भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Buddha and His Dhamma
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार धर्मशास्त्र
प्रकाशन संस्था सिद्धार्थ महाविद्यालय प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती इ.स. १९५७
विषय भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ
पृष्ठसंख्या ५९९

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म (इंग्रजी: The Buddha and His Dhamma) हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली पहिल्यांदा प्रकाशित केला.[] भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे.[] या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे.

इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला.[]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले होते की, हा ग्रंथ त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे, जे बौद्ध धर्माच्या योग्य समस्यांसाठी एक संच तयार करेल. इतर पुस्तके आहेत: (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स; आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती.

इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदीपंजाबी या दोन भाषेत केले[] तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे.

बौद्ध धर्मशास्त्र

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकांमध्ये या पुस्तकाला सर्वाधिक महत्त्व आहे.[] या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल.[] या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे.[] सर्वप्रथम, त्यांनी हीनयान आणि महायान यामध्ये विभागलेल्या बौद्धधर्माला कोणतेही महत्त्व दिले नाही. बौद्ध धर्म, तथागत बुद्धांचा धर्म एकच आहे. तत्त्वज्ञान विषयक व्याख्या भिन्न असू शकतात. धर्माच्या रूपात बौद्ध धर्म एकच आहे. दोन बौद्ध धर्म असणे संभव नाही.

इतिहास

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक लिहण्याच्या उद्देश समजावून सांगताना:

हे पुस्तक लिहिण्याची इच्छाशक्ती वेगळ्या उगमाची आहे. इ.स. १९५१ मध्ये कलकत्ता महाबोधी सोसायटीच्या जर्नलचे संपादक यांनी मला वैशाख अंकासाठी एक लेख लिहिण्यास सांगितले. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला की बुद्धांचा धर्म हा एकमेव धर्म आहे ज्याचा विज्ञानाने जागृत समाज स्वीकारू करू शकतो आणि त्याशिवाय तो समाज नष्टही होईल. मी हेही निदर्शनास आणलं की आधुनिक जगातील बौद्ध धर्मासाठी एकच धर्म होता ज्यास स्वतःला वाचवावे लागेल. त्या बौद्ध धर्माला संथ प्रगती होते कारण त्याचे साहित्य इतके विशाल आहे की कोणीही ते संपूर्ण वाचू शकत नाही. बौद्धांकडे ख्रिस्तींप्रमाणे बायबलसारखं असं एकमेव ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म , हा आहे या लेखाच्या प्रकाशन रोजी, मला असे पुस्तक लिहिण्यासाठी, लेखी आणि तोंडी, अनेक विनंत्या प्राप्त झाल्या. त्या प्रतिसाद म्हणून मी हे कार्य हाती घेतले आहे.[]

चार प्रश्न

बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.[]:

प्रथम प्रश्न बुद्ध जीवनातील एका मुख्य घटनेशी संबंधित आहे, ती म्हणजे परिव्रज्या. बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? ह्याचे पारंपारिक उत्तर म्हणजे, त्यांनी मृत देह, आजारी व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती पाहिला म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धांनी आपल्या वयाच्या २९ व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर बुद्धांनी परिव्रज्या घेतली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्यांना आधी कधी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घटणाऱ्या सर्वसामान्य घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्या ह्याच वेळी त्या प्रथम पाहिल्या हे पारंपारिक स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते?

दुसरा प्रश्न चार आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. बुद्धांच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जर जीवन हे दुःख आहे, जर मृत्यू हे दुःख आहे, आणि जर पुनर्जन्म हे दुःख आहे, तर सर्व काही संपलेच म्हणायचे. ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्त्वज्ञान मनुष्याला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकतो? जन्मापासून जे दुःख अस्तित्त्वात येते अशा दुःखापासून मनुष्याची सुटका करण्यासाठी बुद्ध काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्य सत्ये हा एक मोठाच अडथळा आहे. कारण चार आर्य सत्य मनुष्याला आशा नाकारतात. ही चार आर्य सत्ये बुद्धांच्या आचारतत्त्वांना निराशावादी ठरवतात. अस तुम्हाला वाटेल पण तस नाही . चार आर्य सत्य म्हणजे मानवाला दुःखापासून सुखांकडे नेण्याचा मार्ग आहे .

तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्त्वांशी संबंधित आहे. बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्त्व नाकारले आहे; परंतु त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांताचे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे म्हणले जाते. मग लगेच प्रश्न उद्भवतो. जर आत्मा नाही, तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी वापरले? ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे.

चौथी प्रश्न भिक्खुंशी संबंधित आहे. भिक्खू निर्माण करण्यामागे बुद्धांचा उद्देश काय होता? एक परिपूर्ण मनुष्य तयार करण्याचा हेतू होता काय? की लोकांच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा फक्त एक परिपूर्ण मनुष्य असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो कसलाही उपयोग होत नाही, कारण जरी तो एक परिपूर्ण मनुष्य असला तरी तो स्वार्थी मनुष्य आहे. उलटपक्षी, जर तो एक समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नाचा निर्णय तात्त्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "उपोद्घाताची कथा." Loksatta. 2017-12-03. 2018-04-15 रोजी पाहिले.
  2. ^ Christopher Queen (2015). Steven M. Emmanuel (ed.). A Companion to Buddhist Philosophy. John Wiley & Sons. pp. 529–531. ISBN 978-1-119-14466-3.
  3. ^ Ambedkar, B. R. (1979). Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches. Bombay: Education Dept., Govt. of Maharashtra.
  4. ^ "धम्म जीवनसूक्ते : डॉ. भदंत आनंद कौसल्यायन". Lokmat. 5 जाने, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ राजबहादुर, Raj Bahadur. "A glance at Dr Ambedkar's writings". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2019-02-25 रोजी पाहिले.
  6. ^ a b "A glance at Dr Ambedkar's writings". Forward Press (इंग्रजी भाषेत). 2017-02-10. 2018-04-15 रोजी पाहिले.
  7. ^ "00_pref_unpub". www.columbia.edu. 2018-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-29 रोजी पाहिले.
  8. ^ Pritchett, Frances. "The Buddha and His Dhamma, by Dr. B. R. Ambedkar". www.columbia.edu. 2018-04-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!