ज्ञानेश्वर नाडकर्णी

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी
जन्म २१ मे १९२८
मृत्यू २३ डिसेंबर २०१०
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, इंग्रजी

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी (२१ मे, इ.स. १९२८ - २३ डिसेंबर, इ. स. २०१०[]) हे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे.

मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. कला व नाटय़ क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर सन १९५१ मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६ पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी ऍडवरटायसिंग साठी कॉपीरायटर म्हणून काम केले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नल साठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी फिनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लिखाण केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते मनपूर्वक पाठपुरावा करीत असत. या विषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेक अग्रगण्य दैनिक व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक जंगी प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्यावेळेस अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनप्रसंगी नाडकर्णीनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती.

त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभरातून सन्मान मिळाले. फ्रांस सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेची सुरुवात करणाऱ्या शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दी निमित्ताने ब्रिटिश सरकारने आयोजित केलेल्या प्रदर्शानच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी भूमिका बजावली होती. नाडकर्णी आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘‘अक्षरांचे शिलेदार’‘ हा किताब देण्यात आला.

ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत जसे विपुल लिखाण केले; तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी आगळे स्थान मिळवले. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’ तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वावरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या बुजुर्ग कलावंताची जागतिक पटावर ओळख करून दिली. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभिनय नाट्यविषयक लेखन
अश्वत्थाची सळसळ नाट्यविषयक लेखन
चिद्घोष मॅजेस्टिक प्रकाशन
पिकासो मॅजेस्टिक प्रकाशन
प्रतिभेच्या पाऊलवाटा मॅजेस्टिक प्रकाशन
प्रस्थान मॅजेस्टिक प्रकाशन
बालगंधर्व चरित्र(इंग्रजी)
विलायती वारी नाट्य समीक्षणे
हिचकॉक मॅजेस्टिक प्रकाशन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-02 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!