शिवसेनेच्या (ठाकरे गट) २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते.[७][८]
सुरुवातीचे जीवन
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील 'पाडोळी' (जिल्हा - धाराशिव (उस्मानाबाद)) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.[१]
सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गुट्टे हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.[१]
सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र इ.स. २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.[११]
सामाजिक कारकीर्द
लातूर जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या.[१]
सुषमा अंधारे या 'भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या' प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.[ संदर्भ हवा ] भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.[४]
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.[१३][१४][१५][१६] यापुर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या.[१७]
तथापि शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या गणराज्य संघाशी संबंधित होत्या आणि त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता.[१८] मात्र या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला नाही. ऑक्टोबर २०२२ च्या एका मुलाखतीत अंधारे यांनी म्हणले की, "लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचे बोलतात. मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य देखील नव्हते. शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं."[१७]
लेखन
सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा कविता संग्रह इ.स. २०१० मध्ये पुण्यातील देवाशिष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.[ संदर्भ हवा ] शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह कोल्हाटी जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
पुरस्कार व सन्मान
धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने.
भीमरत्न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच उत्तम खोब्रागडे यांच्या हस्ते प्रदान.
सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.[१९]
बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे.