राजगृह

राजगृह
सर्वसाधारण माहिती
प्रकार स्मारक, वास्तू
ठिकाण हिंदू कॉलनी, दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात इ.स. १९३१
पूर्ण इ.स. १९३३
ऊंची
वरचा मजला
एकूण मजले
बांधकाम
मालकी आंबेडकर कुटुंब
रचनात्मक अभियंता डॉ. बाबासाहेब आंबेडकर


राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्धदलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात, तथापि विशेषतः डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात.[]

शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून दरवर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,०००हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.

रचना

राजगृह ही तीन मजली इमारत आहे. त्याचा पहिला महिला मजला स्मारक म्हणून विकसित केला गेला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तुंचा संग्रह आहे. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यात आंबेडकर कुटुंबीय राहतात.

बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचे ठरवल्यानंतर दादरमधली राजगृह ही वास्तू बांधून घेतली होती. बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतले होते. इ.स. १९३१ ते १९३३ दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होते. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे. डॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातले फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचे टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या छड्या (वाकिंग स्टीक्स) जमवण्याचाही छंद होता. वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय. शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारी छायाचित्रे आहेत. राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही आहे. दादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचे पार्थिव आणण्यात आले होते. ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथेच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि नंतर इथूनच ७ डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. अंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात आणण्यात आल्या. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे. राजगृहाच्या वास्तूतले तळमजल्यावरचे हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले असते तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात. ६ डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही येऊन जातात.

इतिहास

इ.स. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय परळ येथे होते, व ते मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत असत. त्यांचे सदर घरी त्याच्या पुस्तकांची अपुऱ्या जागेअभावी नीट व्यवस्था होत नसे, म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी खास घर बांधण्याचे मनावर घेतले.

दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट खरेदी केले. बांधकामासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेखीसाठी आईसकर यांना नेमले. व १९३१ ते १९३३ या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉट्सवरील बांधकामांपैकी प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी व कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी विकली. प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले. तेथेच ते कुटुंबीयांसह राहत असत.

तोडफोड

७ जुलै २०२० रोजी संध्याकाळी एका व्यक्तीकडून राजगृहाची तोडफोड करण्यात आली. चेहरा झाकलेल्या तरुण व्यक्तीने सर्वप्रथम यात राजगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दगडांनी तोडफोड केली. त्याने घराच्या काचांवरही दगडफेक केली तसेच झाडांच्या कुंड्यांचेही नुकसान केले आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे.[][][][] 'राजगृहावरील तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.[][] ८ जुलै २०२० रोजी, राज्य सरकारने 'राजगृह'ला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.[][][]

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "बाबासाहेबांच्या 'राजगृहा'च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा". लोकसत्ता. 2015-10-10. 2018-04-30 रोजी पाहिले.
  2. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'वर तोडफोड". टीव्ही९ मराठी. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Video : दादरमधील राजगृह म्हणजे आंबेडकरांच्या आठवणींचा ठेवा". लोकसत्ता. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  4. ^ "डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड". एबीपी माझा. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  5. ^ "राजगृह महाराष्ट्रातील जनतेसाठी तीर्थक्षेत्र, अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही : मुख्यमंत्री". एबीपी माझा. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  6. ^ a b "मुंबई: डॉ बीआर आंबेडकर के घर 'राजगृह' परिसर में तोड़फोड़, उद्धव सरकार ने आवास के बाहर दी सुरक्षा, एक हिरासत में". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  7. ^ a b "'राजगृह'वर आता कायमस्वरूपी असणार पोलिसांचा पहारा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय". लोकमत. 2020-07-08. 2020-07-08 रोजी पाहिले.
  8. ^ "राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय". झी २४ तास. 2020-07-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!