मीरा यशवंत आंबेडकर (जन्म : नीरा विठ्ठल साळवे; ५ मे १९३५) ह्या सामाजिक, राजकीय व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून व यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश[१] तसेच रमाबाई, भीमराव व आनंदराज यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा आनंद तेलतुंबडे यांच्याशी विवाह झाला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर १९७७ पासून मीरा यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहे.[२][३]
मीरा आंबेडकर यांचा जन्म रावडूळ ता. महाड जि. रायगड (कुलाबा) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल साळवे, तर आईचे नाव कमळाबाई होते. मीरा यांचे माहेरकडचे नाव 'नीरा' असे होते.[४] परिवारात नीरा (मीरा), सिंधू, निर्मला, ऊर्मिला व विमल ह्या पाच मुली तर पांडुरंग हा एकुलता मुलगा होता.[५] त्यावेळी नीरा गुजरात मधील मेहसाणा येथे राहात होत्या. वडील रेल्वेत नोकरीला होते. आई, वडील व नीरा मुंबईला सुशिला जाधव या त्यांच्या चुलत बहिणीकडे आले असताना यशवंत आंबेडकरांनी त्यांना पाहिले. यशवंतरावांनी अधिक माहिती काढून त्यांच्या कुटुंबापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्न जुळवणीत चांगदेव खैरमोडे यांच्या पत्नी द्वारकाबाईंचा विशेष सहभाग होता. मीरा व यशवंत यांचा विवाह १९ एप्रिल १९५३ रोजी परळ येथील आर.एम. भट हायस्कूलच्या हॉलमध्ये बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतलेली नव्हती. या लग्नास बाबासाहेब हजर नव्हते, मात्र सविता आंबेडकर उपस्थित होत्या.[६]