बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, (जन्म : सातारा, २५ सप्टेंबर१९२६, - ३० जून१९९४) हे मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरिताचे तिमिर जावो[१], वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले[२]. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली.
जीवन
कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले[२]. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले[२].