शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.[२]मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. १७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे.
शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं. मात्र २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे नेते 'एकनाथ शिंदे' यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांसोबत बंड केले व २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे व उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे.