भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. भारताच्या घटनेच्या १७० व्या कलमानुसार प्रत्येक राज्यात विधानसभा हे सभागृह अस्तित्वात आहे. विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे.[१] विधानसभेत कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त ५०० सभासद असतात; मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. पुडुचेरी विधानसभा ३० सदस्यांची आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ सदस्य आहे. विधानसभेच्या मतदारसंघांपैकी काही जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असतात. विधानसभेचे मतदारसंघ कमीत कमी ७५,००० ते ३५०,००० मतदारांचा मिळून बनलेले असतात.