शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
स्थापना १९४२
राजकीय तत्त्वे ब्राह्मण्यवाद विरोध (जातीविरोधी), दलित राष्ट्रवाद
संस्थापक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (एससीएफ / शेकाफे) ही इ.स. १९४२ मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि इ.स. १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षची स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने यापैकी कोणत्या दोन संस्था यशस्वी केल्या आहेत याबद्दल भिन्‍न मते आहेत.[][] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचेच रूपांतर पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये झाले.

फाळणी नंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा एससीएफ नावाचा पक्ष होती. रामनारायण रावत यांनी म्हणले आहे की, "एससीएफने इ.स. १९४७च्या उत्तर प्रदेशातील 'राष्ट्रवादी' राजकारणात काँग्रेसला पर्याय उपलब्ध केला आहे".[] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ पासून ते १९४२ पर्यंत स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने अस्पृश्य समाजाचे व मजूर वर्गाचे नेतृत्व केले. १९४२ मध्ये ब्रिटिश कॅबिनेटमंत्री सर स्टेफोर्ट क्रिप्स् भारतात आले. त्यांच्यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची राजकीय कैफियत मांडली. त्यावेळी क्रिप्स् साहेब म्हणाले, “मजूर पक्ष जातीय राजकारणाचा पाठपुरावा करू शकत नाही. त्यांची कैफियत अस्पृश्यवर्गातर्फे तुम्ही मांडणे तुम्हांला तर्कनिष्ठ दिसते काय ? तुम्ही दुस-या जातीय संस्थेतर्फे कैफियत मांडा.[]त्यांच्या या वाक्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याविषयी विचार केला.

स्थापना

दि. १७, १८, १९ व २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे मद्रासचे रावबहादूर एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन भरविले. सर्व देशभरातून ७०,००० च्या आसपास लोक येथे जमले. या वेळी जनसमुदायाला उद्देशून त्यांनी आपण आता हिंदू समाजाचे घटक नाही; तर भारतीय समाजाचे एक स्वतंत्र घटक आहोत. म्हणून आपणास स्वतंत्र राजकीय हक्क पाहिजेत. आपली सर्वागीण उन्नती झाली पाहिजे; पण आपल्याजवळ आर्थिक बळ व सामाजिक सामर्थ्य नाही, याकरिता आपल्याला राजकीय सत्ता पाहिजे. ही राजकीय सत्ता आपण आपल्या संघटनेच्या बळावर हस्तगत केली तरच आपली प्रगती होईल. हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यावर आपण आपले सारे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यासाठी आपल्याला अखिल भारतीय स्वरूपाच्या संघटनेची गरज आहे. त्याकरिता ‘शेड्युल्ड कास्टस् फेडरेशन नावाच्या पक्षाची स्थापना करीत आहोत.[]

शाखा

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनच्या स्थापनेमुळे देशातील अस्पृशांच्या मनात विश्वास उत्पन्न झाला. त्यांच्या सामूहिक नेतृत्वाला वाव मिळाला. देशात ठिकठिकाणी, उदा. मुंबई, मध्यप्रांत, वऱ्हाड, सिंध, ओरिसा, हैद्राबाद, मद्रास, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, पंजाब, संयुक्त प्रांत (उत्तर प्रदेश), बंगाल, बिहार, व आसाम इत्यादी ठिकाणी शाखा स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे देशभरातील अस्पृश्यांना सर्व जाती-पोटजातींमध्ये वैचारिक अभिसरण व भावनिक एकात्मता निर्माण होण्यास मदत झाली. हा पक्ष एका विशिष्ट जातीच्या लोकांचा नव्हता; तर तो १९३५ च्या कायद्यानुसार तयार केलेल्या अनुसूचित जातीच्या यादीत ४२९ जातींचा उल्लेख असलेल्या त्या सर्व जातींशी संबंधित असलेला हा पक्ष होता. या पक्षाचे दि. २९ जानेवारी १९४३ला कानपूर येथे अधिवेशन भरले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘हिंदुस्थानचे सरकार चालविण्यास हिंदू मुसलमान व दलित हे भागीदार असलेच पाहिजेत. यात जर दलित समाजाला योग्य वाटा मिळाला नाही तर तो मिळविण्यासाठी ते झगडा करतील.[]असा इशारा दिला.

