नियंत्रित-प्रवेश महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग (controlled-access highway) हा द्रुतगती वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेला महामार्गाचा एक प्रकार आहे. ह्या प्रकारच्या महामार्गावरील सर्व प्रवेश व निकास नियंत्रित केलेले असतात. एक्सप्रेसवे, मोटरवे, फ्रीवे इत्यादी इंग्लिश शब्द नियंत्रित-प्रवेश महामार्गाचा उल्लेख करण्यासाठीच वापरले जातात. फ्रेंच: autoroute, जर्मन: Autobahn, किवा इटालियन: autostrada हे शब्द इतर भाषांमध्ये वापरात आहेत.
नियंत्रित-प्रवेश महामार्गावर वाहतूकीला येणारे सर्व अडथळे दूर केलेले असतात. येथे कोणत्याही प्रकारचे काटरस्ते, चौक, वाहतूक नियंत्रक सिग्नल नसून वाहनांना मुक्तपणे वेगाने प्रवास करण्याची मुभा असते. आडव्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी पूल किंवा बोगदे बांधलेले असतात. ह्या महामार्गावर केवळ ठराविक स्थानांवरूनच वाहनांना प्रवेश मिळतो व ठराविक स्थानांमध्येच महामार्ग सोडता येतो.