रामकृष्ण हेगडे (ऑगस्ट २९, १९२६- जानेवारी १२, २००४) हे भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक वरिष्ठ नेते व कर्नाटकाचे १०वे मुख्यमंत्री होते.
१९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनामध्ये कार्यकर्ते असणारे हेगडे काँग्रेस पक्षाचे कार्यशील सदस्य होते. १९५७ साली ते प्रथम म्हैसूर विधानसभेवर निवडून आले. १९६९ साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला व १९७७ मध्ये जनता पक्षामध्ये प्रवेश केला. १९७८ ते १९८३ दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते. १९८३ साली जनता पक्ष कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर हेगडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आले. त्यांच्या कार्यकाळात हेगडेंना प्रचंड लोकप्रियता लाभली.
१९९६ साली जनता दलातून हकालपट्टी झाल्यानंतर हेगडेंनी स्वतःचा लोकशक्ती नावाचा पक्ष स्थापन केला व भारतीय जनता पक्षासोबत गटबंधन केले. १९९८ ते १९९९ दरम्यान हेगडे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वाणिज्यमंत्री होते. १९९९ साली त्यांनी लोकशक्ती पक्षाला जॉर्ज फर्नान्डिस ह्यांच्या समता पक्षासोबत विलिन करून जनता दल (संयुक्त) ह्या नव्या पक्षाची निर्मिती केली.
१२ जानेवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले.