प्रमोद व्यंकटेश महाजन (ऑक्टोबर ३, इ.स. १९४९ - मे ३, इ.स. २००६) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते. पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली. ते एक पक्के व्यावसायिक राजकारणी होते. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे ते पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. महाजन हे भारतीय जनता पक्षातील दुसऱ्या पिढीतील मोठे नेते होते.
सुरुवातीचे जीवन
प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर ( तत्कालीन अखंड आंध्रप्रदेशात आता तेलंगणात असलेले शहर) येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. प्रकाश आणि प्रवीण ही त्यांच्या भावाची आणि प्रतिभा आणि प्रज्ञा ही त्यांच्या बहिणींची नावे आहेत. ते २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च, इ.स. १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना पूनम ही मुलगी आणि राहुल हा मुलगा आहेत. दोघेही प्रशि़क्षित विमानचालक आहेत. त्यांच्या मुलीचे आनंद राव वजेंदला या हैदराबाद येथील उद्योगपतीशी लग्न झाले. त्यांनी खोलेश्वर महाविद्यालयात इंग्रजीच्या अध्यापनाचे काम इ.स. १९७१ पासून १९७४ पर्यंत केले.
आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले.
राष्ट्रीय स्तरावरील राजकारण
महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले.
राजकीय कारकीर्द
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता.
[१]
जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावे असे प्रमोद महाजनांचे म्हणणे होते. त्यामुळे मुंडेंचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषतः स्वतःच्या मतदारसंघावर असायचे. प्रमोद महाजन हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता.[२]
शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदाच्या दिशेने वेगाने घोडदौड करीत होते. अटल वाजपेयींनंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पंतप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन हे नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.
[३]