ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. वेळापत्रकानुसार हा दौरा इ.स. २०२० च्या मार्च महिन्यातच होणार होता आणि ३ ट्वेंटी२० सामने आयोजित होते. परंतु मार्च २०२० मध्ये न्यू झीलंडमध्ये कोरोनाव्हायरस हा साथीचा रोग झपाट्याने फैलावत गेल्याने न्यू झीलंड सरकारने देशांच्या सागरी आणि वायुसिमा बंद केल्या त्यानंतर न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा वाढत्या कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने मार्च २०२१ मध्ये हा दौरा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली. तदनंतर दोन्ही देशांच्या सरकारची परवानगी मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर २०२० रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन संघ पाच ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२१ला न्यू झीलंडमध्ये दाखल होईल अशी घोषणा केली. दुसऱ्या दिवशी सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे प्रसिद्ध करण्यात आली. शेवटचे तीन सामने हे न्यू झीलंड महिलांच्या इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत.
२७ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑकलंड शहरात टाळेबंदी जाहीर केल्यामुळे मालिकेतील ४था सामना हा वेलिंग्टनला हलविण्यात आला. तसेच अन्य काही अडचणी आल्यामुळे माऊंट माउंगानुईचा ५वा सामना देखील वेलिंग्टनला हलविण्यात आला. न्यू झीलंडने मालिका ३-२ अशी जिंकली.