मुक्तिभूमी (अधिकृत नाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक) हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एक स्मारक-संग्रहालय आहे. हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. २ एप्रिल २०१४ रोजी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा धर्मांतराची जाहीर घोषणा केली होती.[१][२][३] हे आंबेडकरवादी लोक व पर्यटकांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून विकसित झाले असून त्यास अनेक लोक भेटी देत असतात. या ठिकाणी विविध उत्सव तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.[४]
६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाणदिनी, मुक्तीभूमी या स्थळाला महाराष्ट्र राज्य सरकारने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.[५][६][६]
इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यात येवला येथे परिषद भरवली. काळाराम मंदिर सत्याग्रह मागे घेतला आणि "मी हिंदू म्हणून जन्मला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." अशी त्यांनी धर्मांतर करण्याची प्रतिज्ञा केली.[७] त्यांना पूर्ण खात्री पटली होती की, हिंदू धर्मात राहून त्यांच्या दलित-अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. [८]
आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या जमिनीवर सुमारे ३२ वर्षांच्या प्रयत्नानंतर बौद्ध स्तूप उभारण्यात आला. महात्मा गांधी महाविद्यालयाचे "लीज" संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १९८२ सालादरम्यान मुक्तिभूमीतील जागा दलित पँथरला देऊ केली होती, त्यानंतर पुढे इ.स. १९८५मध्ये भारतीय बौद्ध महासभेकडे जमिनीचा ताबा दिला गेला. भारतीय बौद्ध महासभेकडे अडीच एकर जमिनीचा ताबा आहे, शासकीय पैशांऐवजी लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या पैशांतून मुक्तिभूमीची उभारणी व्हावी, असे महासभेला वाटत होते. तेथे "क्रांतिस्तंभ" उभारून महासभेने वर्धापन दिन साजरा करण्यास सर्वप्रथम सुरुवात केली, परंतु ती जागा रिकामीच होती, तेथे स्तूप, विहार, संग्रहालय वा स्मारक उभारलेले नव्हते. येथे स्तूप सरकारी खर्चातून उभारायचा की लोकवर्गणीतून उभारायचा यावर सतत वाद व्हायचा. पण तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यातील अडीच एकर जमिनीच्या व्यतिरिक्त आणखी अडीच एकर जमीन येवला नगर परिषदेकडून घेतली. १३ ऑक्टोबर २००९ रोजी भुजबळांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुक्तिभूमीचे काम सुरू केले. त्यानंतर पुढील साधारपणे साडेचार वर्षानंतर, २ एप्रिल २०१४ रोजी मुक्तिभूमी स्तूपाचे लोकार्पण करण्यात आले. इ.स. २०१५ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरित करून स्तूपाचा ताबा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे देण्यात आला आहे. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टीकडे) या स्मारकाच्या देखभालीचे व दुरुस्तीचे काम दिलेले आहे.[१]
संरचना
मुक्तिभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला असून, या पुतळ्याचे अनावरण ४ मार्च २०१४ रोजी भदन्त आर्यनागार्जून सुरई ससाई यांचे हस्ते करण्यात आले. विपश्यना हॉल, विश्वभूषण स्तूप, बुद्धविहार, वाचनालय, भिक्खू निवास, भिक्षू प्रशिक्षण केंद्र, आंबेडकरांचे शिल्प, ऑर्ट गॅलरी, संग्रहालय, विश्रामगृह, अनाथाश्रम, वसतीगृहाची निर्मिती आता प्रस्तावित आहे.