नितीश कुमार ( १ मार्च १९४९) हे भारत देशाच्या बिहार राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. जनता दल (संयुक्त) ह्या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष असलेले नितीशकुमार भारतामधील अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. जनता दलामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नितीशकुमारांनी विश्वनाथ प्रताप सिंग ह्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये कृषी राज्यमंत्र्यांची भूमिका निभावली. त्यांनी १९९४ साली जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री इत्यादी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
२००५ सालापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नितीश कुमार ह्यांनी २०१३ साली भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला व जे.डी.यू. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडले. २०१४ लोकसभा निवडणुकांमधील जनता दलाच्या खराब प्रदर्शनानंतर नैतिक जबाबदारी घेऊन नितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु ते फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आले. नोव्हेंबर २०१५ मधील विधानसभा निवडणूकीत नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दल सह इतर अनेक प्रमुख पक्षांसोबत युती करून भाजपला पराभूत करण्याचा निश्चय केला. निवडणुकीत ते बहुमत मिळवून मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले.
संबंधित पुस्तके
- नितीशकुमार आणि बिहारचा उदय (मूळ इंग्रजी लेखक अरुण सिन्हा; मराठी अनुवाद - सविता दामले)
बाह्य दुवे