलेला अंमल पुढे सन १९९९पर्यंत टिकला. हा दोन दशकांहून अधिकचा काळ इंडोनेशियन सरकार व तिमोरी स्वातंत्र्यवादी क्रांतिकारी संघटना यांच्यातील संघर्षांचा होता. इंडोनेशियाचे लष्कर व तिमोरी बंडखोर संघटनांच्या सशस्त्र चकमकी आणि त्यातून सुमारे एक लाख तिमोरींचा मृत्यू यामुळे तिमोरी जनता पिचून गेली.
अखेरीस संयुक्त राष्ट्रांनी तिमोरी लोकांनी याबाबत सार्वमत घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले. सार्वमत इंडोनेशियाच्या विरोधात व तिमोर लेस्टच्या स्वातंत्र्याला अनुकूल मिळून २० मे २००२ रोजी तिमोर लेस्ट हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा झाली.