चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक २ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आला आहे.[६]
संरचनात्मक तपशील
एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे.
चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून मीरा आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९७१ रोजी केले. [३][७] येथे, डॉ. आंबेडकरांचे अवशेष समाविष्ट केले आहेत.[५]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिन, ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. या दिवशी चैत्यभूमीवर २५ लाखाहून अधिक आंबेडकरानुयायी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली देण्यासाठी येत असतात.[८]
भीमज्योत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेला साडे २१ लाख रुपये खर्च आला. ११ सप्टेंबर २०१९ रोजी या भीमज्योतीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ही भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिलीमीटर काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे २४ तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. याच्या तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली भीमज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बसवण्यात आली होती. दुसरी अखंड भीमज्योत ही दादर येथील चैत्यभूमी परिसरातील आहे.[९][१०]
भेटी देणारे उल्लेखनीय व्यक्ती
भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.[११]
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९७८ मध्ये चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते.[१२] त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांच्या ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी गेले.
चित्र दीर्घा
चैत्यभूमी स्तूप
अशोकस्तंभ
अशोकस्तंभ व प्रवेशद्वार (आतील बाजू)
प्रवेशद्वार (आतील बाजू)
चैत्यभूमीचा परिसर, समोर अशोकस्तंभ व डावीकडे अरबी समुद्र
चैत्यभूमी स्तूपाभोवतीचा परीसर - उद्यान
चैत्यभूमी स्तूप
चैत्यभूमी स्तूप
चैत्यभूमी स्तूपाच्या भोवतीचे समता सैनिक दलाचे स्वयंसेवक व अनुयायी
स्तूपात प्रवेश करणाचा (डावीकडील) आणि बाहेर पडण्याचा (उजवीकडील) मार्ग
स्तूपात असलेला स्तूपाची प्रतिकृती
Sand carved Buddha at Dadar Chowpatty on Mahaparinirvan Din
६ डिसेंबर २०१३ रोजी दीक्षाभूमी येथे देशभरातून जमलेले बौद्ध आंबेडकरानुयायी