जाहीरनामा तथा ठराव

मद्रास येथे दि. २३/०९/१९४४ रोजी शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकारिणीमंडळाची बैठक श्री. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खालील ठराव पारित करण्यात आले. १) अस्पृश्यांचे स्वतंत्र अस्तित्त्व मान्य करावे.
२) भारतीय घटनेला अस्पृश्य वर्गाची संमती पाहीजे त्याशिवाय ती घटना मान्य होणार नाही.
३) अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठी प्रांतिक व मध्यवर्ती सरकारच्या अंदाजपत्रकात निश्चित रकमेची घटनेने तरतुद केली पाहिजे. अस्पृश्यांच्या स्वतंत्र वसाहतीसाठी सरकारी पाडिक जमीन राखून ठेवण्याची तरतूद घटनेत असावी. सर्व निर्वाचित सदस्यांमध्ये अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे व त्यांना मिळणाच्या हक्कामध्ये दुरुस्ती केली जाणार नाही, अशी तरतूद असावी.
४) जातीय प्रश्न मिटवित असताना सर्व जातीय प्रतिनिधींच्या समोर या प्रश्नांची चर्चा व्हावी.
५) सर्व अल्पसंख्यांकांना समान वागणूक द्यावी.
६) मुस्लिम समाजाप्रमाणे अस्पृश्य वर्गाला प्रांतीय व मध्यवर्ती कायदेमंडळात आणि कार्यकारी मंडळात स्थान देण्यात यावे.
७) संयुक्त मतदारसंघ रद्द करून त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाची योजना मान्य करावी.
८) प्रांतीय व मध्यवर्ती कायदेमंडळात अस्पृश्यांना पुरेशे प्रतिनिधित्व द्यावे.
९) सरकारी नोकरीत अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा राखून ठेवाव्या.
१०) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन कराव्यात. इ. असे २४ असे ठरविण्यात आले.
वरील मागण्यांसाठी फेडरेशनच्या सर्व पक्षशाखांना सत्याग्रह करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, पुणे येथे १२०० सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. नागपूर येथे १००० सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. अशा प्रकारे अनेक ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांनी सत्याग्रह घडवून आणले. त्यामुळे अस्पृश्यांमध्ये लढाऊ प्रवृत्ती बळावली, त्यांचा आत्मविश्वास वाढला.

पक्ष

शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा एक राजकीय पक्ष होता. तो अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करीत होता. त्याची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. यापूर्वी, डॉ. आंबेडकरांनी 'इन्डिपेंडंट लेबर पार्टी'ची स्थापना केली होती. तेव्हा ते मजुरांच्या अधिकाराची लढाई लढत होते.

स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भारतीय राजकारणाची परिस्थिती वेगाने बदलत होती. या वेळी, डॉ. आंबेडकर दलित जातींच्या राजकीय हक्कांसाठी लढा देत होते. आता त्यांना अशा राजकीय मंचाची गरज होती, की जो दलितांच्या हितांना भारताच्या भावी संविधानात सुनिश्चित करेल. या दलित जातींचा समावेश पुढे भारतीय राज्यघटनेतील शेड्यूल(अनुसूची)मध्ये झाला.

पण, येथे एक पेंच होता. आदिवासी समाजाच्या नेत्यांमध्ये तेव्हा इतका एवढे सामर्थ्य नव्हते की ते काँग्रेसपासून वेगळे होऊन विचार करू शकेल. ठक्कर बापा सारखे लोक, जे गांधींच्या जवळचे होते आणि त्या वेळी आदिवासी समाजाचे सर्वमान्य नेते म्हणून ते ओळखले जात होते. ते काँग्रेसचा साथ सोडून जाण्यास तयार नव्हते.

१७-२० जुलै १९४२ रोजी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची नागपूरच्या अधिवेशनात स्थापना झाली. मद्रासचे दलित नेता राव बहाद्दूर एन. शिवराज हे याचे पहिले अध्यक्ष आणि मुंबईचे पां.न. राजभोज हे पहिले महासचिव झाले. खरे तर, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हे १९३६ साली स्थापन झालेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षाचे' एक विकसित रूप होते.

