हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा (कन्नड: ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ; १८ मे १९३३) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.
पूर्वीचे जीवन
गौडा यांचा जन्म १८ मे १९३३ रोजी म्हैसूरच्या (सध्याच्या कर्नाटकातील हसन) हलोरानसिपुरा तालुक्यातील हारदानहल्ली या गावी व्होकलीगा जातीच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील शेतकरी होते.
गौडा यांनी १९५० दशकाच्या उत्तरार्धात एल.व्ही. पॉलिटेक्निक, हसन येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविका मिळविली. १९५४ मध्ये त्यांनी चेन्नम्माशी लग्न केले. त्यांना सहा अपत्य आहेत: ४ मुलं व २ मुली ज्यात राजकारणी एच. डी. रेवन्ना आणि एच.डी. कुमारस्वामी आहेत.
राजकीय कारकीर्द
१९५३ मध्ये गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे कर्नाटक विधानसभेवर होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या काळात ते बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात राहिले.[१]
गौडा हे दोन वेळा जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते जनता दलाच्या प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते रामनगरातून निवडून आले होते.
१९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी.व्ही. नरसिंह राव यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने (गैर-काँग्रेस आणि गैर-भाजप प्रादेशिक पक्षांच्या एकत्रीकरण) काँग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि ११ एप्रिल १९९७ पर्यंत राहिले.
१९९९ मध्ये जनता दल फुटला, जेव्हा मुख्यमंत्री जे.एच. पटेलयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दर्शविला आणी मग गौडा आणि सिद्धारमैया यांच्या नेतृत्वात जनता दल (धर्मनिरपेक्ष)ची स्थापना झाली.[२][३] विभाजनाचा आधार हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विरोध असला तरी गौडा सुरुवातीपासूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून तितकेच दूर राहिले.[४] तथापि, जेडीएसने अनेकदा काँग्रेससह कर्नाटकात राज्य सरकार स्थापन केले.
संदर्भ
बाह्य दुवे