राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे.[३] सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. इ. स. १९९०च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे.[४] नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.[५]
स्थापना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या "शुक्रवारी" या नागपूर येथील निवासस्थानी केली.[६] १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.[७]
संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले धर्मांतर, पुरोगामी आणि वैश्विकरणामुळे येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
कार्यतत्त्व
भारताला आपली मातृभूमी मानणारे हे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.[८] त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे.[ संदर्भ हवा ] हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे.[ संदर्भ हवा ] हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात.
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.[ संदर्भ हवा ]
राजकीय विचार
संघ स्वतःला सांस्कृतिक संघटन म्हणवून घेते. आणि स्वतःच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजेच (परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं) या राष्ट्राला पुन्हा परम वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या अनेक विविध क्षेत्रात काम करणारया संघटना आहेत. वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महिला शाखा राष्ट्र सेविका समिती, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इत्यादी.[ संदर्भ हवा ]
संरचना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. संघाच्या शाखा दररोज भरतात. त्याच प्रमाणे साप्ताहिक मिलन, आयटी मिलन (इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी) अशी आठवड्यातून एकदा भेट असते. संघाचे शिक्षा वर्ग चालतात. प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. प्रथम वर्ग हा प्रत्येक प्रांतात होतो. द्वितीय वर्ग हा क्षेत्रात होतो. आणि तृतीय वर्ग हा सर्व भारताचा नागपूर येथे होतो. त्याचप्रमाणे अनेक शिबिरे संघातर्फे आयोजित केली जातात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.[ संदर्भ हवा ]
शाखा
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणाऱ्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणाऱ्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ एक तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा🚩 ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. याचबरोबर दंड आणि प्राचीन भारतीय युद्ध कला म्हणजेच नियुद्ध यांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयांची माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती तसेच चालू घडामोडी इत्यादी विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते. शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
संघाच्या शाखेला स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचलन होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.[ संदर्भ हवा ]
प्रचारक
पूर्णवेळ संघकार्य करणाऱ्या आणि राष्ट्रीयत्वाचा प्रचार करणाऱ्यांना प्रचारक म्हणतात. देशहितासाठी घरदार सोडून संघाची कामे करणारे आज अनेक प्रचारक आहेत. प्रत्येक प्रचाराकाकडे वेगळी जबाबदारी असते. अनेक जण आजीवन प्रचारक देखील असतात.[९] राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व पदांवर हेच प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात.[५] सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. सरसंघचालकांची निवड ही लोकशाही मार्गाने होत नसली तरी बाकी सर्व पदे ही लोकशाही मार्गाने निवडली जातात. सरसंघचालक हे केवळ मार्गदर्शन करू शकतात. निर्णय हे लोकशाही पद्धतीने आणि सरकार्यवाह यांच्या नेतृवाखाली होतात.[ संदर्भ हवा ]
शिस्त
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाखाणण्यासारखी शिस्त असते. संघाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळी सुरू होतात आणि ठरलेल्या वेळीच संपतात.यालाच अनुशासन असे म्हणले जाते.[१०]
विजयादशमी संचलन आणि मेळावा
१८२५ साली विजयादशमी या दिवशी संघाची स्थापना झाली.[११] त्याचे औचित्य साधून दरवर्षी विजयादशमी या दिवशी संघातील कार्यकर्ते संचलन करतात.शहरातील बा गावातील रस्त्यांवरून हे संचलन केले जाते. यामध्ये शाखेत जाणारे सर्व वयोगटातील कार्यकर्ते गणवेश घालून सहभागी होतात. राष्ट्र सेविका समिती सदस्या यांचेही अशाच प्रकारचे संचलन केले जाते. यामध्ये घोषपथक, वाद्य पथक यांचा सहभाग असतो.दरवर्षी याच दिवशी दसरा मेळावासुद्धा आयोजित केला जातो ज्यामध्ये सरसंघचालक सर्व कार्यकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतात.[१२][१३]
टीका
इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.. महात्मा गांधींवर हल्ला करणारा नथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले.[१४] जुलै १९४९ मध्ये ही बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी घातलेल्या अटी संघाने मान्य केल्यानंतर उठविण्यात आली. या अटी अशा होत्या : रा. स्व. संघ लिखित व प्रकाशित घटना स्वीकारेल, आपले कार्यविधी सांस्कृतिक क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवेल व राजकारणात पडणार नाही, हिंसा व गोपनीयतेचा त्याग करेल, भारतीय ध्वज व संविधानाप्रती निष्ठा बाळगेल आणि लोकशाही पद्धतीने संघटनेची बांधणी करेल.[१५]
याचबरोबर संघ केवळ ब्राह्मणी हितासाठीच कार्यरत असल्याची टीकाही केली जाते. संघ वेळोवेळी जातीभेदाचा निषेध करत आला आहे व जातीवादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्नशीलआहे.[१६] संघाचे आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक ब्राह्मणच झालेले आहेत.[१७]
।। भारत माता की जय ।।
अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
^Andersen, Walter K. (1987). The Brotherhood in Saffron: The Rashtriya Swayamsevak Sangh and Hindu Revivalism. Boulder: Westview Press. p. 111. ISBN0-8133-7358-1. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)