इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८२ मध्ये एक कसोटी सामना आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.
इ.स. १९८१ मध्ये पाकिस्तान, भारत या दोन देशांनी आयसीसीकडे श्रीलंकेला कसोटी दर्जा देण्यासाठी शिफारस केली होती. एप्रिल १९८१ मध्ये आयसीसीच्या सर्वसाधारण सभेत श्रीलंकेला संपूर्ण सदस्य बनवून घेण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला. या प्रस्तावावरून आयसीसी ने श्रीलंका संघ कसोटी खेळायच्या योग्यतेचा आहे की नाही हे तपासण्यासाठी एक प्रतिनिधी मंडळ श्रीलंकेत पाठवले. या समितीने नोव्हेंबर १९८१ मध्ये आयसीसीकडे अहवाल पाठवून श्रीलंका ८वा कसोटी देश बनण्यास योग्यतेचा आहे असे स्पष्ट केले. डिसेंबर १९८१ मध्ये आयसीसीने विशेष आधिवेशन बोलावले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेला कसोटी दर्जा देण्यासाठी प्रस्ताव मांडला. तत्कालिन कसोटी देश : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, न्यू झीलंड यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. श्रीलंकेला ८वा कसोटी देश म्हणून मान्यता मिळाली. जरी आधी कसोटी खेळलेले असताना सुद्धा दक्षिण आफ्रिकेला मतदान करता आले नाही. कारण त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेवर वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कार घातला होता. कसोटी दर्जा मिळताच श्रीलंकेने इंग्लंड संघाबरोबर देशाची पहिली कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विनंतीला मान देत फेब्रुवारी १९८२ मध्ये श्रीलंकेला कसोटी संघ पाठवणार असल्याची घोषणा केली. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या कसोटी दर्जाच्या मानाला श्रीलंकन सरकारने टपाल तिकिट जारी केले. संपूर्ण देशात आंनदोत्सव साजरा केला गेला. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने कसोटी खेळायला येणाऱ्या इंग्लंड संघाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली. श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध १७ फेब्रुवारी १९८२ रोजी कोलंबो मध्ये कसोटी पदार्पण केले. श्रीलंका कसोटी खेळणारा आठवा देश ठरला. एकमेव कसोटी इंग्लंडने जिंकली. तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. बंदुला वर्णपुरा याने श्रीलंकेच्या पहिल्या वहिल्या कसोटीत श्रीलंकेचे नेतृत्व केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंकन भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तसेच पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना देखील.
- श्रीलंका आणि इंग्लंड या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- श्रीलंकेत इंग्लंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला तसेच श्रीलंकेने देखील मायभूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अशांत डिमेल, रोहन जयसेकरा, सिदाथ वेट्टीमुनी (श्री) आणि पॉल ॲलॉट (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अर्जुन रणतुंगा आणि महेस गूणतिलके (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
- श्रीलंकन भूमीवर पहिल्यांदा कसोटी सामना खेळवला गेला. इंग्लंडने श्रीलंकेत पहिली कसोटी खेळली तसेच श्रीलंकेचा देखील मायभूमीवरील पहिला कसोटी सामना.
- श्रीलंका आणि इंग्लंड या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- कसोटीत इंग्लंडचा श्रीलंकेवर पहिला विजय.
- अशांत डिमेल, सोमचंद्रा डि सिल्व्हा, अजित डि सिल्वा, रॉय डायस, महेस गूणतिलके, ललित कालुपेरुमा, रंजन मदुगले, दुलिप मेंडीस, अर्जुन रणतुंगा, बंदुला वर्णपुरा, सिदाथ वेट्टीमुनी (श्री) आणि जॉफ कूक (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.