कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] संत कबीर यांचा जन्म ज्येष्ठ शुक्ल पूर्णिमा इ.स. ११४९ साली झाला असे काहीजण मानतात तर, कुणी ते १३९९ मध्ये जन्माला आले असे म्हणतात.[२]
महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर भारतीय भूमी मध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यापैकी एक गुरू होत. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. त्यांचा लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगाममध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे वाटते.
[३]
जीवन परिचय
कबीर साहेबांचा जन्म नेमका कधी झाला, हे अज्ञात आहे. खेमराज श्रीकृष्णदास यांनी प्रकाशित केलेल्या हस्तलिखित "कबीर सागर" ग्रंथानुसार १३९८ मध्ये (संवत १४५५) ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंदऋषींनी पाहिला होता. कर्मधर्म संयोगाने काशीतले नीरू व नीमा नावाचे जोडपे त्या बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले.[४] त्यांचे अनुयायी त्यांची ही लीला कबीर साहेब प्रकट दिन म्हणून साजरी करतात.[५] त्या बालकाचे नाव ठेवण्यासाठी नीरूने मौलवींना बोलवले, तेव्हा ज्या ज्या वेळेस त्यांनी कुराण शरीफ उघडून पहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ सर्वज्ञ / सर्वांत मोठा होतो. हे नाव ठेवण्याची मौलवींची मुळीच इच्छा नव्हती. पण इच्छा नसतानाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले, आणि पुढे ते बालक महान कवी व संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले.
वैयक्तिक जीवन आणि कुटुंब
नीरू आणि नीमा हे निपुत्रिक ब्राह्मण जोडपे होते, ज्यांची खरी नावे गौरीशंकर आणि सरस्वती होती. ते खरे शिवभक्त होते. इतर ढोंगी ब्राह्मणांना त्याचा हेवा वाटला, ज्याचा फायदा मुस्लिम काझींनी घेतला. बळजबरीने त्यांचे धर्मांतर करून त्यांची नावे नूर अली आणि नियामत अशी बदलण्यात आली, जी अपभ्रंश भाषेत नीरू आणि नीमा म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी विणकाम सुरू केले.[६]
कबीर जरी मुस्लिम कुटुंबात रहात होते तरी ते आदिरामाचे उपासक होते. संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीत विणकर म्हणून काम करत होते. त्यांनी सांगितले आहे -
कबीर सागरमध्ये असे वर्णन आहे की स्वामी रामानंदजी खालच्या जातीतील लोकांना दीक्षा देत नसत. कबीरांना रामानंदजींकडूनच दीक्षा घ्यायची होती. एके दिवशी रामानंदजी सकाळी आंघोळीला गेले होते, तेव्हा कबीरजी अडीच वर्षाच्या मुलाचे रूप घेऊन घाटाच्या पायरीवर झोपले. रामानंदजींचा पाय कबीरांना लागला तेव्हा ते रडू लागले. रामानंदजींनी खाली वाकून त्यांना उचलले आणि रामनामाचा जप करण्यास सांगितले. अशाप्रकारे कबीरांनी स्वामी रामानंदजींना गुरू धारण केले.[८]
दिव्य धर्म यज्ञ
कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी लिहिलेल्या कबीर सागरमध्ये दिव्य धर्म यज्ञाचा उल्लेख आहे, त्यानुसार त्या काळातील पंडित आणि मौलवी जे ढोंगीपणावर आणि दिखावावर अधिक विश्वास ठेवत होते ते कबीरांचा द्वेष करू लागले. एकदा त्यांनी कबीरांचा अपमान करण्याचा कट रचला. त्यांनी खोटे पत्र लिहून जगभर पाठवले की कबीर भंडारा करत आहेत, ज्यामध्ये तीन दिवस प्रत्येक जेवणासोबत एक सोन्याचा शिक्का आणि दोन दोहर (रजाई) मोफत दिली जाईल. ठरलेल्या दिवशी काशीतील कबीरांच्या झोपडीजवळ १८,००,००० लोकांचा जमाव जमला. त्याच क्षणी एक मोठा चमत्कार घडला. केशव बंजारा नावाच्या व्यावसायिकाने ९,००,००० बैलांवर माल लादून आणला व सर्व लोकांना तीन दिवस चविष्ट भोजन देऊन तृप्त केले, वचनानुसार सर्व साहित्य वाटप केले, ज्यामध्ये प्रत्येक अन्नासह एक सोन्याचा शिक्का आणि दोन दोहर देण्यात आले. हे सर्व करण्यासाठी भगवंताने कैशव बंजाराच्या रूपात येऊन ही सर्व लीला केली असे म्हणतात. या भंडारामध्ये दिल्लीचा सम्राट सिकंदर लोदीही सहभागी झाला होता. त्याचा मंत्री शेखतकी, ज्याला कबीरांचा खूप हेवा वाटत होता, तो देखील सामील झाला. शेखतकीने कबीर साहेबांच्या भंडाऱ्याची तिथेही निंदा केल्याचे सांगितले जाते, ज्यानंतर त्याची जीभ बांधली गेली व तो आयुष्यभर बोलू शकला नाही. ह्या भंडारात अनेकांना कबीरांचे ज्ञान समजले व त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. या भंडाराच्या स्मरणार्थ कबीरांचे अनुयायी दरवर्षी दिव्य धर्मयज्ञ नावाचा उत्सव साजरा करतात.[९][१०]
मृत्यू
कबीर आयुष्यभर काशीमध्येच राहिले पण मगहरमध्ये मरणारा नरकात आणि काशीत मरणारा स्वर्गात जातो हा गैरसमज मोडून काढण्यासाठी मगहर येथून ते सशरीर हा मृ्त्युलोक सोडून निजधामाला गेले.[२] आजही मगहरमध्ये हे स्मारक आहे.[११][१२]
सकल जनम शिवपुरी गंवाया।मरती बार मगहर उठि आया।
भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.[१३]
साहित्यिक कार्य
कबीर साहेबांद्वारा लिखित मुख्यतः सहा ग्रंथ आहेत:
कबीर साखी: या ग्रंथात कबीर साहेब साखींच्या माध्यमातून सूरता म्हणजे आत्म्याला आत्म आणि परमात्म ज्ञान समजावून सांगत.
कबीर बीजक: कबीरांच्या वाणीचा त्यांचे शिष्य धर्मदास यांनी सन १४६४ मध्ये बीजक या नावाने संग्रह केला. या ग्रंथात प्रामुख्याने पद्य भाग आहे. बीजक चे तीन भाग केले गेले आहेत.
रचना
अर्थ
प्रयुक्त श्लोक
भाषा
रमैणी
रामायण
चौपई आणि दोहा
ब्रज भाषा आणि पूर्वेकडील बोली
सबद
शब्द
गीतात्मक श्लोक
ब्रज भाषा आणि पूर्वेकडील बोली
साखी
साक्षी
दोहा
राजस्थानी पंजाबी मिश्र खडी बोली
कबीर शब्दावली: या ग्रंथात प्रामुख्याने कबीर साहेबांनी आपल्या अनमोल शब्दांतून आत्म्याला परमात्म्याविषयी माहिती दिली आहे.
कबीर दोहवली: या ग्रंथात मुख्यतः कबीर साहेबांचे दोहे कविता समाविष्ट आहेत.
कबीर ग्रंथावली: या ग्रंथात कबीर साहेबांचे श्लोक व दोहे समाविष्ट केले आहेत.
कबीर सागर: हा सूक्ष्म वेद आहे ज्यामध्ये परमात्म्याविषयी तपशीलवार माहिती आहे.
