रेल्वे वाहतूक हा भारत देशामधील दळणवळणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रवासी तसेच मालवाहतूकीमध्ये देशात अग्रेसर असणारी भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीखालील भारतीय रेल्वे देशात रेल्वेसेवा पुरवण्यासाठी जबाबदार आहे. २०२० साली सुमारे ८०९ कोटी प्रवाशांनी भारतात रेल्वे प्रवास केला तसेच ह्याच काळात सुमारे १२१ कोटी टन मालवाहतूक रेल्वेद्वारे करण्यात आली. सद्य स्थितीमध्ये भारतामधील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असून २०२० सालापासून काही प्रवासी व मालवाहतूक मार्गांचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२०२० साली भारत देशामध्ये ६७,९५६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे होते. ह्या बाबतीत भारताचा जगभरात [[अमेरिका], रशिया व चीन खालोखाल चौथा क्रमांक लागतो. भारतामधील रेल्वे वाहतूक प्रामुख्याने ब्रॉड गेजवर केली जाते व एप्रिल २०२१ मध्ये ४५,८८१ किमी लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. भारतीय रेल्वेकडे आजच्या घडीला २,९३,०७७ मालवाहतूक करणाऱ्या वाघिणी, ७६,६०८ प्रवासी डबे तर १२,७२९ इंजिने आहेत.
इतिहास
भारतामधील ब्रिटिश राजवटीदरम्यान रेल्वे वाहतूक स्थपित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. १८४५ साली मद्रास रेल्वे व ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी तर १८४९ साली ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे ह्या कंपन्यांची स्थापना करण्यात आली. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई व ठाणे शहरांदरम्यान भारतामधील पहिलीवाहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. १४ डबे असलेल्या ह्या गाडीला ओढायला तीन कोळशाची इंजिने होती. १८५४ साली हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. ह्याच वर्षी हावडा ते हूगळी दरम्यान पूर्व भारतातील पहिली गाडी धावली. त्यानंतर ब्रिटिशांनी देशभर रेल्वेचे जाळे उभे केले व १९२५ साली व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान देशातील विजेवर धावणारी पहिली रेल्वे सुरू झाली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय रेल्वे अनेक क्षेत्रांमध्ये विभागण्यात आली. १९६९ साली पहिली राजधानी एक्सप्रेस तर १९८८ साली पहिली शताब्दी एक्सप्रेस चालू झाली. २०१९ साली संपूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली.
प्रवासी रेल्वे
आजच्या घडीला भारतामध्ये अनेक प्रकारच्या प्रवासी रेल्वे गाड्या चालवल्या जातात.
भारतामधील बहुतांशी मेट्रो गाड्या प्रमाण गेजवर धावतात. आजच्या घडीला १३ शहरांमध्ये मेट्रो सेवा कार्यरत आहेत तर अनेक शहरांमध्ये मेट्रोचे नवे मार्ग उभारले जात आहेत.
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता इत्यादी भारताच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये उपनगरी रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ह्या उपनगरी गाड्या भारतीय रेल्वे चालवत असून बहुतेक सर्व गाड्या इंजिनरहित विद्युत रेल्वे स्वरूपाच्या आहेत.
^"Toy Trains of India". Our Trips – Royal Train Tours. India Calling Tours (P) Limited. 8 ऑगस्ट 2007 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 मे 2007 रोजी पाहिले.