उद्धव बाळासाहेब ठाकरे (२७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.[१] इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[२] १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.[३][४] २९ जून २०२२ रोजी आघाडी सरकार अल्पमतात गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले.[५] एक उत्तम संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (२०१०) आणि "पहावा विठ्ठल" (२०११) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.[६]
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ].
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६: आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी केलेल्या बंडाची परिणीती म्हणून २९ जून २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[९]
कौटुंबिक
उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव रश्मी आणि पुत्रांची नावे आदित्य व तेजस आहेत.
छायाचित्रण
उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (2010) आणि "पहावा विठ्ठल" (2011) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्राचे पैलू आणि पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यांचे चित्रण आहे.
पुस्तके
ठाकरेंवरील पुस्तके
ठाकरे विरुद्ध ठाकरे : उद्धव, राज आणि त्यांच्या सेनांच्या सावल्या (मूळ इंग्रजी लेखक - धवल कुलकर्णी, मराठी भाषांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)
ठाकरेंची ग्रंथ संपदा
महाराष्ट्र देशा
पहावा विठ्ठल
हे दोन्ही छायाचित्र संग्रह आहेत.
महाराष्ट्र देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांच्याही शेकडो वर्षे आधीच्या किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी केली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी हे फोटो घेतले असून या दरम्यान एकदा त्यांचा सेफ्टी बेल्टही निसटला होता मात्र सुरक्षितपने त्यांनी फोटोग्राफी केली.
पहावा विठ्ठल मध्ये महाराष्ट्राची सर्व धर्म जातींना एकत्र घेऊन जाणारी, सर्वांना समतेचे तत्त्वज्ञान शिववणारी भागवत धर्माची सांस्कृतिक परंपरा असलेली विठ्ठलाच्या वारीचे छायाचित्रण आहे. यामध्येही ठाकरे यांनी एरियल फोटोग्राफीला प्राधान्य दिले आहे. पुणे जिल्ह्यात दिवाघाटात जगतगुरू तुकोबा महाराज यांच्या पालखी सोबतच्या लाखो भाविकांचे छायाचित्र घेताना भारताच्या नकाशाची आठवण होईल असे छायाचित्र घेतले आहे.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
"संग्रहित प्रत" (इंग्रजी व मराठी भाषेत). 2012-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)