गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर

जन्म: १४ जुलै, १८५६ (1856-07-14)
टेंभू, कराड, सातारा
मृत्यू: १७ जून, १८९५ (वय ३८)
पुणे, महाराष्ट्र
चळवळ: समाजसुधारणा
पत्रकारिता/ लेखन: केसरी
सुधारक
धर्म: हिंदू
वडील: गणेश आगरकर
पत्नी: यशोदाबाई आगरकर
अपत्ये: यशवंत, माधव, व २ मुली

गोपाळ गणेश आगरकर (१४ जुलै, १८५६; टेंभू - १७ जून, १८९५;पुणे) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकारशिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरीमराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.

बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.[]

आरंभीचा काळ

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

कारकीर्द

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

उल्लेखनीय कार्य

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली.

१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले.

गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत

आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.[]

राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला

आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमतीस्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

पत्रकारिता

१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.[]

आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

टिळकांशी मतभेद

आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे.

१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण.

अखेरच्या दुखण्यात टिळक आगरकराच्या भेटीस गेले पण जुजबी बोलण्याखेरीज प्रतिसाद मिळाला नाही*. केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.``

आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.``

यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते,

``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत``

आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती. []

संस्था

  • गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

पुरस्कार

साहित्य

गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके -

  1. आगरकर दर्शन - ऑडिओ पुस्तक
  2. आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे)
  3. आगरकर विचार (लेखक : अशोक चौसाळकर, तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
  4. आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक वि.स. खांडेकर)
  5. आगरकरांचे राजकीय विचार (अशोक चौसाळकर, २००५)
  6. गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान.
  7. गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन
  8. गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. अविनाश कोल्हे)
  9. टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : अशोक चौसाळकर)(२००८)
  10. टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - विश्राम बेडेकर
  11. डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर)
  12. द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले)
  13. ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर.
  14. वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर)
  15. ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर)
  16. श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९
  17. ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर
  18. 'गुलामांची राष्ट्र'हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर)

१९. 'गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर)

संदर्भ

  1. ^ कठारे, डॉ. अनिल (२०१५). आधुनिक भारताचा इतिहास. ३, प्रतापनगर, श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालयाजवळ, जळगाव, महाराष्ट्र: श्री. रंगराव पाटील - प्रशांत पब्लिकेशन ,जळगाव. pp. २९, ३०. ISBN 978-93-85021-50-3.CS1 maint: location (link)
  2. ^ सोनवणे स्नेहल,, व इतर (२०१४). आधुनिक महाराष्ट्र (१८१८-१९६०). पुणे: सक्सेस पब्लिकेशन. pp. ५.६. ISBN 978-93-5158- 045-4.CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ Google's cache of http://www.dailykesari.com/sund2.html Archived 2008-10-12 at the Wayback Machine.. It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT.
  4. ^ http://marathi.webdunia.com/miscellaneous/special07/friendshipday/0708/04/1070804032_2.htm

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!