टोरॉंटो (इंग्लिश: Toronto) ही कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांताची राजधानी व कॅनडामधील सगळ्यात मोठे शहर आहे. टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ ६३० चौरस किमी (२४० चौ. मैल) इतके आहे. २०११ साली टोरॉंटो शहराची लोकसंख्या सुमारे २६.१५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ५५.८३ लाख होती. ह्या दोन्ही बाबतीत टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
टोरॉंटो कॅनडाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. आग्नेय कॅनडामधील अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या गोल्डन हॉर्स शू नावाने प्रसिद्ध असलेल्या भूभागाचे टोरॉंटो मुख्य शहर आहे. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार टोरॉंटो निवासासाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक होते. सी.एन. टॉवर ही १९७६ ते २००७ दरम्यान जगातील सर्वात उंच असलेली इमारत येथेच आहे.
इतिहास
युरोपीय शोधक उत्तर अमेरिकेमध्ये दाखल होण्यापूर्वी ह्या भूभागावर इरुक्वाय, मिसिसागा इत्यादी स्थानिक जमातींचे वर्चस्व होते. इ.स. १७८७ साली ब्रिटिश साम्राज्याने हा भूभाग मिसिसागा लोकांकडून विकत घेतला. इ.स. १७९३ साली राज्यपाल जॉन सिम्को ह्याने यॉर्क नावाच्या गावाची स्थापना केली व त्याला अप्पर कॅनडा प्रांताची राजधानी बनवले. इ.स. १८१२ सालच्याअमेरिका व ब्रिटन ह्यांदरम्यान झालेल्या युद्धामधील यॉर्कच्या लढाईमध्ये अमेरिकेने यॉर्कवर विजय मिळवला. अमेरिकन सैन्याने यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली व अनेक इमारती जाळून टाकल्या. ६ मार्च १८३४ रोजी यॉर्कला शहराचा दर्जा प्राप्त झाला व त्याचे नाव बदलून टोरॉंटो ठेवले गेले. येथे गुलामगिरीवर बंदी असल्यामुळे टोरॉंटोमध्ये अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक स्थानांतरित होऊ लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात टोरॉंटोची झपाट्याने वाढ झाली व जगभरामधून येथे लोक स्थलांतर करू लागले. १८४९ ते १८५२ व १८५६ ते १८५८ दरम्यान अल्प काळांकरिता टोरॉंटो कॅनडाची राजधानी होती.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस टोरॉंटो मॉंत्रियालखालोखाल कॅनडामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते. १९३४ साली टोरॉंटो शेअर बाजार कॅनडामधील सर्वात मोठा बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातून टोरॉंटोमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. १९८० साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले. ६ मार्च २००९ रोजी टोरॉंटोने १७५वा वर्धापनदिन साजरा केला.
हवामान
टोरॉंटोमधील हवामान आर्द्र खंडीय स्वरूपाचे असून येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे प्रदीर्घ व थंड असतात.
टोरॉंटो हे एक जागतिक व्यापार व वाणिज्य केंद्र आहे. टोरॉंटो रोखे बाजार हा बाजारमूल्याच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा आहे. कॅनडामधील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये टोरॉंटो येथेच आहेत. सध्या टोरॉंटो महानगरामध्ये फारश्या कंपन्या नसल्या तरी अनेक वितरण व मालवाहतूक सुविधा टोरॉंटोमध्ये आहेत. १९५९ साली उघडलेल्या सेंट लॉरेन्स सागरी मार्गाद्वारे टोरॉंटोमार्गे ग्रेट लेक्समधूनअटलांटिक महासागरापर्यंत जलवाहतूक होत असल्यामुळे तयार मालाची वाहतूक हा देखील टोरॉंटोमधील एक मोठा उद्योग आहे. २०११ साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वात महागडे शहर होते. २०१० साली टोरॉंटो महानगरपालिकेवर ४.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते.
वाहतूक
टोरॉंटोमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी टोरॉंटो रॅपिड ट्रांझिट ही प्रणाली उपलब्ध आहे. चार मार्ग व ६९ स्थानके असणारी ही सुविधा मॉंट्रियाल मेट्रो खालोखाल कॅनडामधील सर्वात वर्दळीची परिवहन सेवा आहे. परंतु आर्थिक चणचणीमुळे नवे मार्ग बांधण्याची कामे संथ गतीने चालू आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी युनियन स्टेशन हे टोरॉंटोमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. टोरॉंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडामधील सर्वात मोठा विमानतळ टोरॉंटो शहरामध्ये असून एर कॅनडा ह्या कॅनडामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.