सायबेरिया (रशियन: Сибирь; लेखनभेद: सैबेरिया) हा रशिया देशामधील एक अवाढव्य भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर आशिया हा शब्दप्रयोग जवळजवळ संपूर्णपणे सायबेरियाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. सायबेरियाने रशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे, पण रशियाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त २५% लोकसंख्या सायबेरियामध्ये वसलेली आहे. सायबेरियाच्या पश्चिमेला उरल पर्वत, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला प्रशांत महासागर व दक्षिणेला कझाकस्तान, चीन व मंगोलिया हे देश आहेत. नोव्होसिबिर्स्क हे सायबेरियामधील सर्वात मोठे शहर तर ओम्स्क, इरकुत्स्क व क्रास्नोयार्स्क ही इतर शहरे आहेत.
सायबेरिया येथील प्रदीर्घ व कडाक्याच्या हिवाळ्यांसाठी ओळखला जातो. जानेवारी महिन्यामध्ये येथील सरासरी तापमान -२५° से इतके असते.
इतिहास
ऐतिहासिक काळापासून सायबेरिया भागात एनेत, नेनेत, शक, उईघुर इत्यादी जमातींचे वास्तव्य होते. १६व्या शतकामध्ये रशियाचे प्राबल्य झपाट्याने वाढीस लागले व रशियन शासकांनी वरचेवर सायबेरियामध्ये मोहिमा काढण्यास सुरुवात केली. रशियाने सायबेरियामध्ये येनिसेस्क, तोबोल्स्क, याकुत्स्क इत्यादी नगरे वसवली व येथे लष्करी तळ उभारले. १७व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण सायबेरिया भूभागावर रशियाचे अधिपत्य आले होते. रशियाने येथे मोठ्या प्रमाणावर लोकांना वसवले. इ.स. १७०९ पर्यंत येथे सुमारे २.३ लाख रहिवासी बाहेरून वसवण्यात आले होते. येथील मुबलक नैसर्गिक संपत्ती तसेच खनिजांमुळे सायबेरियाची लोकप्रियता वाढीस लागली. इ.स. १७०८ साली पीटर द ग्रेट ह्याच्या नेतृत्वाखाली सायबेरिया प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. ह्याच काळापासून सायबेरियाचा अवाढ्यपणा लक्षात घेता येथे राजकीय शत्रूंना देशोधडीस पाठवण्याची प्रथा चालू झाली.
पारंपारिक काळापासून सायबेरियामध्ये दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या होत्या ज्यामुळे सायबेरिया प्रदेशाचा उर्वरित रशियासोबत पुरेसा संपर्क नव्हता. लेना, आमुर, ओब इत्यादी नद्या हेच वाहतूकीचे प्राथमिक साधन होते परंतु हिवाळ्यात ह्या नद्या गोठत असल्यामुळे वर्षातील ५ महिने बोटी चालू शकत नसत. ह्या भागात रेल्वेमार्ग बांधण्याचा विचार अनेकदा व्यक्त केला गेला होत. अखेरीस इ.स. १८८० साली दुसऱ्या अलेक्झांडरनेसायबेरियन रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला व १८९१ साली कामास प्रारंभ झाला. सायबेरियामधील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतीचा फायदा उर्वरित रशियास मिळावा व येथील गहू व इतर धान्य सुलभपणे निर्यात करता यावे हा रेल्वे बांधण्यामागील सर्वात मोठा हेतू होता. १९१६ साली सायबेरियन रेल्वेचा संपूर्ण मार्ग कार्यरत झाला व अतिपूर्वेकडील व्लादिवोस्तॉक हे बंदर मॉस्को व युरोपीय रशियासोबत जोडण्यात आले. सायबेरियन रेल्वेचा वापर करून १८९६ ते १९१३ दरम्यान सायबेरियाने दरवर्षी सरासरी ५०२ टन धान्य निर्यात केले.
सोव्हिएत राजवटीदरम्यान नोव्होसिबिर्स्कवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले व येथे झपाट्याने उद्योगीकरण झाले. दुसऱ्या महायुद्ध काळात युरोपीय रशियामधील अनेक कारखाने सायबेरियामध्ये हलवण्यात आले. ह्यामुळे कृषीसोबत सायबेरियामध्ये औद्योगिक उत्पन्न देखील प्रचंड वाढले. युद्धानंतरच्या काळात सायबेरियात अन्के मोठी जलविद्युत केंद्रे बांधली गेली.
भूगोल
सायबेरिया भौगोलिक प्रदेशाचे क्षेत्रफळ १३.१ दशलक्ष चौरस किमी (५१,००,००० चौ. मैल) इतके असून ते पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के आहे. आल्ताय, उरल ह्या सायबेरियातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. अंगारा, इर्तिश, कोलिमा, लेना, ओब, याना व येनिसे ह्या सायबेरियातील प्रमुख नद्या तर बैकाल हे येथील प्रमुख सरोवर आहे.