चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्याकरा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.[१]
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १५जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. ह्या आन्दोलनाचे लोण शहरी भागासह ग्रामीण भागातही पसरले. तत्कालीन ग्रामीण भागातील अग्रनी कार्यकर्ते असणारे बुलडाणा जिल्ह्यातील, नागझरी गावचे रखमाजी कायंदे (सावकार) यांनी शेकडो कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने मुंबईला आंदोलनात सहभागी केले होते.
सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या ऐतिहासिक 'चले जाव' आंदोलनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ' वंदे मातरम् ' हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अॅटली याने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.
माउंटबॅटन योजना
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.[२]