नामदेव धोंडो महानोर (ना.धों. महानोर नावाने प्रसिद्ध; १६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी कवी आणि गीतकार होते.[२] १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात.[३] मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.[४]
१९९१ भारत सरकारने पद्मश्री हा देशातला चौथा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[२]
ना.धों. महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी ब्रिटिश भारतातील जळगांव जिल्ह्यातील पळासखेड
गावी झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण पळसखेडला घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णी गावच्या शाळेते गेले. पुढे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.[५] परंतु आर्थिक समस्यांमुळे एका वर्षात त्यांनी शिक्षण सोडले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.[६]
रानातल्या कविता (१९६७) हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी ही त्यांची कादंबरी १९७२ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गपसप (१९७२) आणि गावातल्या गोष्टी (१९८१) हे लोककथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध केले आहे.[५] महानोरांनी गद्यलेखन देखील केलेले असले तरी प्रामुख्याने ते निसर्गावरच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत.
"या शेताने लळा लावला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो... आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..."
"ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे... आणि या मातीतूनी चैतन्य गावे... कोणती पुण्ये येती अशी फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे..."
अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांची गाणी खूप गाजली आणि आजही प्रसिद्ध आहेत. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांतील त्यांची गाणी आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात.[७]
१)मी रात टाकली, २)जांभूळ पिकल्या झाडाखाली, ३)लिंबोणीचं लिंबू, ४)चिंब पावसानं रान झालं आबादानी, ५)दूरच्या रानात केळीच्या बनात, ६)आम्ही ठाकरं ठाकरं ७)बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं ८)राजसा जवळी जरा बसा इत्यादी अजरामर गीते त्यांनी लिहली.
महाराष्ट्र सरकारने १९७८ मध्ये साहित्यिक−कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली.[२][३] साहित्यिक प्रश्नांबरोबरच त्यांनी शेती क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले. त्यांनी जलसंधारण पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव सभागृहात मांडले, जे पारित देखील झाले. १९७८-८४ या काळाबरोबरच १९९०-९५ मध्ये देखील ते विधान परिषदेवर होते.[८]