लाओस (अधिकृत नाव: लाओ जनतेचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियातील देश आहे. या देशाच्या वायव्येस म्यानमार व चीन, पूर्वेस व्हियेतनाम, दक्षिणेस कंबोडिया, पश्चिमेस थायलंड हे देश आहेत. व्हियांतियान ही लाओसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उत्तर लाओस, मध्य लाओस आणि दक्षिण लाओस असे या देशाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत लान शांग साम्राज्य होते. त्यानंतरच्या कालखंडात फ्रेंच वसाहतवादी साम्राज्य|फ्रेंचांनी वसाहत म्हणून राज्य केल्यानंतर१९४९ साली लाओसला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर दीर्घ काळ चाललेले यादवी युद्ध१९७५ साली पाथेट लाओ ही साम्यवादी आघाडी सत्तेत येताच संपुष्टात आले. मात्र विविध गटातटांच्या नेतृत्वात अंतर्गत धुसफूस त्यानंतरही चालू राहिली.
इ.स. १९९० च्या दशकात खासगीकरणाला चालना देण्याच्या शासकीय धोरणामुळे लाओसमध्ये आर्थिक सुधारणा घडून येत आहेत. तसे असले तरीही राज्यव्यवस्थेच्या व्याख्येनुसार लाओस समाजवादी प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्ष ह शासनव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी असला तरीही पंतप्रधान हा प्रशासनाचा कार्यकारी प्रमुख असतो. बौद्ध धर्म हा लाओस देशाचा प्रमुख धर्म असुन विविध अहवालानुसार देशातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण ६५% ते ९८% आहे.