जर्मनी फुटबॉल संघ (जर्मन: Die deutsche Fußballnationalmannschaft) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ इ.स. १९०८ सालापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. इ.स. १९५० ते १९९० दरम्यान हा संघ पश्चिम जर्मनी देशासाठी खेळत असे. दुसऱ्या महायुद्धानंतरजारलांड (१९५०–१९५६) व पूर्व जर्मनी (१९५२–१९९०) हे दोन वेगळे संघ स्थापित होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी संघ पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी संघ पुन्हा एकसंध बनला.
ऐतिहासिक काळापासून जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ४ फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदे जिंकली आहेत तर चार विश्वचषकांमध्ये व तीन युरोपियन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे.