अमृतसर (पंजाबी: ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. अमृतसर शहर पंजाबच्या वायव्य भागात भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळ वसले असून येथून वाघा सीमा केवळ २८ किमी तर पाकिस्तानचे लाहोर शहर ५० किमी अंतरावर आहे. शीख धर्माचे सांस्कृतिक केंद्र मानल्या जात असलेल्या अमृतसरमध्ये जगप्रसिद्ध सुवर्णमंदिर आहे.
अमृतसरच्या रहिवाश्याला अंबरसरिया म्हणतात. हा शब्द फुकरे (म्हणजे बिनकामाचा, कामचुकार) या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात आला आहे. ते गाणे असे :- अंबरसरिया मुंडवे कच्चिया कलियॉं ना तोड ...
इतिहास
पंजाब प्रदेशामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या अमृतसरची स्थापना शीख धर्मगुरू गुरू रामदास ह्यांनी १५७४ साली केली. १५८५ साली गुरू अर्जुनदेवांनी येथे हरमंदिर साहिब (सुवर्णमंदिर) हा गुरुद्वारा बांधण्याची संकल्पना मांडली व १६०४ साली हा गुरुद्वारा बांधून पूर्ण झाला. १७व्या व १८व्या शतकात अमृतसरमध्ये अनेक संरक्षक भिंती बांधल्या गेल्या.
भारत ब्रिटिश राजवटीखाली असताना १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियानवाला बाग येथे एक संहारक हत्याकांड घडले. ब्रिटिशांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी जालियनवाला बाग येथे भरलेल्या एका निशस्त्र शांततासभेवर तत्कालीन ब्रिटिश ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याच्या हुकुमावरून त्याच्या सैन्याने कोणतीही सूचना न देता बेछूट गोळीबार केला. ह्या हत्याकांडामध्ये १००० पेक्षा अधिक पुरुष, महिला व मुले मृत्यूमुखी पडली.
ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्यावेळी भारताची फाळणी केली गेली व अमृतसर व लाहोर ही समान संस्कृती असलेली दोन जवळची शहरे अलग झाली. ह्यादरम्यान लाहोर व अमृतसर शहरांमध्ये भयानक दंगली झाल्या ज्यामध्ये हजारो निरपराध कुटुंबांना बेघर व्हावे लागले.
१९८० च्या दशकातील खलिस्तान चळवळीचे अमृतसर प्रमुख केंद्र होते. जून १९८४ मध्ये सुवर्णमंदिर परिसरामध्ये लपून बसलेला प्रमुख खलिस्तानी अतिरेकी जरनैल सिंग भिंद्रनवाले व त्याच्या सहकाऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या आदेशावरून ऑपरेशन ब्लू स्टार ह्या लष्करी कारवाईकरून मंदिरपरिसराचा गैरवापर करणाऱ्या सर्व अतिरेक्यांना ठार मारले. शिखांसाठी पवित्र असलेल्या सुवर्णमंदिरामध्ये लष्कर घुसवल्याबद्दल शीख लोकांमध्ये असंतोष पसरला. त्याची परिणती ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिरा गांधींच्या हत्येमध्ये झाली.
जनसांख्यिकी
वाहतूक
अमृतसर शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. येथील अमृतसर रेल्वे स्थानकासाठी मुंबई, दिल्ली व इतर अनेक प्रमुख शहरांमधून थेट प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. लाहोर ते दिल्ली दरम्यान धावणारी समझौता एक्सप्रेस पूर्वी लाहोर ते अमृतसर दरम्यानच धावत असे.
जालंधर, लुधियाना, अंबाला व पानिपतमार्गे धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ अमृतसरला नवी दिल्लीसोबत जोडतो. पठाणकोट ते गुजरातदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १५ अमृतसरमधूनच जातो.
अमृतसर विमानतळ अमृतसरच्या ११ किमी ईशान्येस असून येथून भारतामधील प्रमुख शहरांसोबतच दुबई, दोहा, बर्मिंगहॅम, ताश्कंद इत्यादी आंतरराष्ट्रीय शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
बाह्य दुवे