जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]
२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे.
जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे.