नारा चंद्रबाबू नायडू (तेलुगू: నారా చంద్రబాబునాయుడు, २० एप्रिल १९५०) हे भारताच्याआंध्र प्रदेश राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री व तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध तेलुगू नट व माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव ह्यांचे जावई असलेले नायडू १९९५ साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजधानी हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. हैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू ह्यांच्याकडे जाते. त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी हैदराबादला भेट दिली. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली.
हैदराबाद शहरावर व माहिती तंत्रज्ञान उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रित करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषतः शेती उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्करून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले.