दुबई (अरबी: دبي) हे पश्चिम आशियातीलसंयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे.[१] दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती.
दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.[२] १९६० च्या दशकादरम्यान दुबईची जोमाने वाढ होत असताना येथील खनिज तेल साठ्यांचा शोध लागलेला नव्हता. १९६९ साली येथे तेलविक्रीमधून मिळकतीस सुरुवात झाली परंतु इतर अरबी शहरांप्रमाणे येथील अर्थव्यवस्था संपूर्णपणे खनिज तेलावर कधीच अवलंबून नव्हती. सध्या दुबईच्या एकूण अर्थव्यवस्थेमधील केवळ ५ टक्के हिस्सा तेलविक्रीमधून येतो.[३] दुबईने पश्चिमात्य पद्धतीची अर्थनीती स्वीकारल्यामुळे पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता इत्यादी बहुरंगी उद्योगांवर दुबईने लक्ष केंद्रित केले आहे. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका दुबईच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून दुबई बाहेर येत आहे.[४]
आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.[५] २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो.
भूगोल
दुबई अमिराती पर्शियन आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर अरबी वाळवंटामध्येसमुद्रसपाटीवर वसले आहे. दुबईच्या दक्षिणेला अबु धाबी अमिरात, ईशान्येला शारजा अमिरात तर आग्नेयेला ओमान देश आहेत. दुबईचे मुळ क्षेत्रफळ ३,९९० चौरस किमी (१,५४० चौ. मैल) इतके होते परंतु समुद्र बुजवून येथे अनेक कृत्रिम बेटे बनवण्यात आली आहेत ज्यामुळे दुबईचे आजचे क्षेत्रफळ ४,११० चौरस किमी (१,५९० चौ. मैल) इतके आहे. दुबईमध्ये कोणतीही नदी नाही.
हवामान
वाळवंटामध्ये स्थित असल्यामुळे दुबईचे हवामान अत्यंत उष्ण आहे. येथील उन्हाळे प्रखर व दमट असतात. उन्हाळ्यामध्ये येथील सरासरी कमाल तापमान ४१ °से (१०६ °फॅ) तर हिवाळ्यामध्ये सरासरी किमान तापमान १४ °से (५७ °फॅ) असते. येथील वार्षिक पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ होत असून हल्ली येथे प्रतिवर्षी ९४.३ मिमी (३.७१ इंच) पावसाची नोंद झाली आहे.[६]
२००९ सालच्या जनगणनेनुसार दुबईची लोकसंख्या १७,७१,००० इतकी होती ज्यामध्ये १३,७०,००० पुरुष व ४,०१,००० महिला होत्या. दुबईच्या लोकसंख्येपैकी केवळ १०-१५ टक्के लोकच स्थानिक अमिराती वंशाचे आहेत व उर्वरित ८५ टक्के रहिवासी बाहेरून स्थानांतरित होऊन येथे स्थायिक झालेले आहेत. स्थानांतरित लोकांपैकी बव्हंशी लोक आशियाई आहेत ज्यांपैकी ५३ टक्के लोक भारतीय आहेत.
संयुक्त अरब अमिरातीच्या संविधानानुसारइस्लाम हा दुबईमधील राजकीय धर्म आहे. येथील बहुतेक सर्व मशिदींना सरकारी अनुदान मिळते व सर्व मुस्लिम धर्मगुरूंना सरकारकडून वेतन मिळते. इस्लामव्यतिरिक्त ख्रिश्चन व हिंदू ह्या दोन धर्मांचे रहिवासी येथे मोठ्या संख्येने आहेत.
वाहतूक
रोड्स अँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी (Roads and Transport Authority (RTA)) नावाची सरकारी संस्था दुबईमधील वाहतूक व परिवहनासाठी जबाबदार आहे. २००९ साली दुबईमध्ये १०,२१,८८० खाजगी मोटार कार् होत्या व केवळ ६ टक्के रहिवासी सार्वजनिक परिवहनाचा वापर करीत होते. दुबई हे मध्य पूर्वेमधील महामार्गांवर सर्वाधिक गर्दी असलेले शहर आहे. वाहतूक सुधारण्यासाठी व सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढवण्यासाठी येथे अनेक नवे बसमार्ग चालू करण्यात आले आहेत व अनेक ठिकाणी वातानुकुलित बसथांबे बांधण्यात आले आहेत. २००९ साली चालू झालेली दुबई मेट्रो ही जगातील सर्वाधिक लांबीची संपूर्ण स्वयंचलित, विनाचालक जलद परिवहन प्रणाली आहे. एकूण ७४.६ किमी लांबीच्या दोन मार्गांवर ४९ वातानुकुलित स्थानके आहेत. दुबई मेट्रो ही अरबी द्वीपकल्पामधील पहिली शहरी वाहतूक सेवा आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असून एमिरेट्स, फ्लायदुबई ह्या दुबईमधील प्रमुख विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. २०१४ साली ७ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला. सध्या दुबई विमानतळावरून जगातील १४२ शहरांना वाहतूकसेवा पुरवण्यात येते.