मिसिसिपी (इंग्लिश: Mississippi; उच्चार) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले मिसिसिपी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३१व्या क्रमांकाचे राज्य आहे.
३६,३३८ डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले मिसिसिपी हे आर्थिक दृष्ट्या अमेरिकेतील सर्वात गरीब राज्य आहे. कापसाची शेती हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. ह्या शेतीमुळे १९व्या शतकात अमेरिकन यादवी युद्धाअगोदर हे राज्य देशातील पाचव्या क्रमांकाचे सुबत्त व श्रीमंत राज्य होते. परंतु येथील धनाढ्य जमीनदारांनी राज्यात कोणतीही गुंतवणूक न करता सर्व संपत्ती स्वतःजवळ ठेवली. युद्धानंतर रस्ते, रेल्वे, शाळा इत्यादी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मिसिसिपीची प्रगती खुंटली. सध्या आरोग्य सेवा, स्वच्छता इत्यादी प्रमाणांमध्ये मिसिसिपीचा शेवटचा क्रमांक आहे.