निश्चितपणे, सर्व भारतातील तमाम दलितांना इण्डिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून देशाच्या भावी राज्यघटनेची निर्मिती करण्याच्या प्रसंगात आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. तेव्हा डॉ. आंबेडकर व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये कामगार मंत्री होते. रॉय बहादूर एन. शिवराज आणि प्यारेलाल कुरिल तालिब केंद्रीय विधानसभेचे सदस्य होते.

निवडणुकीत सहभाग

२५ मार्च १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनने आपले उमेदवार उभे केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, पी. एन. राजभोज यांनी स्वतः आपल्या उमेदवारांचा दिल्ली, आग्रा, मुंबई, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी जाऊन प्रचार केला.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी असंख्य अस्पृश्य मतदारांनी शेड्यूल्ड कास्टस् फेडरेशनच्या उमेदवारांना मते दिली; परंतु अस्पृश्यांसाठी संयुक्त मतदार संघ असल्याने अस्पृश्य उमेदवारांना सवर्ण हिंदूची मते मिळालीच नाहीत. परिणामतः या पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवामुळे मनोधैर्य खचलेल्या आपल्या अनुयायांना डॉ. आंबेडकरांनी धीर दिला. दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी लिहिले, की “आपण आपल्यातील विस्कळीत झालेली शक्ती एकत्रित केली पाहिजे. खरे म्हणजे पराजित सैन्याचा सेनापती असेच करतो.[]असा उल्लेख केला. वे स्पृश्य हिंदूची मते शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनला मिळाले नाहीत याविषयी दुःख व्यक्त केले.

त्रिमंत्री यांना निवेदन

स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेसंबंधी भारतीय नेत्यांशी विचारविनिमय करण्यासाठी दि. २४ मार्च १९४६ रोजी तीन कॅबिनेट सदस्यांचे एक मंडळ भारतात आले. शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सदर मंडळाला एक निवेदन दिले ते असे,
अ) संयुक्त मतदार संघाच्या जोरावर काँग्रेसने अस्पृयांच्या राखीव जागा जिंकल्या तरी, अस्पृश्यांचे खरे नेतृत्व शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनकडेच आहे.
ब) नियोजित घटनासमितीमध्ये हिंदूचे प्रभुत्व असल्यामुळे घटनासमितीच्या योजनेला शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनचा तीव्र विरोध राहिल.
क) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ द्यावा व त्यांच्या स्वतंत्र वसाहती स्थापन कराव्यात.
ड) नियोजित हंगामी मंत्रीमंडळात अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले नसल्यास त्यास शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनची मान्यता राहणार नाही.[]त्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

इ.स. १९५२ च्या निवडणुका

इ.स. १९५२ साली सार्वत्रिक निवडणूका घोषित झाल्या; या वेळी शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उमेदवार उभे केले. या निवडणुकीमध्ये देखील शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या उमेदवारांना हिंदूनी मतदान न करता काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे राखीव जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काजरोळकरसारख्या सामान्य काँग्रेस उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.सोलापूर मतदार संघातून पी. एन. राजभोज व हैद्राबाद प्रांतातील करीमगर मतदारसंघातून श्री. एम. आर. कृष्णन हे दोन उमेदवार शे. फेडरेशनचे लोकसभेवर निवडून गेले. हैद्राबाद, मद्रास, पेप्सू, मुंबई आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभेत सर्व मिळून १२ उमेदवार विजयी झाले. यावेळी पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला.३१ १९५४ मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीमध्ये डॉ. आंबेडकरांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला. या वेळी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने समाजवादी पक्षासोबत निवडणुकीपुरती युती केली होती; या युतीचा काहीच उपयोग झाला नाही, यावेळी अस्पृश्य समाज राजकीय दृष्टिकोनातून जागृत नसल्यामुळे व निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असलेला फंड अपूरा असल्यामुळे आणि काँग्रेसने अस्पृश्यातील जाती उपजातीचा उपयोग करून घेतल्यामुळे शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनचा पराभव झाला.या अनिष्ट घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांना पाठविलेल्या एका पत्रात “शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनला केवळ अस्पृश्यांच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्याकरिता या पक्षाच्या विचाराशी ज्या पक्षाचे विचार जुळतात त्या पक्षाशी युती करावी लागेल तसेच या पक्षाला आवश्यक अशा निधीची गरज आहे. या सर्व अटी महत्त्वाच्या आहेत यातील काही अटींची पुर्तता झाली नाही तर हा पक्ष रद्द करून टाकावा.[]असे विचार प्रकट केले. तसेच दि. २०/४/१९५४ रोजी शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकत्र्यांना उपदेश करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे माझे सहकारी हताश झाले असावे, पण मी अपयशाची पर्वा केव्हाच केली नाही; करीत नाही व या पुढेही करणार नाही. केवळ निवडणुकीत जागा मिळविणे हे फेडरेशनचे ध्येय नाही. जे फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्या सर्वांना असे सांगणे आहे, की फेडरेशनला अपयश येणे हे वायाने झोडपलेल्या झाडासारखे आहे; पण त्यामुळे फेडरेशनरूपी झाडाचे मुळच मरून गेले असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल. तेव्हा डोळे उघडून सतत कार्य करत रहावे व अस्पृश्य समाजाने अन्य समाजातील समविचारी लोकांशी सहकार्य करावे त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही.[१०]त्यावेळी त्यांनी फेडरेशन बरखास्त करून सर्व दलितांसाठी व शोषितांसाठी सर्वव्यापी असा एक नवीन पक्ष स्थापण्याचा विचार मांडला. परंतु दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे आकस्मिक महानिर्वाण झाल्यामुळे ते कार्य त्यांच्या ह्यातीत पूर्ण होऊ शकले नाही.

