२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेननेअंतिम सामन्यातनेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.
यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका मुख्य स्पर्धेसाठी आपोआप पात्र झाला. मागील स्पर्धेप्रमाणे यावेळीही गतविजेता संघाला आपोआप प्रवेश देण्यात आला नव्हता, त्यामुळे इटलीनेही पात्रताफेरीतून प्रवेश मिळवला.
नोव्हेंबर २५, २००७ रोजी दर्बान येथे पात्रताफेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरले होते
पात्र संघ
मुख्य स्पर्धेत भाग घेण्यास खालील ३२ देश पात्र ठरले.
विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेणारा एकही देश नसलेला हा प्रथमच विश्वचषक आहे. स्लोव्हाकिया आणि सर्बिया हे देश पूर्वी इतर देशांचा भाग असताना खेळले होते.
पारितोषिक रक्कम आणि क्लबांचा मोबदला
२०१० फिफा विश्वचषकात एकूण ४२ कोटी अमेरिकन डॉलरची पारितोषिके दिली गेली. २००६च्या स्पर्धेपेक्षा हा आकडा ६०%ने मोठा आहे.[२] स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. इतर संघांची कमाई अशी होती:[२]
उप-उपांत्यपूर्व (सोळा संघांची फेरी) - ९० लाख डॉलर
उपांत्यपूर्व फेरी - १ कोटी ८० लाख डॉलर
उपांत्य फेरी - २ कोटी डॉलर
तिसरा क्रमांक - २ कोटी ४० लाख डॉलर
विश्वविजेता - ३ कोटी डॉलर
याशिवाय फिफाने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच खाजगी क्लबांना त्यांच्या खेळाडूंना आपआपल्या राष्ट्रीय संघांकडून खेळू दिल्याबद्दल मोबदला दिला. २ कोटी ६० लाख युरोचा हा एकूण मोबदला दर खेळाडू दर दिवशी १,००० युरो दिल्यासारखा होता.[३]
२००८मध्ये फिफा आणि युरोपीय फुटबॉल क्लबच्या प्रतिनिधींमधील समझोत्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला. याच्या बदल्यात क्लबांनी जी-१४ ही आपली संघटना बरखास्त केली आणि २००५पासूनचे फिफा विरुद्ध आपल्या खेळाडूंना झालेल्या इजांच्या मोबदल्याचे दावे मागे घेतले. बेल्जियमच्या शार्लेरुआ एस.सी. या क्लबच्या अब्देलमजिद ऊल्मर्स या खेळाडूला २००४ मधिल सरावाच्या सामन्यातील दुखापत किंवा न्यूकॅसल युनायटेडच्यामायकेल ओवेनला२००६च्या स्पर्धेतील दुखापत ही याची उदाहरणे होत.[४][५][६]
स्पर्धेचा प्रतिनिधी
झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी आहे. याचा जन्मदिनांक १६ जून, १९९४ (1994-06-16) (वय: ३०)
हा मानला जातो. झाकुमी नावातील झा हा भाग दक्षिण आफ्रिकेच्या za या आंतरराष्ट्रीय लघुरुप तर कुमी हा भाग अनेक आफ्रिकन भाषांतील दहा अंकाच्या उच्चारातून घेण्यात आला आहे.[७] झाकुमीचे पिवळे अंग व हिरवे केस यजमान देशाच्या गणवेशाला साजेसे आहेत.
जून १६ हा झाकुमीचा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेतील युवा दिन आहे. याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा साखळी सामना खेळला जाईल. १९९४ हे झाकुमीचे जन्म वर्ष दक्षिण आफ्रिकेतील वंशभेद नसलेल्या सर्वप्रथम निवडणुकांचे प्रतीक आहे.[८]
झाकुमीचा खेळ खिलाडुपणाचा. हे झाकुमीचे ब्रीदवाक्य आहे. २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेदरम्यान हे ब्रीदवाक्य दाखवण्यात आले होते.[८]
आदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या चेंडूत अकरा या आकड्याचे महत्त्व विशेष होते. अदिदासने तयार केलेला हा अकरावा अधिकृत चेंडू आहे. यावर खेळातील अकरा खेळाडू व दक्षिण आफ्रिकेतील अकरा राजमान्य भाषांचे प्रतीक असलेले अकरा रंग आहेत. ही स्पर्धा जूनच्या अकरा तारखेस सुरू होउन जुलैच्या अकरा तारखेला संपली.[९]
या चेंडूवर टीकाही झाली आहे. एफ.सी. बार्सेलोनाच्या गोलरक्षक व्हिक्टर वाल्देसचे म्हणणे आहे की मला या चेंडूची भिती वाटते, हा बेभरवशाचा आहे.[१०]
स्पर्धेत चार खेळाडूंनी सर्वात जास्त ५ गोल केले. गोल्डन बुटाचा पुरस्कार जिंकणाऱ्या जर्मनीच्या थॉमस मुलरने तीन असिस्ट केले. रजत बुट जिंकणारा स्पेनचा डेव्हिड व्हिया एकूण ६३५ मिनिटे तर कास्य बुट मिळवनारा नेदरलँड्सचा वेस्ली स्नायडर ६५२ मिनिटे खेळला. उरूग्वेच्या दिएगो फोर्लन ने ५ गोल, १ असिस्ट केला व तो ६५४ मिनिटे खेळला. एकूण तीन खेळाडूंनी ४ गोल केले..[१७]
संपूर्ण स्पर्धेत २८ खेळाडूंना निलंबित केले गेले. पैकी १३ खेळाडूंना एकामागोमाग दोन यलो कार्ड, ८ खेळाडूंना रेड कार्ड तर ७ खेळाडूंना यलो कार्डनंतर रेड कार्ड दाखवले गेले होते.