डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
|
प्रकार
|
ऐतिहासिक
|
दिग्दर्शक
|
गणेश रासने
|
निर्माता
|
नितीन वैद्य
|
निर्मिती संस्था
|
दशमी क्रिएशन
|
कलाकार
|
खाली पहा
|
शीर्षकगीत
|
आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
३४३
|
निर्मिती माहिती
|
कार्यकारी निर्माता
|
अपर्णा पाडगांवकर
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
- सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता (२२ ऑगस्ट २०२० पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
स्टार प्रवाह
|
प्रथम प्रसारण
|
१८ मे २०१९ – १७ ऑक्टोबर २०२०
|
अधिक माहिती
|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर देशमुख यांची निवड केली असून विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.[१][२] ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली गेली.[३]
निर्मिती
या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन गणेश रासने यांनी केले. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांतील कार्यांचा आढावा मालिकेतून घेतला गेला आहे. ही मालिका इतिहासकार व चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" (भाग १ ते १२) या चरित्रग्रंथावर आधारित आहे, तथापि या मालिकेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांमधील ८०० पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे.[४][५][६]
आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी व नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे."
तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हणले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हणले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."[७]
या मालिकेबद्दल सतीश राजवाडे सांगतात की, "हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक आहे."
शीर्षकगीत
- ‘क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
- बोधिसत्त्व मूकनायका
- मोडल्या रुढी त्या परंपरा दिव्यतेजा
- तूच सकल न्यायदायका
- जीवन तुझे आम्हास प्रेरणा
- दाही दिशा तुझीच गर्जना
- भीमराया माझा भीमराया
- आला उद्धाराया माझा भीमराया
- भारताचा पाया माझा भीमराया
- भीमराया माझा भीमराया'
वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून त्याची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. आदर्श आणि उत्कर्ष यांनी या शीर्षकगीताचे बराच अभ्यास आणि वाचन करून शब्द लिहिले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.[८][९]
कलाकार
- सागर देशमुख - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- अमृत गायकवाड - बाल भीमराव[१०]
- शिवानी रांगोळे - रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी[११][१२]
- मिलिंद अधिकारी - सुभेदार रामजी सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील
- अदिती द्रविड - तुळसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहीण
- प्रथमेश दिवटे - आनंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ
- चिन्मयी सुमीत - भीमाबाई रामजी सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आई
- पूजा नायक - मीराबाई सकपाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आत्या
- शिवानी सोनार - लक्षी/लक्ष्मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भावाची (आनंद) पत्नी
- आदित्य बिडकर - बाळाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ
- राहुल सोलापूरकर - शाहू महाराज
- रितेश तिवारी - नामा
- किरण माने - केळुस्कर गुरुजी
- भाग्यश्री पाने - नामा आई
हिंदीमध्ये प्रदर्शित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंती निमित्त १४ एप्रिल ते १५ मे २०२० ही मालिका हिंदी भाषेत दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता स्टार भारत या वाहिनीवर प्रदर्शित झाली.[१५]
संदर्भ
बाह्य दुवे