समारोप

बाबासाहेबांच्या निधनाने विषन्न मनस्थितीतील दलित समाजाला योग्य नेतृत्व देऊन दिलासा द्यावयाचा होता. त्यांचा विश्वास वाढवावयाचा होता. हे प्रचंड कार्य करण्यासाठी जेव्हा एका व्यक्तीचे नेतृत्व मान्य होणार नव्हते तेव्हा नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची कल्पना मांडली. त्यासाठी दि. ३१ डिसेंबर १९५६ला नगर येथे शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाची बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. येथे फेडरेशनचे देशभरातील मान्यवर नेते हजर होते.३४ यावेळी खालीलप्रमाणे अध्यक्षीय मंडळ नेमण्यात आले.या अध्यक्षीय मंडळात १) बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, २) श्री. दादासाहेब गायकवाड, ३) श्री. जी. टी. परमार (गुजरात), ४) श्री. ए. रत्नम (मद्रास), ५) श्री. आर. डी. भंडारे, ६) श्री. के. बी. तळवटकर, ७) श्री. बी.सी. कांबळे आणि दि. १/१०/१९५७ला नागपूर येथील प्रेसिडियमच्या बैठकीत निवडलेले १) श्री. एच. डी. आवळे, २) श्री. एन. शिवराज (मद्रास), ३) श्री. बी. पी. मौर्य (उ. प्रदेश), वे ४) चननराम (पंजाब) [११]अशा अकरा सदस्यांचा समावेश करण्यात आला. मात्र ते अध्यक्षीय मंडळ लवकरच मोडकळीस निघाले.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Keane, David (2007). "Why the Hindu Caste System Presents a New Challenge for Human Rights". In Rehman, Javaid; Breau, Susan (eds.). Religion, Human Rights and International Law: A Critical Examination of Islamic State Practices. BRILL. p. 283. ISBN 978-9-04742-087-3.
  2. ^ Darapuri, S.R. "Dr. Ambedkar: Maker of Modern India". Countercurrents.org. 2017-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ Rajan, Nalini (1974). Practising journalism: values, constraints, implications.
  4. ^ खैरमोडे, चांगदेव (१९९९). डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , खंड ८ कालखंड १९३८ ते १९४५,. पुणे: सुगावा प्रकाशन. pp. १२६.
  5. ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १५, १६.
  6. ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १८.
  7. ^ खरात, शंकरराव (१९९०). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रे. शनिवार पेठ, पुणे: इंद्रायणी साहित्य. pp. २२५.
  8. ^ गांजरे, मा. फ. (१९७६). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणे खंड ५. नागपूर: अशोक प्रकाशन. pp. १३०.
  9. ^ खरात, शंकरराव (१९९०). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रे. शनिवार पेठ, पुणे: इंद्रायणी साहित्य. pp. ३११.
  10. ^ गांजरे, मा. फ. (१९७६). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणे खंड ५. नागपूर: अशोक प्रकाशन. pp. ९४.
  11. ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). भारतीय रिपब्लिकन पक्ष. औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. २६.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!