डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (इतर नावे डॉ. आंबेडकर हाऊस लंडन आणि शिक्षण भूमी) हे युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर २०१५ रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना त्यांनी इ.स. १९२१-२२ दरम्यान येथे वास्तव केलेले होते. इमारतीत त्यांनी कठोर परिश्रमाणे २१-२१ तास अभ्यास करून एम.एस्सी, बार-ॲट-लॉ, डी.एस्सी. अशा तीन अत्युच्च पदव्या संपादन केल्या होत्या. हे स्मारक तीन मजली असून त्याचे क्षेत्रफळ २०५० चौरस फुट आहे. या वास्तुवर "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६), सामाजिक न्यायाचे भारतीय पुरस्कर्ते, यांनी १९२१-२२ मध्ये येथे वास्तव्य केले" अशी अक्षरे कोरलेली आहेत. याच वास्तूचे रूपांतर आज जागतिक स्मारकात झाले असून हे स्मारक जगासाठी प्रेरणास्थान ठरले आहे.[१]
इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ५ जुलै १९२० रोजी आपला अभ्याक्रम पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना झाले होते. ३० सप्टेंबर १९२० रोजी त्यांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत ए.एससी. साठी प्रवेश मिळवला तसेच ग्रेज-इन या संस्थेत नाव दाखल करून त्यांनी बॅरिस्टरीचा अभ्यास सुरू केला. त्या काळात अस्पृश्य समाजातील जन्म घेतलेला एकमेव विद्यार्थी या देशात शिक्षणासाठी गेला होता आणि ते १० किंग हेन्री मार्गावर असलेल्या घरात वास्तव करु लागले.
वर्षभरानंतर लंडन विद्यापीठे २० जून १९२१ रोजी डॉ. आंबेडकरांना एम.एस्सी ही पदवी बहाल केली आणि २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना बार-ॲट-लॉ (बरिस्टर-ॲट-लॉ) ही वकिलीची सर्वोच्च पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांनी ३-४ महिने या अल्पावधीतच ‘द प्रोब्लम ऑफ रुपी’ हा प्रबंध तयार करून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.) या सर्वोच्च पदवीसाठी ऑक्टोबर इ.स. १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. या प्रबंधात त्यांनी भारतीय ब्रिटिश सत्तेवर टिका केली होती.
लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनीला गेले व तेथील बॉन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे ते तीन महिने राहिले आणि त्यानंतर त्यांना त्यांचे शिक्षक एडवीन कॅनन यांनी त्यांना लंडनला येण्यासंबंधी पत्र पाठवले. ते लंडनला परतले व पुढे नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल केली.
उद्घाटन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेली ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्र शासनाने ३५ कोटी रूपायाला खरेदी केली आणि या वास्तूचे एक जागतिक स्मारक म्हणून उद्घाटन किंवा लोकार्पण भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबर२०१५ रोजी करण्यात आले.[२] यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महाराष्ट्राच्या माजी सामाजिक न्यायमंत्री सुलेखा कुंभारे, आरपीआय नेते रामदास आठवले आणि इंग्लंडमधीलआंबेडकरवादी व बौद्ध लोक सुद्धा उपस्थित होते. “लंडन मधील हे स्मारक जगाला समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आणि प्रेरणा देत राहिल.” अशा भावना मोदींना व्यक्त केल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या भावना व्हिजिटर बुकमध्ये नोंदवल्या — “एक ऐतिहासिक दिवस. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव केलेले हे घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण ग्रहण केले. ते घर आज स्मारक म्हणून जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुत्व या आधारावर समाज आणि देश प्रगती करु शकतो हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मा. बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे.”
या स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक जण इंग्लंडला जातात. डॉ. आंबेडकरांचे विचार तेवत ठेवण्यासाठी भारताव्यतिरीक्त परदेशातही डॉ. आंबेडकरांच्या स्मृती प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस आणि सहकार्यांसह लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला भेट दिली व तेथील प्राध्यापकांशी चर्चा केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या येथील रेअर व रेव्हर्ट स्कॉलर होते. त्यांनी या संस्थेत शिक्षण घेताना आर्थिक विषयांवर लिहिलेले विविध प्रबंध हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बहुमूल्य संदर्भ म्हणून वापरले जातात”, असे तेथील प्राध्यापकांनी अभिमानाने सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संशोधन शिष्यवृत्ती आणि अध्यासन सुरू करावयाचे त्यांनी सांगितल्यावर या उपक्रमासाठी लागणारे आर्थिक पाठबळ महाराष्ट्र सरकार कडून दिले जाईल, असे आश्वासन त्यांना फडणवीसांकडून देण्यात आले.
रचना
या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तू आहेत.
स्मारकाच्या बाहेरील बाजूस डॉ. आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे, तसेच स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा मुख्य अर्धाकृती पुतळा आहे.
महाराष्ट्र सरकारने या स्मारकात एक ग्रंथ संग्रहालय उभारले असून त्यात बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके आहेत व त्यांचे दुर्मिळ फोटोही आहेत. याशिवाय भारतातून शिष्यवृत्ती घेऊन लंडमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हे स्मारक निवासासाठी खुले केले गेलेले आहे.
वाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील स्मारक हा भाग निवासी आहे. डॉ. आंबेडकरांच्या सदनाला भेट देणाऱ्या लोकांमुळे स्थानिक लोकांना त्रास होतो असा आक्षेप कॅमडन काउन्सिलने घेतला होता. त्यामुळे इमारतीची स्मारक म्हणून मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा वाद लंडनच्या न्यायालयात गेला. मार्च २०२० मध्ये हा खटला भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जिंकला. डॉ. आंबेडकर ज्या इमारतीमध्ये राहत असत त्या इमारतीचे स्मारक व्हावे यासाठी इंग्लडमधील खासदार रॉबर्ट जेनेरिक यांनी प्रयत्न केले होते.[३][४]