अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक किंवा इंडियन अमेरिकन हे अमेरिकेचे नागरिक असलेले आणि भारतीय पूर्वज असलेल्या लोकांना दिलेले नाव आहे.
अमेरिकेत स्वतःला या गटात मोजणारे अंदाजे ३१,८०,०० व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचा साधारण १% असलेला हा गट चीनी अमेरिकन आणि फिलिपिनो अमेरिकन यांच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकाचा मोठा वस्तीगट आहे.
[१]
२०१० च्या जनगणनेनुसार[३] अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची लोकसंख्या इ.स. २०००मध्ये १६,७८,७६५ (एकूण लोकसंख्येचा ०.६% भाग) होती तर २०१०मध्ये ती २८,४३,३९१ (०.९%) इतकी झाली.[४][५][६]
वरील आकडे स्वतःला पूर्णपणे भारतीयवंशी आणि पूर्णपणे आशियाईवंशी म्हणविणाऱ्या लोकांचे आहेत. यांत मिश्रवंशीय भारतीय तसेच मिश्रवंशीय आशियाई व्यक्तींचा समावेश नाही.
अमेरिकेतील राज्यानुसार भारतीयवंशी व्यक्तींची संख्या
इ.स. २००६मध्ये १२,६६,२६४ व्यक्तींनी अमेरिकेत कायदेशीररीत्या स्थलांतर केले. पैकी ५८,०७२ व्यक्ती भारतातून आल्या. २००० आणि २००६ दरम्यान ४,२१,०००६ व्यक्ती भारतातून अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यास आल्या. १९९०-१९९९ या कालखंडात ही संख्या ३,५२,२७८ होती.[१५] १९९० ते २००० या दशकात भारतातून आलेल्या व्यक्तींची संख्या १०५.८७%नी वाढली. यात कालखंडातील अमेरिकेची लोकसंख्या ७.५%नी वाढली. आशियाईवंशी अमेरिकनांपैकी भारतीयवंशीयांची संख्या १६.४% आहे. २०००साली अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयवंशीयांपैकी १०,०७,००० व्यक्ती अमेरिकेबाहेर जन्मलेल्या होत्या.
ड्यूक युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली यांच्या पाहणीनुसार १९९५ ते २००५ या दहा वर्षांत भारतीय अमेरिकनांनी स्थापन केलेल्या तांत्रिक कंपन्याची संख्या याच काळातील ब्रिटिश, चीनी, तैवानी आणि जपानी अमेरिकनांनी स्थापन केलेल्या एकूण कंपन्यांच्या संख्येपेक्षा जास्त होती.[१६] युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीच्या स्वतंत्र पाहणीनुसार सिलिकॉन व्हॅलीमधील एक तृतियांश अभियंते भारतीयवंशी आहेत तर तेथील उच्चतंत्रज्ञान कंपन्यांपैकी ७% कंपन्यांचे उच्चाधिकारी भारतीयवंशी आहेत.
आर्थिक
अमेरिकेतील २०१० च्या जनगणनेनुसार तेथील वांशिक गटांपैकी भारतीय अमेरिकनांचे दरघरटी उत्पन्न सर्वाधिक होते. कार्यसक्षम भारतीय अमेरिकनांपैकी ७२.३% व्यक्ती नोकरीधंद्यात असून त्यांपैकी ५७.३% व्यक्ती व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक काम करतात.[१७] इतर अमेरिकनांतील ही टक्केवारी ३५.९% आहे.[१८] अमेरिकन असोसियेशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजन या संस्थेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत भारतीयवंशाचे अंदाजे ३५,००० डॉक्टर आहेत.[१९] २००२ साली भारतीयवंशी अमेरिकन २,२३,००० कंपन्याचे मालक होते व त्याद्वारे ८८ अब्ज अमेरिकन डॉलरचे उत्पन्न ६,१०,००० व्यक्तींना रोजगार मिळत होता.[२०]
अमेरिकेतील वांशिकगटांपैकी भारतीयवंशी अमेरिकन शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमध्ये अग्रेसर आहेत.[२६] यांच्यातील ७१% व्यक्तींकडे शैक्षणिक पदव्या आहेत. अमेरिकेतील आशियाईवंशीयांत हे प्रमाण ४४% तर एकूण अमेरिकनांत हे प्रमाण २८% आहे. जवळजवळ ४०% भारतीयवंशी अमेरिकनांकडे शैक्षणिक उच्चपदव्या आहेत. एकूण अमेरिकनांपेक्षा हे प्रमाण पाचपट आहे.[२७][२८]
अमेरिकनांची शैक्षणिक पातळी: २०१०[२९] (वय २५ किंवा अधिक वर्षे)
अमेरिकेतील भारतीयवंशी लोकांत हिंदू (५१%), मुस्लिम (१०%), ख्रिश्चन (१८% - पैकी प्रोटेस्टंट ११%, कॅथोलिक ५%, इतर ख्रिश्चन ३%), शीख (५%), जैन (२%), बौद्ध, पारसी, ज्यू व इतर अनेक धर्मीय व्यक्ती आहेत. १०% व्यक्ती आपल्याला निधर्मी किंवा नास्तिक म्हणवतात. यांतील बहुतांश आपल्या पूर्वजांचा धर्म पाळतात. कॅलिफोर्नियात स्टॉकटन शहरात इ.स. १९१२मध्ये बांधलेला गुरुद्वारा हे पहिले भारतीय धार्मिकस्थळ होते.