ठरल्यानुसार ट्वेंटी२० मालिकेत पाच सामने आयोजलेले होते. परंतु वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया मधला तिसरा एकदिवसीय सामना २४ जुलै ऐवजी २६ जुलैला पुर्ननियोजित केला गेला. त्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला ट्वेंटी२० सामना सुरू होणार होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना संपवून पाकिस्तानविरुद्धचा ट्वेंटी२० सामना सुरू होण्याच्या कालावधीत केवळ १२ तासांचे अंतर राहत होते. आयसीसीच्या नियमांनुसार राष्ट्रीय संघाला दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे असल्यास दोन्ही सामन्यांमध्ये २४ तासांचे अंतर आवश्यक पाहिजे. ते अंतर इथे उपलब्ध नसल्याने आणि पुढील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन पाकिस्तानविरुद्धचा २६ जुलै रोजीचा पहिला ट्वेंटी२० सामना वेळापत्रकातून वगळण्यात आला. आणि ट्वेंटी२० मालिका ही चार सामन्यांची करण्यात आला.
पावसामुळे पहिला, तिसरा आणि चौथा ट्वेंटी२० सामना अर्ध्यातूनच रद्द करावे लागले. केवळ दुसरा ट्वेंटी२० सामना पूर्णपणे खेळवण्यात आला. ज्यात पाकिस्तानने ७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानने चार सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीजने पहिली कसोटी काटाकटीने १ गडी राखून जिंकत मालिकेत आघाडी घेतली. परंतु दुसरी कसोटी पाकिस्तानने जिंकली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.