आग्रा (हिंदी लेखनभेद: आगरा) हे भारताच्याउत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. आग्रा शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात यमुना नदीच्या काठावर लखनौपासून ३७८ किमी पश्चिमेस व नवी दिल्लीपासून २०६ किमी दक्षिणेस वसले आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या आग्राची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती.
आग्राचा उल्लेख महाभारतामध्ये देखील केला गेला आहे. इ.स. १५०६ साली लोधी सुलतान सिकंदर लोधीने आपली राजधानी दिल्लीहून आग्र्याला हलवली. सिकंदर लोधीचा पुत्र इब्राहिम लोधी १५२६ साली पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये ठार झाला व मुघल सम्राटबाबरची आग्र्यावर सत्ता आली. मुघल साम्राज्यकाळ आग्र्यासाठी दैदिप्यमान ठरला व येथे अनेक मुघल इमारती व वास्तू उभारल्या गेल्या. बाबरनंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाह जहान ह्या मुघल सम्राटांच्या कारकिर्दीत आग्रा हे साम्राज्याचे राजधानीचे शहर राहिले.
अकबरने आग्र्यामध्ये लाल किल्ला व आग्र्याबाहेर फतेहपूर सिक्री ह्या वास्तू बांधल्या. शाह जहानने आपली दिवंगत पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ मोठे स्मरक उभारण्याचे ठरवले व यमुनेच्या काठावर १६५३ साली ताजमहाल बांधून पूर्ण झाला. १६८९ साली शाह जहानने राजधानी शाहजहानाबाद (जुनी दिल्ली) येथे हलवली.
शाहजहानचा मुलगा औरंगजेब ह्याने बापाला कैदेत टाकून सत्ता बळकावली व मुघल साम्राज्याची राजधानी पुन्हा आग्र्याला आणली. १६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी आग्र्याला बोलावले. १२ मे १६६६ रोजी औरंगजेबाच्या दरबारात त्याच्या कनिष्ठ सरदारांच्या मागे उभे केल्यामुळे महाराज खवळले व त्यांनी दरबार सोडण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाने त्यांना त्वरित अटक करवून कैदेत टाकले. ३ महिने कैदेत राहिल्यानंतर शिवाजी महाराज पुत्र संभाजीसह १७ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटाऱ्यांत लपून कैदेमधून सर्वांना चकवत साहस पराक्रम दाखवत निसटले. आग्र्याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो.
मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर मराठे नी या वर राज्य केले 1785 ते १८०३ साली आग्रा मराठा साम्राज्यआले.1803 मध्ये ब्रिटिश कडे आल. १८३५ मध्ये ब्रिटिशांनी येथे आग्रा प्रांताची निर्मिती केली. १९४७ मधील भारताच्या स्वातंत्र्यानंतर राजधानी दिल्लीच्या जवळ स्थित असल्यामुळे आग्र्याचे राजकीय महत्त्व कायम राहिले.
ताजमहाल हे आग्र्यामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे व आग्र्याला सर्रास ताजचे शहर म्हणून ओळखले जाते. मुघल सम्राट शाह जहान ह्याने आपली पत्नी मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिच्यासाठी एक स्मारक म्हणून १६५३ साली ताजमहालाची निर्मिती केली. ताज महाल जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
आग्ऱ्याचा किल्ला किंवा लाल किल्ला १५६५ साली अकबरने बांधला. संपूर्ण लाल दगडांचा बनलेला हा किल्ला शाह जहानच्या कारकिर्दीत राजवाड्यामध्ये रूपांतरित करण्यात आला. मोती मशीद, दिवान-ए-आम व दिवान-ए-खास इत्यादी प्रसिद्ध वास्तू ह्या किल्ल्यामध्येच आहेत...
फत्तेपूर सिक्री हे शहर अकबराने १५६९ साली आग्र्याच्या ३५ किमी पश्चिमेस वसवले व आपली राजधानी तेथे हलवली. परंतु येथील पाणी टंचाईमुळे अकबराला राजधानी पुन्हा आग्र्याला हलवणे भाग पडले. फत्तेपूर सिक्री किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार - बुलंद दरवाजा हे जगातील सर्वात मोठे प्रवेशद्वार मानले जाते.
इत्माद-उद-दौला
इत्माद-उद-दौला हे यमुनेच्या काठावरील एक मुघल थडगे जहांगीरची पत्नी नूर जहानने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ बांधले. ह्याची वास्तूरचना ताजमहालासोबत मिळतीजुळती असून ताजमहालाची संकल्पना इत्माद-उद-दौलावरूनच घेण्यात आली असे मानले जाते.
अकबराचे थडगे
सम्राट अकबराचे थडगे दिल्ली-आग्रा महामार्गावर आग्र्याहून १३ किमी अंतरावर सिकंद्रा येथे स्थित आहे. हे स्मारक जहांगीरने १६१३ साली बांधले
आग्रा छावणी रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई मार्गावर असून येथे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. मध्य रेल्वेमार्गे दिल्लीहून मुंबईकडे धावणाऱ्या गाड्या देखील येथूनच जातात. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतातील सर्वात वेगवान गाडीचा येथे थांबा आहे तर गतिमान एक्सप्रेस ही १६० किमी/तास वेगाने घावणारी व भारतामधील सर्वात वेगवान गाडी दिल्ली व आग्रादरम्यान धावते.