कबीर हे शिक्षित नव्हते, म्हणून त्यांचे दोहे त्यांच्या शिष्यांद्वारा लिखित किंवा संग्रहित केले गेले. भागोदास आणि धर्मदास या त्यांच्या दोन शिष्यांनी त्यांचा साहित्यिक वारसा जपला. कबीरांचे श्लोक शिख धर्माच्या धर्मग्रंथ “श्री गुरू ग्रंथ साहिब” मध्ये देखील समाविष्ट आहेत. श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत कबीरांचे २२६ दोहे आहेत व श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भक्त व संतांपैकी संत कबीर यांचे चे सर्वाधिक दोहे आहेत.
कबीर साहेबांचे शिष्य
कबीर साहेबांचे अनेक शिष्य झाले, त्यातील काही महापुरुषांनी आपल्या साहित्यात कबीर साहेबांविषयी लिहिले आहे -
संत धर्मदास[१४]: आदरणीय धर्मदास मध्य प्रदेशातील बांधवगड येथील रहिवासी होते. धर्मदास धर्मग्रंथांच्या विरुद्ध असलेल्या प्रथा करत असत. कबीर सागर, कबीर बीजक आणि कबीर साखीमध्ये त्यांनी कबीर साहेबांची सर्व वाणी लिहिली. कबीर सागर हा आदरणीय धर्मदास व कबीर साहेब यांच्यातील संवाद आहे.
त्यांच्या वाणीतील पुरावा -
आज मोहे दर्शन दियो जी कबीर ।।टेक।।
धर्मदास की अर्ज गोसांई, बेड़ा लंघाईयो परले तीर ।।६।।
संत गरीबदास: संत गरीबदास महाराज, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा येथून, कबीर साहेबांच्या बाराव्या पंथाचे आहेत. त्यांना कबीर साहेबांकडून प्राप्त झालेले सर्व तत्त्वज्ञान सत ग्रंथ साहेब मध्ये लिहिले गेले. त्यांच्या पवित्र वाणीत सतलोक व कबीर साहेबांबद्दल लिहिले आहे. उदाहरणार्थ -
हम सुल्तानी नानक तारे, दादू कूं उपदेश दिया ।
जाति जुलाहा भेद नहीं पाया, काशी माहे कबीर हुआ ।।
गुरू नानकदेव: गुरू नानकजींनी कबीर साहेबांचे त्यांच्या पवित्र शब्दात वर्णन केले आहे -
कबीरांच्या जीवनाचा आणि कार्यांचा भारतीय अध्यात्मावर व भक्ती चळवळीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला, ज्याने परमेश्वरावरील प्रेम आणि भक्तीवर जोर दिला गेला.
एक परमेश्वर: कबीरांचा असा विश्वास होता की परमेश्वर एकच आहे व तो सर्व धर्मांच्या पलीकडे आहे. त्यांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मातील कठोर प्रथांवर टीका केली आणि परमेश्वर एक आहे आणि सर्वत्र उपस्थित आहे या कल्पनेचा प्रचार केला. मोहसीन फानीच्या दबिस्तान आणि अबुल फझलच्या ऐन-ए-अकबरीमध्ये त्यांचा उल्लेख ‘मुवाहिद’ (एका देवावर विश्वास ठेवणारा) असा आहे. कबीर म्हणतात,
कबीर, पत्थर पूजें हरि मिले तो मैं पूजूँ पहार।
तातें तो चक्की भली, पीस खाए संसार।।
भावार्थ: जर दगडाची पूजा करून देव प्राप्त होत असेल तर मी पर्वताची पूजा करीन, ज्याने मला लवकर मोक्ष प्राप्ती होईल. त्यापेक्षा तर घरातील दगडाची चक्की लाभदायक आहे ज्यात धान्य दळून पीठ बनवून सर्व जेवण करतात.
