महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता.
दांडी यात्रा आणि सत्याग्रह
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते.[१] त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता.[२] यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,०००हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.
ओरिसातील मिठाचा सत्याग्रह
दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहापूर्वीच ओरिसात उत्पादित होणाऱ्या मिठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या करामुळे तिथे १९२९ सालापासून आंदोलन सुरूच होते. तिथे मीठ तयार करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे वातावरण तापलेले होते. गांधीजी दांडीला पोचण्यापूर्वीच ओरिसामधील लोकांनी मिठाचे उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्धार केला. कटक येथे ओरिसाच्या वेगवेगळ्या भागातून स्वयंसेवक जमा झाले. मिठाच्या सत्याग्रहाबद्दल जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेत भाषणे करणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले. ६ एप्रिलला गोपबंधू चौधरी आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली २१ सत्याग्रहींच्या तुकडीने स्वराज आश्रम, कटक येथून इंचुरी येथे मिठाच्या सत्याग्रह करण्यासाठी पायी जाण्यास सुरुवात केली.[३] ९ एप्रिलला चांडोल येथे गोपबंधू चौधरी यांना अटक झाली. तरी यात्रा सुरूच राहिली. १३ एप्रिलला इंचुरी येथे पोचलेल्या हजारो सत्याग्रहींनी मूठभर मीठ हातात घेऊन कायदेभंग केला. सत्याग्रहींच्या तुकड्या मीठ हातात घेऊन कायदा मोडत. पोलीस त्यांना अटक करत. मग सत्याग्रहींची पुढची तुकडी पुढे येत असे. सर्व तुरुंग भरून गेले तरी आंदोलनात नवीन लोक सहभागी होतच होते. इंचुरीमधील सत्याग्रहात महिलांची संख्या लक्षणीय होती. काही निदर्शने महिलांनी आयोजित केली होती. शेवटी सर्व सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.[४]
मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले.जग बदलणाऱ्या १० महत्त्वपूर्ण आंदोलनात या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे.[५]
माडगुळकरांची कविता
दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे :
उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया