राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार स्वीकारणारा सन्मेश

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.

पार्श्वभूमी

२ ऑक्टोबर १९५७ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली. तेव्हा हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वतःकडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली.त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली. पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला.

भारतीय बाल कल्याण परिषदेने १९५७मध्ये या पुरस्कारांना सुरुवात केली. यात खालील पाच पुरस्कारांचा समावेश आहे.

  • भारत पुरस्कार (१९८७ पासून )
  • गीता चोपडा पुरस्कार (१९७८ पासून)
  • संजय चोपडा पुरस्कार (१९७८ पासून)
  • बापू गायधनी पुरस्कार (१९८८ पासून)
  • सामान्य राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (१९५७ पासून)

आपल्या अपहरणकर्त्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या गीता आणि संजय चोपडा या भावंडांच्या स्मरणार्थ शूर मुलगा आणि मुलगी यांना अनुक्रमे संजय आणि गीता चोपडा पुरस्कार देण्यात येतात. नाशिक येथे लागलेल्या आगीत अडकलेली दोन लहान मुले आणि गोठ्यात अडकलेल्या गायी यांना वाचवताना जखमी झालेल्या आणि त्यामुळे पुढे मृत्युमुखी पडलेल्या बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ 'बापू गायधनी पुरस्कार' देण्यात येतो. पुरस्कारप्राप्त मुलांच्या नावांची घोषणा १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी केली जाते. काही राज्य सरकारे सुद्धा या मुलांना आर्थिक मदत करतात. इंदिरा गांधी शिष्यवृती योजनेंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी आईसीसीडब्‍ल्‍यू आर्थिक मदत करते. इतर मुलांना पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. भारत सरकारने पुरस्कारप्राप्त मुलांसाठी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच पॉलीटेक्निक महाविद्यालयांमध्ये काही जागा आरक्षित ठेवल्या आहेत. या पुरस्कारांसाठी मुलांची निवड एक समिती करते. या समितीत विविध मंत्रालये/ विभाग यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संघटना आणि भारतीय बाल कल्याण परिषदेचे वरिष्ठ सदस्य यांचा समावेश असतो.

पुरस्कारार्थी

२०१८ सालचे पुरस्कारार्थी

  • नेत्रावती महंतेश चव्हाण : (१४ वर्षे - मरणोत्तर) बागलकोट, कर्नाटक : बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवताना एका मुलाला वाचवण्यात यशस्वी.दुसऱ्या मुलाला वाचवताना नेत्रावतीचा मृत्यू
  • करणबीर सिंग : गगुवाल, अमृतसर,पंजाब : नाल्यात शाळेची बस पडल्यामुळे बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवले.
  • एफ.लालछंदामा (१८ वर्षे - मरणोत्तर): नदीत बुडणाऱ्या मित्रांना वाचवताना प्राण गमावले.
  • ममता दलाई : (६ वर्षे) : ओरिसा: मगरीच्या विळख्यातून मैत्रिणीची सुटका केली.
  • सेबास्टीयन व्हीन्सेंट : अलेप्पी, केरळ : रेल्वेच्या रूळावर पडलेल्या मित्राला वाचवले.
  • लक्ष्मी यादव : (१६ वर्षे) : लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन लोकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.
  • समृद्धी सुशील शर्मा : (१७ वर्षे): गुजरात : घरात चाकू घेऊन शिरलेल्या माणसाशी सामना केला.
  • झोनंतलुआंगा : मिझोरम : अस्वलाच्या हल्ल्यातून वडिलांची सुटका केली
  • पंकज सेमवाल : (१६ वर्षे) : टेहरी गढवाल, उत्तराखंड : बिबट्याच्या हल्ल्यातून आईला वाचवले.
  • नाझिया: आग्रा, उत्तर प्रदेश : आग्रा येथील सदरभट्टी भागातील दुकानदारांना त्रास देणाऱ्या लोकांना पोलिसांच्या हवाली केले.
  • नदाफ एजाझ अब्दुल रौफ: पार्डी(मक्ता), तालुका: अर्धापूर, जिल्हा: नांदेड,महाराष्ट्र : नदीत बुडणाऱ्या दोन महिलांना वाचवले.
  • लौक्राकपाम राजेश्वरी चानू : (१५ वर्षे) : मणिपूर
  • पंकज कुमार महंत : (१५ वर्षे) :ओरिसा

२०१९ सालचे पुरस्कारार्थी

झेन सदावर्ते: मुंबई, महाराष्ट्र: प्रसंगावधान राखून आग लागलेल्या इमारतीतील १७ जणांचा जीव वाचवला.[]

आकाश खिल्लारे: औरंगाबाद, महाराष्ट्र: नदीत बुडणारी मुलगी आणि तिची आई यांना वाचवले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "मुंबईच्या झेन सदावर्तेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार". Mumbai Live. 2020-01-26 रोजी पाहिले.
  2. ^ author/online-lokmat. "मुंबईची झेन सदावर्ते, औरंगाबादचा आकाश खिल्लारे शूरवीर, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविणार". Lokmat. 2020-01-26 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!