भारतीय क्रिकेट संघानेश्रीलंका क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळविले गेले.[३][४] नोव्हेंबर २०२३ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने (SLC) २०२४ साठी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर जाहीर केले आणि द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[५] भारताने शेवटचा श्रीलंकेचा दौरा २०२१ मध्ये केला होता.[६] जुलै २०२४ मध्ये, श्रीलंका क्रिकेटने या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[७]गौतम गंभीरचा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा असेल आणि भारताचा पूर्णवेळ आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची पहिली मालिका होती.[८][९]
२४ जुलै २०२४ रोजी, दुष्मंत चमीराला ब्राँकायटिसमुळे मालिकेतून बाहेर जावे आले, त्याच्या जागी असिथा फर्नांडोची निवड करण्यात आली. २५ जुलै २०२४ रोजी, नुवान थुशाराला त्याच्या डाव्या हाताचे बोट तुटल्यामुळे टी२० मालिकेतून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी दिलशान मदुशंकाची निवड झाली. २६ जुलै रोजी, बिनुरा फर्नांडोला छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, रमेश मेंडिसला स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले.१ ऑगस्ट २०२४ रोजी, मथीशा पथिराना आणि दिलशान मदुशंका दोघेही दुखापतींमुळे बाहेर पडले आणि त्यांच्या जागी मोहम्मद शिराझ आणि एशान मलिंगा यांचा समावेश करण्यात आला. कुसल परेरा, प्रमोद मदुशन आणि जेफ्री व्हँडर्से यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले. ३ ऑगस्ट २०२४ रोजी, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वनिंदु हसरंगा उर्वरित एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आणि त्याच्या जागी जेफ्री व्हँडर्सेची निवड झाली.