आंतरिक भक्ती: खरी उपासना हृदयातून होते यावर कबीरांनी भर दिला. बाह्य कर्मकांडापेक्षा परमेश्वराशी प्रामाणिक संबंध अधिक महत्त्वाचा आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी शिकवले की अंतःकरण शुद्ध व परमात्म्यासाठी प्रेमाने भरलेले असले पाहिजे.
कबीरांनी सर्व मानवांना अनुसरता येईल असा सतभक्ती मार्ग देऊन धर्मांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते प्रत्येक जीवनाचा संबंध दोन आध्यात्मिक तत्त्वांशी (जीवात्मा आणि परमात्मा) असतो व मोक्ष ही दोन दैवी तत्त्वे एकत्र करण्याची प्रक्रिया आहे.
कर्मकांड व अंधश्रद्धा यांवर टीका: कबीर हे रिकाम्या कर्मकांड आणि अंधश्रद्धेचे जोरदार टीकाकार होते, कबीरांनी त्यांना निरर्थक वाटणाऱ्या संस्कार, कर्मकांड आणि चालीरीतींवरही टीका केली. त्यांनी लोकांना या प्रथांच्या पलीकडे जाऊन प्रामाणिक भक्तीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यांचा असा विश्वास होता की सतभक्तीशिवाय सर्व निरर्थक आहे आणि लोकांनी ईश्वराचा सखोल, वैयक्तिक अनुभव घ्यावा.
समता आणि सामाजिक न्याय: कबीरांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेचा निषेध केला. त्यांचा असा विश्वास होता की सर्व मानव जात, पंथ किंवा लिंग काहीही असले तरी समान आहेत. त्यांचे श्लोक लोकांमध्ये एकता व समानतेचे आवाहन करतात व सामाजिक न्याय आणि सौहार्दाचा संदेश देतात. मानवाने जो धर्म पाळला पाहिजे त्याचा खरा अर्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
गुरू आणि आध्यात्मिक मार्गदर्शक: कबीरांनी आध्यात्मिक गुरूच्या भूमिकेला खूप महत्त्व दिले. त्यांचा असा विश्वास होता की मनुष्याला आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी व स्वतःमधील परमात्म्याची जाणीव करून देण्यासाठी गुरू आवश्यक आहे. कबीरांनी गुरूला मनुष्य (आत्मा) व परमात्मा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पाहिले.
कबीर, गुरू गोविंद दोनों खड़े, किसके लागों पांय।
बलिहारी गुरू आपने, गोविंद दिया मिलाय।।
साधी राहणी: कबीर यांनी साध्या आणि नम्र जीवनशैलीचा पुरस्कार केला. भौतिक इच्छांपासून मुक्त राहण्यावर व आध्यात्मिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यावर त्यांचा विश्वास होता. विणकर म्हणून त्यांचे स्वतःचे जीवन नम्रता व साधेपणाच्या शिकवणींचे उदाहरण देते व दर्शविते की एखादी व्यक्ती संपत्ती किंवा शक्तीशिवाय आध्यात्मिकरित्या समृद्ध जीवन जगू शकते.
वारसा: कबीरांच्या शिकवणींनी भारतीय अध्यात्म व संस्कृतीवर कायमचा प्रभाव टाकला आहे. शिख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरू ग्रंथ साहिबमध्ये त्यांची कामे समाविष्ट आहेत. हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही त्यांचा आदर केला आहे. कबीर पंथ, त्यांच्या शिकवणींना समर्पित असलेला धार्मिक समुदाय, त्यांचा प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश पसरवत आहे.
कबीरांचा वारसा त्यांच्या अध्यात्माकडे प्रगल्भ पण सरळ दृष्टिकोनात आहे. धार्मिक प्रथा आणि सामाजिक विभागणी यांच्या बंधनांपासून मुक्त राहून त्यांनी ईश्वराशी थेट आणि वैयक्तिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या शिकवणी आपल्याला आठवण करून देतात की खरे अध्यात्म आंतरिक शुद्धता, प्रेम व समानतेबद्दल आहे.